Untitled Document

।। समर्थ रामदास ।।

शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे , वसिष्ठा परि ज्ञान योगेश्वरचे ।
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा , नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री समर्थ रामदास ह्यांच्या चरित्राकडे वळण्यापूर्वी आपण त्यांच्या घराण्याचा पूर्वेतिहास पाहू या !

मातीचे जर भांडे तयार करायचे असेल तर कुंभार ती माती नीट मळवून , त्यातील दोष काढतो व नंतर ती घाटा वर बसवून कुंभार तिला आकार देतो त्याचप्रमाणे परमेश्वराला ज्याकुळात जन्म घ्यायचा असतो त्याकुळात पिढ्यान पिढ्याची ईश्वर उपासना व सदाचरण हे अखण्ड सुरु असते .

ठोसर ! हे समर्थांचे आडनाव या घराण्याचे मूळ पुरुष कृष्णाजीपंत गोत्र - जमदग्नी , सूत्र - आश्वलायन ! समर्थ व श्रेष्ठ ( गंगाधरपंत ) यांची ही २३ वी पिढी . हे कुटुंब बेदरास येथे राहत होते , पण तेथे राज्यक्रांती झाली व दुष्काळा मुळे त्यांनी हा प्रांत सोडला आणि ते मौजे हिवरे तालुका बीड येथे स्थायिक झाले. ( शके ८८४ दूनदुभी नाम संवत्सर ) . कृष्णाजी पंतांच्या धाकट्या मुलाने - वडगावी मुक्काम केला . याच गावाला पांढरी असे म्हणत .तेथील लखमाजी गवळ्यास पाटीलकी दिली आणि त्या गावास जांब हे नाव ठेवले याच ठिकाणी ठोसर घराणे शके ९१० सर्वधारी संवत्सरापासून वृद्धीला लागले व तेथे ते कुलकर्णीपणाची व ज्योतिषीपणाची वृत्ती चालवू लागले याच घराण्यातील विसाव्या पुरुषाचे नाव सूर्याजीपंत होतें . ते समर्थांचे पणजोबा होत त्रिंबकपंत हे समर्थांचे आजोबा - त्यांचे पुत्र सूर्याजीपंत हेच समर्थांचे वडील .अशा या थोर कुळामध्ये श्रीसूर्यनारायण यांचा अंश - श्रेष्ठ गंगाधरपंत व मारुतीराय यांचा अंश - समर्थ रामदास जन्मास आले.

पवित्र ते कुळ , पवित्र तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।।

सूर्याजीपंत वयाच्या १२ व्या वर्षांपासून नित्य नेमाने सूर्योपासना व श्रीराम उपासना करीत होते. अशी उपासना त्यांच्याकडे २१ पिढ्यांपासून सतत सुरु होती . गेली २ तप सूर्याजीपंतांची सूर्योपासना सुरु होती आता त्या उपासनेची पूर्तता करायची त्यांनी तयारी केली आणि शके १९२५ शोभवृननाम संवत्सर माघ शु . ७ ( रथसप्तमी ) हा दिवस निश्चित केला . रथसप्तमीच्या या शुभमुहूर्तावर माध्यान्हकाळी एक तेजस्वी ब्राह्मण सूर्याजिपंतांकडे आला.

भोजनसमयी अतिथी । आलिया न पुसावी याती ।।
अन्न वस्त्र सर्वांभूती । द्यावे प्रीत्यर्थ देवाचिया ।।

सूर्याजपंतांनी अतिथी पूजन केले आणि त्यांना विनंती केली , महाराज अतिथी देवोभव या नात्याने तुम्ही मला परमेश्वरासमान आहात परंतु आपण सामान्य अतिथी प्रमाणे दिसत नाही तेव्हा आपले मूळ स्वरूप जाणण्याची माझी ईच्छा आहे . अतिथी हसले आणि त्यांच्या जागी एक दिव्य तेजोवलय निर्माण होऊन साक्षात सूर्यदेव प्रगट झाले.

सूर्याजीपंतांनी , सूर्यनारायणाला साष्टांग नमस्कार घातला आणि क्षणभर व्दिडमुडं झाले. केलेल्या तापाचे उद्यापन झाले , संकल्प सिद्धीस गेला . सूर्यनारायणाने हे सर्व पहिले आणि पंतांची ईच्छा विचारली

पण पंत हे जाणून होते की परमेश्वरा कडून मागितल्या नंतर भक्त त्याच्या उपासने पासून दुरावतो म्हणून पंत म्हणाले "हे देवा तुझ्या कडून काही मिळावे म्हणून मी तुझी सेवा नही केली - आपले दर्शन , कृपाप्रसाद आणि तुमच्या चरणी अक्षय पद मिळाले यातच मी धन्य झालो " . पंतांची वैराग्य वृत्ती पाहून सूर्यनारायणाने सौ. राणुबाई यांना त्यांची ईच्छा विचारली - क्षणभर त्यांच्या मनात पुत्र प्राप्तीचा वर मागावा अशी आशा पल्लवीत झाली - पण माझ्या पतीने जे मागितले त्यातच सुख मानून त्यांनी पण आपला विचार रोखला . सूर्यदेवाने हे ओळखले आणि काही तरी वर दिल्या शिवाय मी इथून जाणार नाही असे सांगितले . स्त्रीस्वभावानुसार सौ. राणूबाई यांनी पुत्रप्राप्तीची ईच्छा प्रगट केली व एक परम भागवत पुत्र माझ्या पोटी यावा ईच्छा व्यक्त केली .

सूर्यनारायण प्रसन्नपणे म्हणाले, "ईश्वरीय संकेत ही तसाच आहे , आपल्या पोटी दोन पुत्र जन्माला येतील , पहिला पुत्र माझा अंश असेल व तो प्रपंचामध्ये राहून वंशधर वाढवेल व दुसरा मारुतीराय चा अवतार असेल व तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून गोदातीरी जगदुद्धार करेल " . येत्या रामनवमीला आपल्याला प्रभू रामचंद्र दर्शन देतील असा संदेश देऊन सूर्यदेव अंतर्धान पावले

सूर्यनारायणाने दिलेल्या वाराप्रमाणे सूर्याजीपंतांना कधी रामनवमी येते आणि आपल्याला रामदर्शन घडेल , याची ते उतावीळपणे वाट पाहू लागले. नित्य प्रमाणे सूर्योपासना व श्रीरामोपासना सुरु होती आणि चैत्र महिन्यातील अष्टमी ला पंतांचे मेहुणे भानजी गोसावी यांचं कीर्तन सुरु असताना गावातील एक व्यक्ती - " अहो कुलकर्णी" अशी हाक मारू लागला , पंत देवळातून बाहेर आले व का बोलविले म्हणून विचारू लागले - तेव्हा तो बोलला - कुणी मोठी असामी आहेत आपली भेट मागतात तेव्हा तुम्ही लगेच चला माझ्या सोबत , पंतांनी आपली उपरणे सावरली , दौत लेखणी घेतली व ते पारावर यायला निघाले , वाटेत मारुतीरायचे देऊळ लागल्याने पंत मारतुतीरायाला नमस्कार करून उठणार तेव्हड्यातच मूर्ती मागून एक तेजोवलय निर्माण झाले आणि त्या तेजाने पंत मूर्च्छित झाले .त्या मूर्तीमधून साक्षात प्रभूराम-लक्ष्मण , सीतामाई आणि बोलवायला आलेली व्यक्ती हनुमंताच्या रूपात प्रगत झाली . प्रभुरामचंद्रांनी पंतांना शुद्धीवर आणले आणि त्यांना वर मागायला विचारले - " पंत म्हणाले, हे रामचंद्र या नाशिवंत जगात चिरकाळ टिकेल असे काही नाही , तेव्हा द्यायचे असल्यास आपली चिरकाल भक्ती', परम वैराग्य आणि आपल्या पदाची प्राप्ती मला व्हावी हीच ईच्छा ". श्रीरामांनी "तथास्तु " म्हणत पंतांची ईच्छा पूर्णकेली . पंतांनी हात जोडून प्रभुरामला एक विनंती केली - जसे आज मला दर्शन घडले असेच दर्शन मला वारंवार घडावे, तेव्हा श्रीरामांनी धातूचे पंचायतन पंतांना दिले आणि म्हणाले - याची विधिवत पूजा केल्यास माझ्या सान्निध्याचा आनंद येईल असे सांगून श्रीराम अंतर्धान पावले .

- शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।

तुकारामांच्या या अभंगाप्रमाणे शके १५२७ विश्वावसु नाम संवत्सर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीस ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला. सौ .राणू बाईंनी गंगामातेला " मला पुत्र झाल्यास तुझ नाव ठेवीन " असा नवस केला होता .त्याप्रमाणे ज्येष्ठ पुत्राचे नाव गंगाधर असे ठेवण्यात आले . पुढे पंतांनी गंगाधरला एकनाथ महाराजांच्या पायावर घातले तेव्हा नाथांना अतिशय आनंद झाला . ते पंतांना म्हणाले तुमचा मुलगा श्रीरामउपासना करेल तेव्हा तुम्ही याला श्रेष्ठ म्हणत चला . श्रेष्ठांच्या जन्मानंतर ३ वर्षांनी शके १५३० चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी ला दुपारी १२ वाजता दुसऱ्या पुत्राचा जन्म झाला .पंतांनी त्याचे नाव नारायण असे ठेवले .

जन्म - चैत्र शु. ९ ( रामनवमी ) शके १५३० : सन १६०८ दुपारी बारा वाजता. जिल्हा - औरंगाबाद, तालुका - अंबड, गाव - जांब. गोदावरी नदीकाठी

श्रेष्ठांना पंतांनी एकनाथ महाराजांच्या पायावर जरी ठेवले तरी सद्गुरू शिवाय भक्तीमार्गात पूर्णत्व नाही म्हणून श्रेष्ठांनी पंतांना अनुग्रह मागितला . पण पंत म्हणाले की सद्गुरू उपदेंश कसा द्यवा याचा मला काही अनुभव नाही तेव्हा माझ्या पेक्षा तू आपल्या देव्हरातल्या रामराया ची उपासना कर आणि त्यांचाच अनुग्रह घे . त्याप्रमाणे गंगाधरपंतांची उपासना सुरु होती आणि एके दिवशी त्यांना मारुतीरायाने दर्शन दिले व त्यांची ईच्छा विचारली तेव्हा त्यांनी मला मंत्रोपदेश हवा असे सांगितले. मारुतीरायाने प्रभूरामचंद्राचे ध्यान करताच प्रभुरामचंद्र प्रगट झाले . त्यांनी श्रेष्ठांचे नाव "रामी रामदास " असे ठेवले व त्यांना त्रयोदशाक्षरी मंत्राचा अनुग्रह दिला आणि ते अंतर्धान पावले .

