Untitled Document

शाळा

शाळा ! हा सगळ्यांचा आठवणीत रमण्याचा आणि आनंदाचा विषय असतो . आजही शाळेतले जुने मित्र - मैत्रिणी भेटल्या की , नकळत शाळेतल्या त्या गमती - जमती मध्ये मन रमतं . मिलिंद बोकिल - यांनी लिहिलेली शाळा , ही कादंबरी , साधारणतः ७०-८० च्या दशकातील शाळेत जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला भारावून सोडणारी आहे.

नुकताच २०११ साली या कादंबरीवर आधारित सिनेमा पण निघाला होता .

यातली पात्रं ही साधारणतः नववीतली , म्हणजे शाळेत दंगा-मस्ती करायचं अखेरचं वर्ष कारण नंतर उरणार दहावी नावाचं भयाण वर्ष जेथून पुढे प्रत्येक जण उच्च शिक्षणासाठी शाळा सोडणार ! हे सगळं वाचत असतांना नकळत आपण पण आपल्या शाळेच्या त्या दिवसात जातो आणि कुठेतरी आपल्यातला मुकुंद ( पुस्तकातलं प्रमुख पात्रं ) आठवतो .

त्या अल्लड वयात होणारं पाहिलं प्रेम , ते आकर्षण , शाळेतील शिक्षक - शिक्षकांच्या गमती - जमती हे सगळं मिलिंद बोकिल लिहितांना अगदी हुबेहूब आपल्या समोर उभे करतात . त्या आडनिड्या वयातील भावविश्व हे काही वेगळंच असतं .

तेव्हा शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठीच हे पुस्तक एक अनुभव आहे ! आणि ते वाचुन तो शालेय जीवनातील अनुभव परत एकदा घ्यावाच असे हे पुस्तक .

त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते.
वर्ग आहेत, बाकं आहेत,
पोरंपारी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा;
पण आपण त्यात कशातच नाही.
आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.
ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकटयाचीच. ​​
त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत;
पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document