नारायणाची प्रकृती ही लहानपणा पासूनच निरोगी व बळकट होती. हरिकथा , कीर्तन , निरूपण यात त्याचा ओढा जास्त असे . तसेच मैदानी खेळ व बलोपासना हा तर त्याचा आवडता छन्द होता . गावातल्या कित्येकाला तर त्याच्या या लीलेमुळे तो मारुतीराया चा अवतार वाटू लागला

नारायण पाच वर्षाचा असतांना पंतांनी त्याचं व्रतबंधन करण्याचं ठरवलं . मौंजीबंधनानंतर नारायण वेदाभ्यास व कुलकर्णी पदा साठी लागणाऱ्या विषयांचा अभ्यास करू लागला . पण त्याचा कुलकर्णी पानाकडे बिलकुल ओढा नव्हता नारायण जसा खेळण्यात पटाईत होता , तसा तो अभ्यासात पण तल्लख होता . त्याची बुद्धी फार तल्लख होती . समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे

अकरा धडयात केले मुळाक्षर । अकरा प्रहरात वळविले अक्षर ।
अकरा दिवसे केला जमाखर्च सुंदर । ब्रह्माण्ड कुळकर्ण चालवावया ।।

अकरा दिवसात धुळाक्षरे संपवली , अकरा प्रहरात अक्षरे वळविली आणि सारे ब्रह्माण्ड चालविण्यास योग्य असा जमाखर्च अकरा दिवसांत लिहून दाखविला .यावरून त्यांची बुद्धी फार तीव्र होती हे उघड होते.

श्रेठांचे लग्न आंबेडकर देशुमखांच्या मुलीशी झाले आणि पंतांच्या निधनानंतर ते घरचे कुलकर्णी पद चालवू लागले . श्रेष्ठ अतिशय शांत स्वभावाचे व कुटुंबवत्सल होते . प्रपंच्यामध्ये राहून ते नित्यनेमाने श्रीराम उपासना व व्यवसाय नेटाने चालवत होते. त्याच्या अगदी विरुद्ध नारायण अतिशय खोडकर व दांडगाई करणारा , गावातल्या कित्येकांना त्याचा लहान वयातील वैराग्याचे कौतुक वाटे तर अनेकांना त्याचा राग व त्रास होई . एके दिवशी गावातल्या मुलांबरोबर पोहायला गेला असताना आपल्या सवंगड्यानं डोहात ढकलून पोहणं शिकवू लागला आणि स्वतःच त्या डोहाच्या बुडाशी जाऊन तास भर बसून आला , गावातल्या पोरांनी त्याची हि गोष्ट राणूबाई यांना सांगितली , तेव्हा राणूबाईंनी नारायणाला रागावल्यावर तो माळ्यावर जाऊन बसला . त्याला खालती येण्यासाठी राणूबाईनी कळवळून हाक मारली . वर का करतो आहेस विचारलं तर हे रामभक्त म्हणाले

" ।। चिंता करितो विश्वाची ।।"

गंगाधरपंतांना श्रीरामाने अनुग्रह दिला होता , त्यामुळे नारायणाने पंतांकडून अनुग्रह घेण्याची ईच्छा वर्तवली ,पण पंतानी सध्यास घाई नको म्हणून- विषय टाळला . नारायणाला काही तग धरेना आणि तो सरळ गावातल्या मारुती मंदिरात जायला निघाला , वाटेतच त्याला मारुतीराय भेटले आणि त्यांनी कुठे चाललास म्हणून विचारले - तेव्हा नारायणाने झालेली हकीगत सांगितली . मारुतीरायांनी श्रीरामाचे ध्यान केले आणि प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि म्हणाले कशा करीता ध्यान केलेस ? मारुतीराय म्हणाले- माझा अंश म्हणून आपण याला धर्मसंस्थापनसाठी निर्र्माण केलं , तेव्हा आपण याला आपला अनुग्रह द्यावा. श्रीरामांनी तथास्तु म्हणत नारायणाला तेरा अक्षरी राम नामाचा मंत्र , हुर्मुजी रंगाचे वस्त्र व जपाची माळ दिली. कृष्णातीरी जाऊन धर्मस्थापना करून शिसोदे वंशातील - शिवाजी नावाचा राजा जन्मास येईल त्यास मंत्रोपदेश करून म्लेंछ निवारण करून धर्मस्थापना करण्यास साहाय्य करण्याची आज्ञा केली . नारायणास "रामदास " हे नाव देऊन प्रभुराम अंतर्धान पावले . ही घटना जांब या गावी शके १५३८ नल नाम संवत्सर , श्रावण शुक्ल ८ ला झाली .

नारायणाच्या या गोष्टींना आवर घालण्यासाठी राणूबाईंच्या मनी त्याच्या लग्नाची कल्पना आली , त्यांनी ती गंगाधरपंत यांना सांगितलं . नारायणाने लग्ना च्या विषयावरून पंतांना प्रश्न केला की , जेथे राजा आपला नाही , राज्यकर्ता आपला नाही , प्रजा बाटवली जात आहे , धर्म बुडवला जात आहे ,तेव्हा या नश्वर प्रपंच्याचा उपयोग तरी काय ? नुसती माया , आणि यातना यांनी हा प्रपंच वेढला आहे ! रामचंद्राच्या आज्ञे प्रमाणे मला कृष्णातीरी जगदुद्धार करायचा आहे.आणि याचाच विचार करीत असता नारायण घरून बाहेर पडला आणि सरळ एका डोहात उडी घेतली , गावकऱ्यांनी नारायणाला डोहात उडी घेताना पहिले आणि त्याला बाहेर येण्याची विनंती केली पण नारायण काही ऐकत नव्हता .शेवटी गंगाधरपंतांना बोलावण्यात आले आणि त्यांनी नारायणाला प्रेमानी हाक मारताच नारायण डोहातून बाहेर'आला .उंचावरून उडी मारल्याने कपाळाला आवळू ( टेंगुळ ) आले होते.

पण श्रेष्ठांना माहीत होते की नारायण हा प्रपंचात रमणारा नसून त्याचं विहित कार्य मारुतीराय व राघुनंदनानी आधीच निश्चित केले आहे , फक्त योग्य वेळ तेवढी यायची आहे . पंतांनी आईला समजावून सांगितले तरी मातेची माया शेवटी ! ती काही ऐकायला तयार नव्हती आणि एके दिवशी नारायणाला बोलवून त्याला एक वचन मागितले की , " येत्या फाल्गुनात तू बोहल्यावर चढशील " न रहावून नारायणाने आईच्या या वाचनाला होकार दिला .पण येणारा काळच आणि श्रेष्ठ यांनाच पुढे काय होणार ते ठाऊक होते !

नारायणाने बोहल्यावर चढण्यास होकार दिल्याने राणूबाई आनंदी होत्या . त्यांनी नारायणाचे लग्न आसनगावचे त्यांचे बंधू ( समर्थांचे मामा ) भानजी गोसावी यांच्या मुलीसोबत निश्चित केलं . फाल्गुन मासातल्या शुद्ध पक्षातील पंचमीला ग्रहमख बसलं .षष्ठींला आसनगावकरांचं व्याहीभोजन झालं .सप्तमीला सोडमुंज आणि घरचं केळवण . नारायण एखाद्या बाहुली प्रमाणे हे सारे विधी उरकीत होता .त्याच्या मनाची व्यथा फक्त थोरल्या गंगाधरपंतांना जाणवत होती .

ठोसर घराण्याचे वऱ्हाड असनगावात पोहचले . सुवासिनींनी त्यांचे पाय धुतले .औक्षण केलं .मुलीच्या मामानी नारायणाच्या गळ्यात हार घातला .हाती श्रीफळ दिलं . घटिकापात्राची योग्य घटिका आता भरत अली होती ! ब्राह्मणांनी शांतीमंत्राचे घोष संपवून श्री गणेशाचे स्मरण केले . गणेशस्तवन झाल्यावर साऱ्यांनी नारायणावर अक्षता उधाळल्या . "शुभ मुहूर्तावर सावधानss " असा ब्रह्मवृदांनी गजर केला . नारायणाने स्वतःच्या मनावर कठोर कर्तव्याच स्मरण केलं आणि जमलेले सगे सोयरे या कुणाचाही विचार ना करता , गोऱज मुहूर्ताचा फायदा घेत , विजेच्या चपळतेने त्याने बोहल्यावरून उडी घेतली आणि वायुवेगाने तो गर्दीला सारून मांडवाबाहेर पडला .वाट मिळेल तिकडे पळू लागला. काही जण नारायणाच्या शोधास्ताव त्याचा पाठलाग करू लागले पण तो काही हाती गवसला नाही . राणूबाई ओसरीवरच आपले डोकं आपटून घेऊ लागल्या गंगाधरपंत आपल्या आईला समजावू लागले , पण विरहाच्या अतीव त्यांना ग्लानी आली आणि त्या धक्क्यानेच त्यांची दृष्टी गेली .

नारायण जो पळाला तो थेट नाशिक जवळ पंचवटी येथे जाऊनच थांबला . कारण रामचंद्रांच्या आज्ञे प्रमाणे हीच त्याची तपोभूमी होती ! आणि येथूनच त्याच्या जगदुद्धाराला सुरुवात होणार होती. पंचवटी ! जेथे अजूनही प्रभूराम निवास करतात, सीतामाई वृक्षछाया होऊन तिथं साधकांना सावली देते आहे .सौमित्र सूक्ष्म रूपाने दुष्ट शक्तींशी लढण्यासाठी अहोरात्र उभा आहे ! आणि माझा हनुमंत त्या रामचंद्राचा दास म्हणून उभा आहे .त्या दासाचा मी दास होईन ! आणि या जगाचा संसार नीट करण्यासाठी आधी मी पूर्ण समर्थ होईल ..

नारायण एखाद्या पिसं लागल्या प्रमाणे गोदातीरी मार्गक्रमण करीत होता . दिवसा मुक्काम व रात्री प्रवास असा त्याचा क्रम सुरु होता . चार घरी माधुकरी मागायची आणि एखाद्या देवळात किंवा मठात मुक्काम करायचा . कधी कधी एखादं दारच तोंडावर बंद व्हायच.मग पुढचं दार .तिथंही नाही .मग तिसरं .चौथं !चौथ्या दारानंतर मात्र त्या दिवशी उपवास . तुंब्या भर गोदावरीचे पाणी प्यावं आणि तृप्त होऊन ढेकर द्यावी . मिळालेल्या माधुकरीचे चार भाग करायचे, एक पृथ्वीला,एक गौमातेला ,एक प्राणिमात्रांचा आणि शेवटी रामरायाचा नैवद्य दाखवून मग आपण स्वतः खायचा . आता जांब फार मागे पडलं होतं , त्यामुळे मागाहून येण्याचं भय नव्हतं . नारायणाने आता प्रवासाचा क्रम बदलला , दिवसा अंतर कापायचे आणि रात्री एकाद्या स्थानी मुक्काम करायचा .

वाटेत नारायणाने ज्ञानोबांचे आपेगांव व नंतर नाथांचे पैठण चे दर्शन घेऊन पंचवटी जवळ केली .मुखाने अखंड रामनाम व प्रवासात दिसलेला निसर्ग ,लोकांचे व्यवहार , बोलणं , वागणं याचा नारायण बारकाईने अभ्यास करू लागला . मानवाच्या निर्मितीपासून ही नदी अविरत वाहते आहे , पर्वत तठस्थ उभे आहेत , वृक्ष अविरत छाया देत आहेत , हे सगळे मुक्त हस्ताने ते मनुष्याला देत आहेत पण कुठे त्याचा अहंकार नाही किंवा परतफेडीची अपेक्षा नाही . मला ही असाच कर्मयोग , निरंजन अवस्था प्राप्त करायला हवी .त्यासाठी आधी मला ज्ञान मिळवावं लागेल ! साधना करायला हवी आणि मला पूर्णपणे समर्थ ! व्हायला हवे . ठरलं ! तर मग आता पंचवटीला जाणे , रामचंद्राची उग्र उपासना करायची , उपासनेने तपोबल व मनोबल वाढवायचे . व्यायामाने शरीरबल वाढवायचं . सामर्थ्याशिवाय आता कुणालाच काही सांगायचं नाही. अधिकार प्राप्त झाल्याशिवाय उपदेश करायचा नाही . स्वतः सर्वार्थाने , सर्वांगाने आदर्श झाल्याशिवाय आदर्शच्या कल्पना कुणापुढे मांडायच्या नाही . या विचारातच वाटचाल करता करता नारायण पाचवटीला कधी पोहचला त्याचे त्यालाच कळले नाही !

फाल्गुन संपून आता चैत्र मास लागला होता. साऱ्या पंचवटीत रामजन्माची तयारी सुरु होती , घराघरांवर गुढ्या तोरणे होती . पण या साऱ्यात नारायणाला त्याच राम कुठेच दिसत नव्हता . जागो जागी , लोकांची गर्दी पण कुणालाच त्या सगुण रूपाची ओढ नाही , नुसतीच यात्रेची वर्दळ .ज्या कारणासाठी आपण इथवर आलो , त्याची फलश्रुती इथे होणे शक्य नाही , मला हवा एकांत . जेथे माझा संवाद प्रभुरामचंद्राशी व्हावा , जेथे त्याचा दास मारुतीरायचा वास असणार , जिथे मला पुरश्चरण करायला मिळणार . या विचारातच असताना त्याने नंदिनी नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव टाकळी ! जवळ केलं . पंचवटी पासून अर्ध्या घटिकेच्या अंतरावर वसलेलं . नंदिनी आणि गोदावरीचा संगम जवळच असलेली नारायणाची कर्म भूमी !

रोज पहाटे उठून स्नान संध्या उरकून नारायण पंचवटीला जात असे . गोदावरीच्या पात्रात उभा राहून गायत्री चे पुरश्चरण करत असे . माध्यान्न समयी पंचवटी तील चार घरी माधुकरी मागायची आणि उरलेल्या वेळात धर्मशास्त्र , आयुर्वेद , कृषिशास्त्र , रामायण ,महाभारत गीता .इत्यादी ग्रंथांचे वाचन सुरु असे . आता नारायणाची उपासना अधिक स्थिर झाली होती ,तासन - तास पाण्यात उभं राहून पुरश्चरण करण्याची त्याची गती पण वाढली होती . त्याच्या या उपासने मुळे आणि माधुकरी मागतांना निघणाऱ्या " जय जय रघुवीर समर्थ" या घोषाने नाशिक आणि पंचवटीत या योगी बटूचे लोकांना कौतुक वाटे . टाकळी येथील मठीत त्याने एक गोमयाचा मारुती उभारला आणि गावातील लहान मुलांना त्याच्यासमोर बलोपासना,सूर्यनमस्कार व खेळ शिकवू लागला . आता नारायणाच्या उपासनेला तब्बल चार वर्षे पूर्ण झाले होते. त्याच्या प्रकृतीत अमूलाग्र बदल झाला होता , रुंद कपाळ , भारधार छाती , पुष्ट बाहू ,टणक मांड्या , पसरट पाय ,नेत्र अधिक वेधक व तेजपूर्ण दिसू लागले .भृकुटी धनुष्यासारख्या वक्र , मानेवर रुणाऱ्या जटा ,अनुग्रहाच्या वेळी रामरायने दिलेली माळ आणि अंगावर कफनी . साऱ्याच व्यक्तिमत्वावर तपश्चर्येचे आणि विद्वत्तेचे तेज दिसू लागले . त्याच्या या साऱ्या रुपाला पाहून गावातील तरुणांना तो नारायणापेक्षा "रामदास " वाटू लागला !

नंदिनी नदीच्या काठावर विचार करत असताना कानावर राम राम ही साद ऐकू आली , जवळच नदीच्या घाटावर एका शवाचे अग्निदाहान होणार होते . दशपंचक गावाचे गिरिधरपंत कुलकर्णी मृत पावले होते . त्यांच्या पत्नी सती जाणास निघाल्या होत्या आणि जातांना साधू संतांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून जवळच नदीच्या काठावर बसलेले समर्थ तिला दिसले. तिने त्यांना नमस्कार केला आणि समर्थांनी तिला " अष्ट पुत्र सौभाग्यवती भव " असा आशीर्वाद दिला . त्या माउलीने समर्थाना प्रश्न केला की - महाराज तुम्ही दिलेला आशीर्वाद या जन्मी तरी फलश्रुत होणार नाही कारण माझे पती मृत पावले आहेत आणि मी सती जाते आहे . समर्थानी त्यांना प्रश्न केला की आपले पती खरंच मृत पावले आहेत का ? कारण माझा आशीर्वाद हा मी दिलेला नसून प्रभूरामचंद्राचा तो शब्द आहे त्यामुळे तो खोटा ठरणार नाही , तेव्हा मला आपल्या पतीचे मत शरीर एकदा बघतो असे म्हणून समर्थानी त्यांचे शरीर तपासले आणि त्यांचे हातपाय व हृदयावर योग्य ठिकाणी दाब दिला , गोदावरीचे पाणी राम नाम घेऊन शिंपडले आणि गिरिधरपंत यांच्या शरीराची हालचाल झाली . भारावून गेलेले कुलकर्णी दाम्पत्य यांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या चरणी काही सेवा असल्यास ती आम्हाला खुशाल सांगा असा आग्रह केला . समर्थानी नुकत्याच दिलेल्या आशीर्वादाचे स्मरण कुलकर्णी दाम्पत्याला केले आणि सांगितले की आपले पहिले अपत्य आपण मला ईश्वरीय कार्यासाठी अर्पण करा . कुलकर्णी दाम्पत्यांना अतिशय आनंद झाला की आपल्या कुळाचा पाहिलं अपत्य जगदुदाराच्या कार्याला लागून वंशाचा नाव वाढवेल . पुत्र जन्म झाला कि परत या असा आशीर्वाद घेऊन , ते दाम्पत्य परतले.

कालांतरानी कुलकर्णी दाम्पत्याला पहिले पुत्ररत्न प्राप्त झाले - समर्थ आज्ञेप्रमाणे त्यांनी ते त्यांच्या चरणी अर्पण केले . पण समर्थ हे वैरागी चार घरी माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह चालवणारे , त्यामुळे त्यांनी या नवजात बालकाला वयाच्या ८ व्या वर्षा पर्यंत आपल्याच जवळ ठेवा असे सांगून त्याचा व्रतबंध करून घेऊन यायला सांगितले .समर्थांच्या शिष्य परंपरेतील उद्धव स्वामी व राघवस्वामी ( कल्याणस्वामींचे पुतणे ) या दोघांनाच समर्थांच्या मांडीवर मौन्जीबंधन करण्याचे भाग्य लाभले . समर्थांनी सांगिलते की , आपला हा पुत्र माझ्याकडे बारावर्ष तपस्या करेल व आजन्म ब्रह्मचारी राहेल . हा पुन्हा संसारात रमणारा नाही . कुलकर्णी दाम्पत्याला अतिशय आनंद झाला , हा पुत्र आपल्या वंशाचा उद्धार करणारा आहे तेव्हा याचे नाव तुम्ही उद्धव ठेवा !

या ८ वर्षाच्या कालखंडात , समर्थ संप्रदायासाठी एक ओवीबद्ध ग्रंथरचना तयार करत होते २१ समासांची ! उद्धवाच्या मौन्जीबंधनानंतर तो समर्थांन सोबत टाकळी येथिल मठीत राहू लागला . सकाळी उठून त्यांच्या सोबत गोदावरी वर पुरश्चरण करणे , मध्यान्न समयी माधुकरी आणि बाकी वेळी पुराणातील वाचन करून तो त्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण समर्थांना विचारून सोडवून घेई. उद्धव हा पहिल्या पासून विरागी व शांत होता. त्याची गुरुनिष्ठा पाहून प्रत्येकाला तो समर्थांची सावलीच वाटू लागला . समर्थ आता भारत भ्रमणाला बाहेर पडणार होते त्यामुळे आपला हा शिष्य येथे १२ वर्ष उपासना व पुरश्चरण करून उद्धव हा आपली प्रतिकृती तयार व्हायला पाहिजे

जे जे आपणासी ठावे । ते दुसऱ्यासी सिकवावे ।।
शहाणे करोनि सोडावे । सकलजन ।।

या समर्थ शोल्काप्रमाणे एक वर्षांत उद्धवला , समर्थानी मिळविलेल्या ज्ञानाचे भांडार दिले आणि उध्दवास दीक्षा दिली . वयाच्या ८ व्या वर्षी समर्थांच्या शिष्य संप्रदायातील उद्धव हे पहिले पुष्प व पहिला मठपती झाला

केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार ।
शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातुर्य येतसे फार ।।

उध्दवास मठपती करून समर्थ उत्तरेस व दक्षिणेस भारत भ्रमण करण्यास निघाले. देशातील वर्तमान परिस्थिती ,विविध प्रांतातील लोकांची स्थिती - त्यांची भाषा , व्यवहार ह्या सगळ्या बाबींचा समर्थ बारकाईने अवलोकन करत होते. मार्गात हिंदुस्थानातील पवित्र तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेत समर्थ आपल्याला कोणते कार्य कुठे व कसे करायला पाहिजे याची जणीव घेत . त्यांनी संपूर्ण प्रवास पायीच केला , त्यामुळे त्यांचा लोकांशी जवळून परिचय होत गेला . त्यांची योग्यता पाहून अनेक लोक त्यांचे शिष्य झाले . त्यांना समर्थांनी उपदेश करून आपल्या कार्यास उपयुक्त अशी त्यांची मनोभूमिका बनवली. जागोजागी मारुतीची स्थापना केली , मठ स्थापन केले या त्यांची व्यवस्था पाहण्यास शिष्यांची नेमणूक करून त्यांच्याकडे लोकांचे शरीरबल व धर्माचा प्रसार करण्याचे काम सोपविले . देशाटन व तीर्थाटन करत असताना समर्थांनी भारताच्या राजकीय व सामाजिक बाबींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला , ज्याचा उपयोग पुढे समर्थाना कृष्णातीरी जगदुद्धार करताना झाला .

समर्थांनी आपल्या तीर्थाटनाचा सर्व वृतांत प्रभुरामचंद्राला सांगितला व त्याचे पुण्य रामरायच्या चरणी अर्पण केले. पुढे श्रीराम चंद्राच्या आज्ञेप्रमाणे समर्थ कृष्णातीरी मार्गक्रमण करण्यास निघाले. उध्दवास त्यांनी टाकळी च्या मठाची व्यवस्था देऊन त्यांनी उद्धवाला टाकळी चा मठपती केला. कृष्णातीरी जायच्या आधी मातृदर्शन घ्यावे या इच्छेने समर्थ जांबेस जाण्यास निघाले . वाटेत त्यांना एकनाथांचे पैठण गाव लागले , नाथांचे दर्शन घेऊन पुढे निघावे या विचाराने समर्थ पैठणास थांबले.

वेष असावा बावळा । अंतरी असाव्या नाना काळा ।।
या उक्ती प्रमाणे समर्थांचा वेष अतिशय साधा राहत असे . पायात पादुका , गळ्यात मेखला , हातात जपमाळ , काखेत कुबडी , अंगावर हुर्मुजी रंगाचे वस्त्र . या सर्वात विशेष म्हणजे खान्द्यावर गलोल होती. पैठणात फिरत असताना गोदावरीच्या तीरावर अनेक ब्राह्मण मंडळी बसली होती समर्थांना बघून त्यांनी त्यांची छेड काढली व विचारलं आपण हा वेष धारण केला आहे तेव्हा आपण आहात तरी कोण व आपला पंथ तरी कोणता ? समर्थ म्हणाले , आम्ही रामोपासक असून आमचा ब्रह्मचर्याश्रम आहे. त्यावर एक ब्राहमण म्हणाला , रामोपासक आहत तर मग ही गलोल कशासाठी आणि गलोलीचा नेम घेण्याचा काही अभ्यास वगैरे आहे की नाही ? त्यावर समर्थ म्हणाले आम्ही स्वेच्छाधारी करमणुकीसाठी गलोल बाळगतो . आकाशात उडणाऱ्या घारी कडे बघून एका ब्राह्मणाने त्यांना ती घार खाली पडण्यास सांगितली , समर्थानी एक दगड उचलला आणि घारी वर नेम साधला क्षणार्धात घार खाली पडली . ब्राह्मण म्हणाले , आपण स्वतःला रामोपासक म्हणवता , भगवी वस्त्र परिधान करता आणि हिंसा करीता ? तुम्हाला प्रायश्चित करावा लागेल ! समर्थ हसून म्हणाले , ठीक आहे ! मी हिंसा केली मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे . ब्राह्मणांनी त्याना क्षोऊरविधीपुर्वक प्रायश्चित्त दिले . प्रायश्चित्त घेऊनही घार मेलेली पाहून समर्थ म्हणाले मी ,प्रायश्चित्त घेतलं पण घार अजून मेलेलीच आहे . त्या वर ब्राह्मण म्हणाले , धर्मशास्त्रात हिंसेसाठी प्रायश्चित्त आहे , त्याने मेलेला जिवंत होत नाही . समर्थ म्हणाले ,जर माझ्या प्रायश्चित नी घार जिवंत होणार नसेल तर त्या प्रायश्चित्त ला काय अर्थ ? बघू या प्रयत्न करून , रामरायाच्या आशीर्वादाने घार जिवंत होते का ? त्यांनी मनोमन श्रीरामाचे ध्यान केले व घरावरून हाथ फिरवला आणि हाथ फिरवताच घार आकाशात झेपावली . हे सर्व पाहून ब्राह्मण वर्ग आश्चर्यचकित झाला व साऱ्या पैठणास समर्थांचे सामर्थ्य कळले .

पैठणास समर्थ एका देवळात कीर्तन करत असताना , आंबडगावच्या एका वृद्ध इसमाने समर्थाना ओळखले व लग्न मंडपातून पळालेला नारायणाच्या विरहाने तुझ्या आईची दृष्टी गेली असल्याचा सांगितलं . सगळ्या जगाला व लोकांना उपदेश करतोस , तुला कोण उपदेश करणार ? वडीलकीच्या नात्याने त्या वृद्ध इसमाने समर्थाना पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली आणि समर्थान समोर आपल्या माऊलीचा चेहरा उभा राहिला . तब्ब्ल २४ वर्षानंतर समर्थ जांब या आपल्या गावी परतले. समर्थ दारा समोर उभे राहिले व धीर गंभीरपणे म्हणाले

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी , राम आधी वदावा ।।
सदाचार हा थोर सांडु नये तो ।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ।।
-- जय जय रघुवीर समर्थ ।

राणूबाईंनी स्वयंपाक घरात असलेल्या सुनबाईंना आवाज दिला व बाहेर आलेल्या गोसाव्याला भिक्षा द्यायला सांगितली . समर्थांचे हे बदलेलं रूप त्यांना काही ओळखता नही आलं . शिजवलेलं अन्न घेत नाही म्हणून पार्वतीबाई परत कोरडी भिक्षा आणायला आत गेल्या आणि तेवढयात समर्थ अंगणात खेळत असलेल्या आपल्या पुतण्यांना घेऊन माजघरात आले. पार्वतीबाई हे दृश्य बघून पोरांवर ओरडल्या , तोच समर्थ म्हणाले वाहिनी मी आपला नारायण !. भाऊजी ..... म्हणत पार्वतीबाई आत गेल्या व समर्थांवरून त्यांनी भाकरीचा तुकडा ओवाळला . समर्थ त्वरेने आत शिरले व आपल्या आईकडे झेपावले. बराच वेळ समर्थ स्तब्ध होते, त्यावर न राहवून राणूबाईनी विचारलं - "नारायणा इतका गप्प का रे बाबा? माझ्या वरचा राग अजून गेला नाही का? आणि आता आला आहेस तर परत नको जाऊस !!! " तेव्हा समर्थ म्हणाले - आई तू मला परमेश्वरस्वरूप आहेस , तुझ्यावर कशाला रागवायचं ? उलट तूच मला क्षमा कर , माझ्यामुळे तुझी दृष्टी गेली .! आता किमान तुझी दृष्टी येत पर्यंत तरी कुठे नाही जाणार !

श्रेष्ठांना ही बातमी कळताच ते ताबडतोब समर्थांना भेटायला आले व म्हणाले .अरे , गेला तेव्हा नारायण होतास आणि परत आला तर रामदास ..!! भोजन पंगती मध्ये समर्थांचे श्रेष्ठांसोबत त्यांचे पुरश्चरण काळातले आणि तीर्थयात्रेतले आपले विविध अनुभव सांगितले. दुसऱ्या दिवसापासून समर्थानी आई वर आपले उपचार सुरु केले. पुरश्चरण काळात आयुर्वेदातले ज्ञान त्यांनी सुरु केले .सकाळी मातोश्रींवर उपचार , दुपारी श्रेष्ठांसोबत अध्यात्मसंवाद व संध्याकाळी गावातील लहान मुलं यांना बलोपासना , विविध खेळ शिकवणे तसेच गावातील लोकांना अध्यात्म आणि तत्सम विषयावर उपदेश करणे . या उपदेशाच्या निमित्ताने लहान मुलांना समजेल असं लिखाण आपोआपच सुरु झालं .

सदा दात घसोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन तू शूद्रमुखी नसावे ।।
सदा सर्वदा यत्न सोडू नये रे ।
बहुसाल हा खेळ कामा न ये रे ।।
दिसामाजी काहीतरी लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।।
बहुखेल खोटा सदालस्य खोटा ।
समस्ताची भांडेल तोही करंटा ।।
बहुता जनालागीं जीवी भाजावे ।
भल्यासंगती न्याय तेथे करावे ।।

लवकरच समर्थांच्या प्रयत्नांना प्रभू रामचंद्रांच्या कृपाप्रसादाने यश आले व मातोश्रीना दृष्टी प्राप्त झाली . राणूबाईंचे डोळे परत आले , आपल्या सुपुत्राने आता कोठेही जाऊ नये असं त्यांना वाटे . समर्थांच्या सगळ्या वास्तव्याने , जांब येथील लोकांनी त्यांना देवत्व दिलं . आईच्या मायेतून निसटणं समर्थाना दिवसागणिक अधिक कठीण होत होतं . शेवटी निश्चयाने समर्थ आई ला म्हणाले , प्रभू रामचंद्रच्या प्रमाणे मला कृष्णातीरी जायचे आहे तेव्हा अधिक काळ मला आता थांबता येणार नाही . माझं विहित कर्तव्य मला पार पाडलंच पाहिजे . तेव्हा माझ्यावरची प्रेमदृष्टी आवर आणि रामदृष्टींनीं साऱ्या जगाकडे बघ . राणूबाई म्हणाल्या ,रामदृष्टीने बघायला अजून प्रभुराम मी बघितलंय तरी कुठे ? क्षणार्धात राणूबाईंना समर्थांच्या जागी प्रभू रामचंद्र दिसले , त्यांचा संभ्रम नाहीसा झाला आणि म्हणाल्या , नारायणा कुठून शिकला रे हे सगळं , भूत बाधा तर नाही ना झाली तुला ? समर्थ हसले आणि क्षणात गायला लागले -

होते वैकुंठीच्या कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।।
लागे कौसल्येचे स्तनी ।तोचि भूत गे माये ।।

समर्थांनी मातेच्या मायेला आवर घालीत घर सोडले , तरी मधून मधून आईच्या , भावांच्या , पुतण्यांच्या आठवणीने मन सैरभैर व्हायचं ! पाय पुढे जात असले तरी मन मात्र मागे रेंगाळायच.. ! मनाची अशी दोलायमान अवस्था झाली की समर्थ प्रभू रामचंद्रांची आर्ततेने करुणा भाकायचे ....

"चपळपण मनाचे मोडता मोडवेना ।
सकल स्वजन माया तोडितां तोडवेना ।।
घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करुणा हे बोलतो दीन वाचा ।। "

वाटेत एखाद्या गावात किंवा देवळात मुक्काम करावा , तेथील गावातील लोकांचे व्यवहार बघून त्यातला योग्य ती व्यक्ती निवडून त्याला संप्रदायाची दीक्षा द्यावी आणि बलोपासना , रामोपासने चा उपदेश करावा . असा क्रम करत समर्थ कृष्णातीर जवळ करत होते. वाटेत महाबळेश्वर या गावी समर्थांचा मुक्काम असताना महाबळेश्वर चे पुजारी दिवाकर देशपांडे हे समर्थाना त्यांची कीर्ती ऐकून भेटायला आले . वर्तमान देश परिस्थती बघून त्यांनी स्वतःला समर्थांच्या कार्यात रामदासी पंथात येण्याची ईच्छा वर्तवली समर्थानी त्यांची ही ईच्छा पूर्ण केली व त्यांना पंथांची दीक्षा देऊन - दिवाकर गोसावी हे नाम दिले .

टाकळी येथून निघतांना उद्धवा सारखेच समर्थांचे शिष्य - अनंतभट्ट यांनी पण समर्थान बरोबर येण्याचा हट्ट केला . शेवटी तिथे एक हनुमंताची मूर्ती स्थापन केली .पट्टाधीश रामचंद्र व स्वतःच्या पादुका दिल्या आणि पूजा अर्चा सांगून समर्थ वाईस आले . तिथे रोकडोबाची स्थापना केली. थिटे ,पिटके ,चित्राव यांच्या मातुःश्रीस अनुग्रह दिला . पिटके यांच्याकडे रोकडोबा मारुतीची पूजा सोपविली .

समर्थ रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर कृष्णा - वेण्णा संगमावर स्नान संध्या करायला जात व दुपारी माधुकरी मागायला जात . संध्याकाळी गावातील मुलांशी खेळत असतं व तेथील मुलांना बलोपासना व मारुतीची उपासना शिकवत . याच संगमावर बसून समर्थानी सध्या म्हटली जाणारी -

" सुखसरिते गुणभरितें दुरितें निवारी ।
निस्संगा भावगंगा चिदगंगा तरी ।। "
.............
ही आरती रचली .

ज्या प्रमाणे खेळकर मुलास खेळकर मुले आवडतात . अभ्यासू मुलास अभ्यासू आवडतात , वाईटाना वाईट आवडतात तसेच -

समानशीले व्यसनेषु सख्यम ।

या न्यायाने संतांना संतच आवडत असणार . जयरामस्वामी वडगावकर ,आनंदमूर्ती ब्रहमनाळकर , रंगनाथस्वामी निगडीकर ,केशमस्वामी भागानगरकर यांच्या व समर्थांच्या भेटी आधी झाल्या . त्यांची मैत्री झाली . त्यावेळी हे संत पंचक प्रसिद्ध होते . हे कोणताही उत्सव एकमेकांस टाकून करीत नसत . याच काळात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व समर्थांची गाठ पडली . परमेश्वराने आपल्यावर कशी कृपा केली , असे समर्थानी तुकोबांना विचारून चरित्र सांगण्याची विनंती केली . तेव्हा "याति क्षुद्र वंश केला व्य्वसाय ।" हा अभंग तुकाराम महाराजांनी केला व समर्थास आपले चरित्र सांगितले तुकारामांनी सुद्धा , आपण महारुद्र हनुमंताचे अवतार आहात तेव्हा आपणही आपले चरित्र आम्हास ऐकवावे ही विनंती केली - "नमो अधिष्ठाता विष्णू मुख्य साधू ।" ह्या अभंगात त्यांनी आपले स्वचरित्र सांगितले . तुकाराम - समर्थ संभाषणावरून जणू दोन भाऊ बऱ्याच वर्षांनी भेटत आहेत , असेच वाटते . समर्थानी अत्यंत समाधानाने तुकाराममहाराजांना निरोप दिला . तुकोबांप्रमाणेच चिंचवडचे गणेशभक्त मोरया गोसावी हेही समर्थांच्या भेटीस येत . पण समर्थानी कधीच या गणेश भक्ताची उपेक्षा केली नाही .

ज्या चाफळ खोऱ्यात समर्थांनी आनंदवनभुवन ची सुरुवात केली त्याची किर्ती - शिवाजी महाराजांना पण कळली होती. पण समर्थांच्या भेटीचा काही योग आला नव्हता . महाराष्ट्रात त्या वेळी अनेक साधुपुरुष उत्पन्न झाले होते . अशा पुरुषांच्या भेटी घ्याव्यात , त्यांची सेवा करावी व आपल्या कार्यास त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असे महाराजांना वाटे . त्याप्रमाणे त्यांनी अनेक साधूंच्या भेटी घेतल्या व आशीर्वाद मिळविले . तुकाराम महाराजांची त्यांनी भेट घेतली . त्यांची ती वैराग्यशील वृत्ती व निरिच्छ स्वभाव पाहून महाराजांनी , "मला अनुग्रह द्या ". अशी तुकारामबुवांना विनंती केली ; पण तुकाराम महाराजांनी ,"आपण समर्थांकडे जा, तेच आपणास उपदेश करण्यास योग्य आहेत " असे सांगितले . तेव्हा शिवाजी महाराजांनी समर्थांची भेट घेण्याचे ठरविले .

एखादा भुंगा ज्याप्रमाणे सुगंधाचा माग घेत घेत कमळाकडे धावतो , त्याप्रमाणे शिवाजी महाराजांना समर्थांच्या दर्शनाची ओढ लागली होती . समर्थांचा किर्ती परिमळ संबंध महाराष्ट्रात पसरत होता त्यामुळे त्यांना आता समर्थ दर्शनाची अधिक ओढ निर्माण झाली . बरेच दिवस गेलेत अंतरीची तळमळ काही कमी होत नव्हती . शेवटी महाराजांनी वरदायिनी भवानीची प्रार्थना केली - "आज पर्यंत अनेक संतमहंतांच्या भेटी झाल्या , पण त्यापैकी आम्ही कुणाला शरण जावे , हे समजत नाही . तेव्हा कृपा करून मार्गदर्शन करावे . " रात्री देवीने सुवासिनीच्या रूपात दर्शन दिले आणि सांगितले तू रामदासांना शरण जा . तुला मार्गदर्शन करण्यासाठीं त्यांचा अवतार आहे ". असे सांगून देवी अंतर्धान पावली . समर्थ दर्शनार्थ त्यांनी आपली बरेच हेर चाफळ व इतर भागात पाठवले पण समर्थांचा कुठेच पत्ता लागत नसल्याने त्यांचे मन अधिक व्याकुळ व खिन्न झाले होते . बालक ज्याप्रमाणे आईच्या आश्रयाला धावते , त्याप्रमाणे शिवाजीमहाराज भवानीमातेच्या मंदिरात गेले . "समर्थांचे दर्शन झाल्याखेरीज अन्नग्रहण करणार नाही " या निश्चयाने त्यांनी देवीची पूजा केली .

आणि ज्या सद्गुरू दर्शनाची त्यांना तळमळ लागली होती - तो भाग्याचा दिवस उजाडला - हा दिवस होता वैशाख शु . ४ . या दिवशी या सतशिष्याला सद्गुरू दर्शन झाले . समर्थ म्हणाले - "शिवबा, आपण प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहात . गोब्राह्मण आणि धर्मरक्षणासाठी आपला जन्म झाला आहे व आपली कुलदेवता आपणास साह्य करणारी आहे . वास्तविक आमच्या भेटीची काही आवश्यकता नव्हती ; पण तुमच्या अंतरीची तळमळ पाहून मला स्वस्थ बसवेना . म्हणूनच मी चाफळाहून इथे आलो . राजा,तुझी धर्मनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे . ज्या पद्धतीने तू राज्यकारभार करतो आहेस तो आनंदवन भुवन व स्वराज्य निर्माण करणारं आहे . शिवबा राज्यांना आशीर्वाद देऊन समर्थ अदृश्य झाले . समर्थांचे स्वप्नात झालेले दर्शन पाहून त्यांना आता समर्थांच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ लागली . ते आपल्या खाशा स्वारांनिशी समर्थ दर्शनार्थ निघाले . महाबळेश्वरी पहिला मुक्काम पडला , दुसरा माहुली येथे पडला . दोन्ही ठिकाणी स्नान पूजा आटोपून दानधर्म केला . माहुलीस विश्रांतीसाठी बसले , तोंच "जय जय रघुवीर समर्थ " असा जयजयकार करीत समर्थांचा एक शिष्य पुढे आला . त्याने शिवरायला वंदन केले व समर्थांचे पत्र दिले .

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारु ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।१।।
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी ।
जयाचे गुणवैभवासी । तुळणा कैसी ।।२।।
नरपती हयपती ।गजपती गडपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।।३।।
यशवंत ,कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ।।४।।
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सर्वांठायी ।।५।।
धीर उदार सुंदर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर ।तुच्छ केले ।।६।।
सकाळ तीर्थे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।।७।।
देवधर्म गोब्राह्मण स्थाने । करावयासी संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।। ८ ।।
शूर पंडित पुराणिक । वागीश्वर याज्ञीक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमचे ठायी ।। ९ ।।
या भूमंडळींचे ठायी । धर्मरक्षी ऐसा राजा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काहीं । तुम्हा कारणे ।। १० ।।
आणिक काही धर्म चालती । आश्रित होऊन कित्येक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारली ।। ११ ।।
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांसी आश्रय जाहले । शिवकल्याण राजा ।। १२ ।।
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुंबंधे विस्मरण जाहले । काय नेणू ।। १३ ।।
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हांप्रति ।
धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ।। १४ ।।
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिलें । क्षमा केली पाहिजे ।। १५ ।।

आपुले देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।। - ही ओवी वाचली आणि शिवरायांचा कंठ सद्गदित झाला ; डोळे भरून आले ; 'आज पर्यंत अनेक संत महंतच्या भेटी झाल्या . यथाशक्ती सेवा केली . पण , महाराज , आपल्या सेवेत अंतर पडले , ही गोष्ट सत्य आहे . ' त्यांनी समर्थांच्या पत्राला उत्तर दिले - " महाराज , आम्ही अपराधी आहोत . आपण कृपावंत आहात , तेव्हा सांप्रत कृपा व्हावी . आशीर्वादपत्र पाठवले ते पाहून आनंद झाला . दर्शनाची ईच्छा धरून येत आहे . तरी दर्शन द्यावे ही विनंती . " असे पत्र लिहून त्यांनी पत्रवाहक शिष्याचा योग्य सन्मान केला व "सांप्रत समर्थ कुठे आहात ?" अशी विचारणा केली . शिष्य म्हणाला , "महाराज , मी निघेपर्यंत स्वामी चाफळास होते . पण ते केव्हा कोठे जातील , याचा नेम नसतो . आपणास चाफळ मठात जास्त माहिती कळेल " . जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करून शिष्य निघून गेला

दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत चाफळास जायला सोबत बाळाजी आवजी , निळो सोनदेव इ . मंडळी होती . महाराजांनी रामदर्शन केले व अक्कांना नमस्कार करून विचारले कि - "सध्या समर्थ कुठे आहेत ?" . आक्का म्हणाल्या "शिंगणवाडीत मारुतीच्या सान्निध्यात आहेत ". आपले पत्र घेऊन कल्याण आताच तिकडे गेला आहे . तेव्हा आपण तिकडे जाण्याची इतकी घाई करू नये . दुपारपर्यंत इथेच थांबावे . रामरायाचा नैवेद्य झाल्यावर प्रसाद घयावा , तो पर्यंत समर्थांचा निरोप येईल त्या प्रमाणे करावे .

अक्कांचे म्हणणे शिवरायांना काही पटेना - " समर्थ दर्शन झाल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही , असा निर्धार केला आहे . " महाराज , आपण म्हणता ते बरोबर आहे पण , पण असेच गेलात तर कुणास ठाऊक समर्थांची भेट होईल याची , तेव्हा आपण कळवून गेलेले बरे . पण शिवरायांचा काही मन रमेना त्यांना आता समर्थ दर्शनाचे वेध लागले होते . शिंगणवाडीचा रस्ता माहिती नसून पण महाराज एकटेच पायी चालत निघाले . अनोळखी मुलुख म्हणून सोबत आलेले साथीदार पण महाराजांसोबत समर्थ दर्शनार्थ निघाले . कल्याणस्वामी नुकेतच शिवाजीमहाराजांचे पत्र घेऊन शिंगणवाडीस समर्थांजवळ आले होते . समर्थांनी ते पत्र वाचताच त्यांना शिवाजी महाराजांची तळमळ लक्षात अली . एवढ्यात शिवाजी महाराज शिंगणवाडीस पोहोचले आणि पाहतात तर समर्थ एका झाडाखाली बसले आहेत आणि शेजारी कल्याणस्वामी आहेत . पावलांची चाहूल लागताच समर्थ म्हणाले , कोण आहे ? कल्याण म्हणाले - "दिवाकरभट आले असून, सोबत ४-५ असामी आहेत ." समर्थ म्हणाले - " दिवाकरा , का आलास रे ?" दिवाकरभट म्हणाले , " महाराज , शिवाजीराजे दर्शनासाठी आले आहेत , त्यांना घेऊन आलो आहे . "

सद्गुरू दर्शन होताच शिवाजी महाराजांची तहान भूक सारी शमली , समर्थ चरणी दंडवत घालून ते नम्रतेने त्यांच्या पुढे उभे झाले . समर्थांनी शिवाजी महाराजांकड़े पहिले आणि ते म्हणाले - " तुमचे पत्र आताच पोहचले . पत्र आणि तुम्ही एकदमच आलात .इतकी घाई का केली ?"

शिवराय म्हणाले , " महाराज अनेक दिवसांपासून दर्शनाची तळमळ लागली होती , ती आज पुरी झाली ." समर्थ हसून म्हणाले , " राजा , इतक्या लांबून भेटीसाठी आलास , त्याचा हेतू काय ?" शिवराय म्हणाले , " आपले दर्शन व्हावे हीच ईच्छा होती . आणिक एक ईच्छा अशी आहे की , प्रसाद द्यावा ." आपला अनुग्रह हवा आहे . समर्थांनी पण शिवरायांची ईच्छा पूर्ण केली आणि पूजाविधी आटोपून शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला . मानवी जीवनात आणि राज्यकारभारात उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रश्न आणि शंका महाराजांनी समर्थांपुढे मांडल्या . समर्थांनी पण त्यांच्या सगळ्या प्रश्नांचे यथोचित उत्तरे दिली . ही सगळे उत्तरे ऐकत असतांना शिवरायांना कधी भाव समाधी लागली त्यांचं त्यांनाच कळलं नाही . समर्थांनी शिवाजी महाराजांच्या मस्तकावर हाथ ठेवून सांगितले , "राजा ,तू आता ज्या सुखात होतास त्यालाच आत्मसुख म्हणतात ."हे ऐकून शिवाजी महाराजांना गहिवरून आले आणि ते म्हणाले , महाराज आज आपण मला सनाथ केलेत . आत्मनामविवेक सांगून मला आपण निजसुखाचा अनुभव आणून दिला ." समर्थ म्हणाले , " राजा स्वानुभवाची थोडक्यात व्याख्या तुला सांगतो .

स्वानुभवाचे पालवी । शून्य गाळिलें आघवी ।
सघनी हरपलें गगन । सहज गगन ते सघन ।।
सदा शुद्ध स्वप्रकाश । अवकाशविणे आकाश ।
रामीरामदास म्हणे । स्वानुभवाची ही खूण ।।

समर्थांचा हा उपदेश ऐकून महाराज समाधान पावले . समर्थांनी त्यांना ३ दिवस चाफळ मठात मुक्कामी राहण्यास सांगितले . चाफळ माठातील समर्थ सान्निध्यात राहून आल्यावर शिवराय प्रतापगडी परत आले आणि झालेला सर्व वृत्तान्त त्यांनी जिजाऊंना सांगितला . प्रसादाचा रुमाल त्यांनी आई पुढे उघडा केला त्यात एक नारळ , खडे , माती ,लीद ह्या वस्तू पहिल्या . त्यांनी शिवाजीस "असला कसला रे प्रसाद समर्थांनी दिला ?" असे विचारले . तेव्हा शिवाजीराजे म्हणाले -" आई , नारळ माझ्या कल्याणासाठी आहे , माती म्हणजे पृथ्वी प्राप्त होईल . खडे म्हणजे किल्ले प्राप्त होतील व लीद म्हणजे अश्वदल प्राप्त होईल . असा त्यातला संकेत आहे . हे ऐकून मातुःश्रीस फार आनंद झाला .

समर्थ - मसूर शहापूर भागात निवासाला होते . प्रातः संध्या साठी ते संगमावर जात आणि सकाळी कोरान्न भिक्षा मागत . एके दिवशी एका वाड्याच्या दारावर उभे राहून त्यांनी " श्री राम जय राम जय जय राम " या मंत्राचा उद्गोष केला . ते ऐकल्या बरोबर घरातून एक बाई बाहेर अली आणि म्हणाली - " हे भरलं घर आहे , कृपा करून इथे राम म्हणू नका " . बाईंचा राग अनावर होऊन त्यांनी समर्थांना घालवून दिले . दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार घडला समर्थांनी दारावर रामनाम घेतले आणि बाई त्यांच्यावर चिडल्या , समर्थांची शांती काही ढळेना आणि बाई संताप सोडीना . एक दिवस असा आला की समर्थांचा श्लोक पुरा झाला , जय जयकार पण पुरा झाला तरी रोज चिडून येणारी बाई अजून बाहेर कशी नाही बरे - थोड्या वेळानी बाई अतिशय खिन्नपणे बाहेर आल्या आणि म्हणाल्या - " तुला , सांगितलं होत कि भरल्या घरात राम नको म्हणू ? आता घरचं झालाय वाटोळं , त्यात तू अजून भर नको घालूस ". समर्थ म्हणाले - बाई , माझ्या नामस्मरणामुळे जर तुमच्या घरात काही आपदा आली असेल तर कृपा करून ती मला सांगावी बघू या काय करता येईल ते . बाई संतापून म्हणाली - जे संकट आला आहे ते तुला सांगून काही उपयोग आहे का ? "अरे बाबा , असे विरागी आणि गोसाव्यांकडून कामं झाली असती तर गावात काय कमी गिसावी आहेत ?" बाई काय झालं आहे ते सांगा तरी एकदा . बाईंनी सर्व हकीगत सांगितली - " कऱ्हाड प्रांती आदिलशाही दरबारात त्यांचे यजमान कुलकर्णी पद चालवितात , प्रांतात वसुलीच्या कारणाने बंडाई झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे , यवन अधिकाऱ्याने नेऊन त्यांना आता १५ दिवस झाले आहेत आणि आम्ही त्यांच्या सुटकेची वाट बघतो आहोत . समर्थांनी सर्व हकीगत ऐकल्या नंतर , मी आपल्या यजमानांना ११ दिवसात सोडवून आणतो त्या बद्दल तुम्ही मला कोणती भिक्षा घालाल ? बाई म्हणाल्या - " मागाल ते देईन - " देवाला सुवर्ण , वस्त्रालंकार , दक्षिणा सगळं काही - तेव्हा समर्थ म्हणाले बाई हे सगळं आम्हाला मृत्तिकेसमान आहे , तेव्हा ज्या राम नामाचा तुम्ही तिरस्कार करता ते नाम तुम्ही सदैव या भरल्या घरात घ्यावे ही अट आहे . बाईंनी ही अट मान्य केली . समर्थ तेथून निघाले ते थेट विजापूरच्या दरबारात कारकुनाच्या रूपात पोचले . तेथे त्यांनी कुलकर्णी बद्दल नीट माहिती घेतली आणि जमा करायची रक्कम भरली आणि त्यांची सुटका केली . कुलकर्ण्यांना आपली अचानक कशी काय सुटका झाली याच आश्चर्य वाटलं - तेव्हा त्यांनी वाटेत सर्व हकीगत सांगितली -आपल्या घराकडून आलो आहो आणि बाईंनी ही रक्कम दिली आहे तेव्हा आपण निश्चिन्त घरी चालावे. समर्थ आणि ते गृहस्थ दाराच्या वेशीपर्यंत सोबत आले आणि जेव्हा त्यांनी मागे वळून बघितले तेव्हा समर्थ अदृश्य झाले . कुलकर्णी घरी परत आले , बाईंना दिलेल्या वचनाप्रमाणे तो ११ वा दिवस होता .

बाजीपंत शहापूरकर घरी परत आले . आपण आपल्या उपकारकर्त्या माणसाला नाही नाही ते बोललो याचं सतीबाईंना फार दुःख आणि पश्चाताप झाला . आपण त्यांच्याशी नीट बोललॊ असतो तर किमान आपल्याला त्यांचा पत्ता तरी कळला असता , असे त्यांना वाटू लागले . कुलकर्ण्यांना सुद्धा आपल्या उपकारकर्त्याचे ऋण फेडता नाही आल्याचे शल्य वाटू लागले .

भुकेलिया बाळ अतिशोक करी । वाट पाहे परी माऊलीची ।।
अशी त्यांची स्थिती झाली . बाजीपंत ,सतीबाई व दत्ताजी समर्थशोधास्ताव तीन दिवस निराहार भटकले . समर्थांना ते कळले आणि चौथ्या दिवशी सकाळी "जय जय रघुवीर समर्थ " अशी गर्जना करीत ते घरासमोर उभे ठाकले . ती गर्जना ऐकताच सर्वजण समर्थांकडे धावले आणि त्यांनी त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला . सतीबाईंनी समर्थांचा अनुग्रह घेतला . सतीबाईंची समर्थांवरची श्रद्धा होती . समर्थ चरणांचे तीर्थ घेतल्या शिवाय त्या जेवत नसत . एकदा समर्थांचे दहा दिवस दर्शन झाले नाही म्हणून त्या उपोषित होत्या . समर्थांना हे कळले तेव्हा त्यांनी असले काही नियम करू नये म्हणून सांगितले , पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या . एकदा असेच समर्थांचे तीन दिवस दर्शन झाले नाही - म्हणून त्या थोडं पीठ घेऊन मसूर-शहापूरच्या खिंडी शोधू लागल्या . फिरता फिरता त्यांना अरण्यात समर्थ क्रूर श्वापदाच्या जवळ बसलेले दिसले त्यांनी त्या प्राण्याची पर्वा न करता समर्थ दर्श घेतले . समर्थांना सतीबाईंची निष्ठा आवडली . त्यांनी बाईंना रामरायासाठी नैवेद्य करा म्हणून आज्ञा केली . त्यांनी केलेला नैवेद्य समर्थांनी रामरायाला दाखवला व समर्थ म्हणाले - " मी , मारुतीरायांना नैवेद्य समर्पण करून आलोच मी म्हणेस्तोवर मागे वळून नाही पाहायचा". पण न राहवून त्यांनी मागे वळून बघितलं आणि बघतो तर काय - समर्थ आणि मारुतीराया सोबत जेवत होते . मारुतीरायांचे ते तेज त्यांच्या चर्मचक्षूंना सहन झाले नाही आणि त्या मूर्च्छित पडल्या . समर्थांनी त्यांना सावध केले आणि शहापूरला याच प्रतापमारुतीची स्थापना केली आणि याची पूजा अर्चा करायला सांगितली . नंतर पुढे समर्थ चाफळ खोऱ्यास जायला निघाले .

याच सुमारास शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले नरसोमल अंबारखाने यांची निष्ठा पाहून समर्थांनी त्यास अनुग्रह दिला .तसेच कऱ्हाडास सुदाजीपंत कऱ्हाडकरांच्या त्यांची बालविधवा बहीण अक्का म्हणून होती . तिला समर्थांनी अनुग्रह दिला .

समर्थ अंगापुरला कृष्णाकाठी मारुतीचे ध्यान करत असतांना त्यांना वरचे वर श्रीरामाचे ध्यान लागत होते . असं का होत आहे , हा प्रश्न पडताच ,डोहातून वाणी प्रगट झाली - " तुम्ही , माझ्या मूर्तीच्या चिंतेत आहात ना ? माझ्या मूर्ती ह्या डोहांत आहेत , त्या काढा आणि त्यांची प्रतिष्ठापना करा ". त्यांनी डोहातून रामरायाच्या मूर्ति बाहेर काढल्या . शेजारीच महिषासुरमर्दिनीची मूर्ति होती . तीहि समर्थांनी वर आणली समर्थांनी मूर्ति काढल्या , हे गुराख्यानी गावात सांगितले . पाटील आले . त्यांनी समर्थांना सांगितले ," आमच्या वाडवडिलांनी यवनांच्या भीतीने मूर्ति डोहात टाकल्या ;त्या आमच्या आहेत . " समर्थ म्हणाले ."ठीक आहे ". मूर्ति तशाच ठेवून समर्थ तिथून निघून गेलेत . गावकऱ्यांनी समर्थ गेल्यानंतर मूर्ति उचलल्या पण काही केल्या मूर्ति हालेच ना ! तेव्हा गावकऱ्यांनी चाफळ ला समर्थांना विनंती केली की , "मूर्ति आपलीच आहे , आपण ती आणि त्यांची प्राणप्रतिष्ठापना करावी . समर्थांनी आपले शिष्य भानजी गोसावी यांना ती मूर्ति आणण्याची आज्ञा दिली . समर्थांनी उत्सवाच्या सेवेचा मान अंगापूरकरांना दिला .

समर्थांना मूर्ति तर मिळाली पण चाफळास गावकऱ्यांना जागा मागितली तेव्हा त्यांनी मांड नदीच्या काठी कुंभार डोहाजवळची जागा दाखविली . ती जागा शापित आणि भूत पिशाच्च यांची होती. समर्थांना एक जागा आवडली तिथे शेंदूर लावलेले भरपूर दगड होते . समर्थ एक एक करत दगड डोहात फेकत चालले होते , एका मोठ्या दगडाला हात लावताच त्यातून म्हसोबा प्रगट झाले व विनंती करू लागले . महाराज , आपण सर्वांप्रती , समभाव ठेवणारे आहात , मग आमच्यावर कोप का ? आम्हा सर्वांना स्थान भ्रष्ट का केले ? " समर्थ म्हणाले , " येथे मला माझ्या रामरायाचे मंदिर बांधावयाचे आहे . येथे उत्सव होणार , यात्रा होणार ,अनेक भक्त मंडळी येणार . अशांना तुमचा त्रास होण्यापेक्षा तुम्हाला दूर ठेवणे बरे ". म्हसोबाने विनंती केली , "महाराज आम्हाला डोहात फेकण्यापेक्षा एखादी दुसरी जागा द्यावी . आम्ही तेथे निवांत राहू ". समर्थांनी म्हसोबाला टेकडीखाली दक्षिणेस जांभळीखाली राहा म्हणून आज्ञा केली . म्हसोबाने पुनः प्रश्न केला कि आमच्या उदरपूर्तीसाठी काय ?

तेव्हा समर्थ म्हणाले - "उत्सवाच्या वेळीं रथ ओढण्याच्या आदल्या दिवशी आणि रथ ओढण्यापूर्वी मापटेभर तांदूळ व नारळ दिल्या जाईल व रथ आल्यानंतर श्रीवरून ओवाळलेला दहीभात मिळेल . त्यावर तुम्ही संतुष्ट राहावे व कोणालाही उपद्रव करू नये ." हे ऐकताच म्हसोबा आपल्या गणांसह नियोजित स्थळी निघून गेले . समर्थांनी िथे मठस्थापना करून श्रीरामरायचे मंदिर बांधले व शके १५७० मध्ये उत्सवास सुरुरवात केली .

समर्थ गावोगावी फिरत असतांना त्यांना एक दाम्पत्य भेटले आणि त्यांनी आपला मुलगा समर्थांच्या चरणी वाहिला . या मुलाचे नाव मधुकर होते . वर्ण गोरा ,सरळ नाक , बोलण्याची लकब,धीटपणा या सर्व गुणांमुळे हा मुलगा अत्यंत तरतरीत दिसत असे . समर्थांनी एकवार या मुलाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि हा आपल्या संप्रदायात घेण्यास योग्य आहे,असे वाटून त्याला दीक्षा दिली . आपल्याबरोबर ते मधुकराला नेऊ लागले . एके दिवशी फिरता - फिरता ते एका गावामध्ये आले गावात कुणीच ओळखीचं नसल्याने त्यांनी मारुतीरायाच्या मंदिरात मुक्काम केला . दुपार झाल्याने समर्थांनी मधुकरला माधुकरी मागायला पाठविले . त्याने आपली झोळी घेतली व गावाकडे जायला निघाला . गावातून हिंडत असतांना काही चावडीबहाद्दरांनी मधुकरला प्रश्न विचारले - " कोण तू ? कुठून आलास ? इथे काय करतो आहे वगैरे " त्याने पण या प्रश्नांची तेवढ्याच धिटाईने उत्तरे दिली . तेवढ्यात एक गृहस्थ तिथे आले व म्हणाले आम्ही तुला माधुकरी दिली असती , पण आमचे जेवणं झाले आहेत आणि गावात बहुतेकांचे जेवण आटोपले असणार तेव्हा तू एक काम कर या गावात सगळ्यात श्रीमंत आणि उशिरा जेवणारे गृहस्थ म्हणजे जोशीबुवा त्यांच्या कडे तू जा . तिथे तुला १० घरची माधुकरी मिळेल . हे ऐकून मधुकरला आनंद झाला - तो त्यांच्या वाड्यावर गेला आणि मोठ्याने त्याने श्लोक म्हणायला सुरुवात केली .

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्वभूमंडळी कोण आहे ।।
जायची लिला वर्णिती लोक तिन्ही ।
नुपेक्षीकदा रामदासाभिमानी ।।
-- जय जय रघुवीर समर्थ
हा श्लोक ऐकताच जोशीबुवा बाहेर आले आणि त्यांनी पोरवयाच्या मधुकर कडे पाहून त्याची खोदाई काढण्याचा विचार केला आणि म्हणाले . पोरा एवढ्या लहान वयात हा श्लोक कुठून शिकलास आणि नुसताच श्लोक म्हणतो की त्याचा अर्थ पण कळतो का ? की नुसतीच घोकमपट्टी ? मधुकरने अतिशय शांतपणे जोशीबुवाना उत्तर दिले आणि श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला . समर्थांच्या सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहण्याची , या सर्व भूमंडळाच्या ठिकाणी कुणालाही प्रज्ञा नाही आणि ज्याच्या लीलांचे वर्णन अखिल त्रैलोक्य , करते तो माझा राम दासाबद्दल अभिमान धारण करणारा असून दासाची कधीच उपेक्षा करत नाही". हे ऐकून जोशीबुवांचा पारा अधिकच चढला . त्यांनी मनात म्हटले - " आपल्या सेवका कडे वाकड्या नजरेनी बघण्याची प्रज्ञा कुणात नाही असं म्हणणारा हा समर्थ आहे तरी कोण एकदा बघितले पाहिजे , असे म्हणत त्यांनी मधुकरला आत बोलावले .

ओसरीवर बसवून त्यांनी त्याची जन्मवेळ विचारली आणि त्याच्या पत्रिकेचं टिपण काढू लागले . पत्रिकेत बघून ते म्हणाले - " उद्या मध्यान्न समयी तुझा मृत्यू आहे, उद्या तू मारणार आहेस . " तेव्हा उद्या जर तुझ्या समर्थांनी तुला मृत्यूपासून सोडविले तर परवा मी तुला नक्की माधुकरी घालीन . तेव्हा तू आता इथून निघ . हे ऐकून मधुकर गलितगात्र झाला , कसे बसे ४ घरी जाऊन त्याने माधुकरी आणली आणि तो समर्थांजवळ परत आला .

मधुकर समर्थांजवळ परत आला आणि ओक्शाबोक्शी रडू लागला , समर्थ त्याला विचारू लागले तुला कुणी रागवला का ? कुणी काही बोललं का ? तेव्हा त्याने जोशी बुवांनकडे घडलेला प्रसंग सांगितला . समर्थ म्हणाले ठीक आहे त्यांनी तुझा मृत्यू उद्या दुपारी असल्याच सांगितलं आहे ना मग चल , जाण्या आधी २ घास तेवढे खाऊन घे . मधुकरला आपल्या आई वडलांची घरच्यांची आठवण अली , अचानक त्याला बरे नव्हते वाटत शरीरात काहींच त्राण नसल्यागत त्याला भासू लागले . समर्थ त्याला समजावू लागले आणि आपल्या मांडीवर त्याला त्या रात्री निजवले . सकाळी मधुकर उठला तेव्हा समर्थ आपले स्नान संध्या आटोपून आले होते . मधुकर तब्येतीने अधिक खचला होता , काल रात्रीच्या जागरणाने समर्थांना पण थकवा आला होता त्यामुळे त्यांनी मधुकरला - मी आता थोडा वेळ पडतो असे सांगितले , मधुकर म्हणाला महाराज , दुपारी माझा मृत्यू आहे तेव्हा आपण ... माझ्या सोबत राहा . समर्थ म्हणाले - ते काही नाही , मी आता थकलो आहे तेव्हा मी आता थोडा वेळ झोपतो , तू मात्र मी उठत पर्यंत या घोंगडी वरून नाही हालयच .

थोड्या वेळानी दारात यमदूत आले , अंतःकाली सद्गुरू सेवा म्हणून मधुकर समर्थांचे पाय चेपत बसला . यमदूत मधुकराला म्हणाले आम्ही तुला न्यायला आलो आहे तेव्हा मुकाट्याने बाहेर ये अन्यथा आम्ही तुला बंदी करून घेऊन जाऊ . मधुकर म्हणाला - माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे , आणि त्यांनी मला या जागेवरून हलण्यास मनाई केली आहे . तेव्हा आपण जे कुणी आहात - मुकाट्याने परत जा मी आपल्या सोबत काही येऊ शकत नाही . यमदूतांनी आपले पाश मधुकर जवळ फेकले पण काही केल्या ते पाश घोंगडी पर्यंत पोचू शकले नाही . शेवटी नाईलाजास्तव ते यमदूत परत गेले आणि त्यांनी यमाला ही हकीगत सांगितली . काही काळानी यमराज आले . त्यांनी मधुकर ला बोलावले पण - मधुकर नी तेच उत्तर दिले , त्यांनी पण आपले पाश मधुकर जवळ फेकले पण घोंगडी पर्यंत सुद्धा ते पाश नाही पोचू शकले . शेवटी न रहावुन यमराज सुद्धा परत गेले .

थोड्या वेळानी समर्थ उठले आणि त्यांनी विचारले काय रे मधुकर कुणी आलं होतं का ? तेव्हा मधुकरने झालेला सगळा प्रकार सांगितला - समर्थ म्हणाले मधुकरा आता दुपार टळली - तेव्हा तुझ्या मृत्यूची वेळ पण आता टळली आहे तेव्हा आता तू निश्चिन्त राहा . त्यादिवशी रात्री पण मधुकर ती घोंगडी स्वतः जवळ ठेवून झोपला . दुसऱ्या दिवशी मधुकर उठला आणि माधुकरी मागायला जोशीबुवांच्या घरी गेला . मधुकर जिवंत आहे हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं . आणि खरंच हे समर्थ नावाची असामी कोण आहे ते बघायला ते गेले . समर्थांनी भेटता क्षणी त्यांना विचारले - काय जोशी बुवा सध्या काय उद्योग सुरु आहे आपला , त्यांनी सांगीतलं की , ज्योतिष्याचा माझा व्यवसाय आहे पत्रिका बघून लोकांचे भविष्य सांगतो . समर्थ त्यावर चिडून म्हणाले , पत्रिका बघून लोकांची मृत्यूची वेळ सांगण्यापेक्षा - लोकांना योग्य रीतीने भविष्य सांगायचे व त्यांचा अधिकाधिक वेळ सत्कर्मी व भागवत्भक्तीत कसा लागेल ते सांगावे . समर्थांचे ते बोल ऐकून जोशीबुवांना पश्चाताप झाला आणि झालेली चूक लक्षात आली

कल्याणगोसावी , उद्धवगोसावी यांच्या तोलाचे समर्थांचे मुसळरामगोसावी नावाचे शिष्य मसूर मठावर नेमले होते . ते एकदा समर्थांच्या दर्शनाकरिता निघाले असता वाटेत त्यांचा मुक्काम एका खेड्यात पडला . तेथे ते एका कुलकर्णी नावाच्या गृहस्थाकडे मुक्कामी होते . ते गृहस्थ शाक्त होते . काही शाक्त व्यक्तींकडे देवीला नैवेद्या मध्ये मांसाहार पण असतो . हा नैवेद्य शास्त्रा प्रमाणे मर्यादित असल्यास काही हरकत नाही . कारण नित्य संध्ये मध्ये सुद्धा "मांसशोणितभक्षणे " असा उल्लेख आहे . देवीला मद्य मासाचा नैवेद्य लागतो ह्यानियमाखाली कित्येक शाक्त मद्यमासाचा अधीर होतात . म्हणून तुकोबा म्हणतात -

शाक्त गधडा जये देशीं।तेथे राशी पातकाची।।१।।
सुकृताचा उदो झाला।गोंधळ घालिती सावकाश।।२।।

मुसळरामांनी कपाळावर शेंदूर लावला होता , हे पाहून त्या ब्राह्मणास वाटलेकी , हे शाक्त असावेत . म्हणून त्यांनी त्यांच्या पानात मद्य वाढले . तिथे जमलेले सर्वजण शाक्त होते . मुसळराम अनेक मंत्रतंत्रात पारंगत होते . त्यांना शाक्तांनी केलेले हे कृत्य लक्षात आले . ते शरीरानीही मजबूत होते . ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत . त्यांचे नावमुसळराम असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या खांद्यावर ७ फूट उंचीचे आणि २० किलो वजनाचे मुसळ नेहमी असे . मुसळावर प्रताप मारुती कोरलेला असे . मुसळराम त्या १०-१२ जणास भारी होते , पण समर्थ आज्ञेखेरीज , आपल्या शक्तीचा आणि मंत्रतंत्रांचा उपयोग करायचा नाही असा त्यांचा दंडक होता .त्यांनी मनोमन समर्थांचे ध्यान केले आणि समर्थ त्यांच्यामागे उभे झाले . मुसळरामांनी वाढलेले मद्य संपवून टाकले आणि तो शाक्त त्यांना पुन्हा पुन्हा वाढू लागला आपण वाढलेले मद्य हा व्यक्ती संपवतो आहे हे पाहून ह्याला आपण इथेच पुरून टाकावे असा त्याने विचार केला . मुसळरामना तो कोयत्याने तोडणार तेवढ्यात समर्थ प्रगट झाले त्यांनी शाक्तास जबरदस्त शिक्षा केली व श्लोक म्हटला .

होती साधकें शाक्तसंगे।चळे सारविचार त्याकामरंगे।
म्हणोनि न कोरे मना संगत्याचा।म्हणे दास उदास सर्वोत्तमाचा।।

मुसळरामगोसावी मसूरास असतांना एकदा मध्यान्नस्नानासाठी ओढ्यावरआले . वाटेत काही पठाणांनी त्यांना अडविले व त्यांची जरा गम्मत करत म्हणाले , "गोसावीबुवा , ते मुसळ खाली टाका आणि मग पुढे जा ". मुसळराम म्हणाले , "मुसळ टाकतो , पण ते तुम्ही उचलले पाहिजे ." पठाण म्हणाले , " मुसळच काय , तुलापण उचलू !" मुसळरामांनी "ठीकआहे " असे म्हणून मुसळखाली टाकले . त्यांच्यातील एका आडदांडपठाणाने ते मुसळ उचलून मुसळरामयांच्या टाळक्यात मारण्याचा विचार केला . पठाणाने मुसळास हात घातला , पण मुसळ उचलता येईना . मुसळ त्याला उचलत नाही हे पाहून त्याच्या मदतीला दुसरा पठाण धावला , तरी सुद्धा ते मुसळ हालत नाही आहे हे पाहून एका पठाणाने संतापून मुसळराम यांना मारण्यास धावला , तोच समर्थ तेथे वेताची काडी घेऊन अदृश्य रूपात आले आणि त्यांना छडीचे तडाखे देऊ लागले , समर्थाना पाहताच पठाणांची दाणादाण उडाली आणि ते समर्थास शरण आले .

साताऱ्यास एकदा एक पोटभरू कीर्तनकार आला होता . तो केवळ पोट भरण्यासाठी कीर्तन करीत असे . त्याच्या जवळ काही शाबरी विद्या होती . कीर्तन झाल्यावर तो लोकांना असे सांगे : "श्रोतेहो शांत राहा , आता कीर्तन समाप्त झाले आहे . "उपासनेचा मोठा आश्रयो " या समर्थवचनाप्रमाणे मी एक कोटी गायत्रीचा जप केला आहे . मी समर्थशिष्य आहे . माझ्यासारखा समर्थशिष्यात इतर कोणीही नाही . सध्या मुसळराम इथेच आहेत , असे समजते पण माझ्या कीर्तनास यायची त्यांची हिम्मत नाही .तरी आता माझ्या देवतेचे सामर्थ्य पहा . असे म्हणून कीर्तनकाराने वर हात केला , त्याबरोबर फुले ,खारका ,बत्तासे , पेढे ,रेवड्या इत्यादी खाद्य पदार्थ वरून खाली पडले . हा चमत्कार पाहून सर्वाना आश्चर्य वाटले . सर्वजण त्यातला प्रसाद घेऊन घरी गेले . हे वर्तमान मुसळराम यांच्या कर्णोपकर्णी गेले . मुसळराम म्हणाले , " तो समर्थांचा शिष्य आहे ? आणि तो समर्थांना न विचारता असे चमत्कार करतो ? कोणीही समर्थशिष्य समर्थांच्या आज्ञेशिवाय असे करणार नाही . हा कोणी तरी भोंदू कीर्तनकार असला पाहिजे . मी उद्या कीर्तनास येतो . तुम्ही काही बोलून गवगवा करू नका . ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मुसळराम कीर्तनास हजर झाले व बाहेर दरवाज्यात उभे राहिले . कीर्तन संपले . बुवांनी मंडळींना सांगितले की , "मंडळी हो , आज पेढ्याचा प्रसाद आहे , तरी तोंड वर करून प्रसाद खाण्यास तयार राहा. " ह्या बुवाजवळ शाबरी विद्या आहे , हे मुसळरामांनी ओळखले व भुतांच्या प्रतिनिधीस बोलावून सांगितले की , "आजच्या कीर्तनाच्या शेवटी बुवांनी तुम्हाला हाक मारली की तुम्ही विष्टा , शेण , मद्य , मास ,हाडे वगैरे टाका ." त्याप्रमाणे बुवांनी आपल्या देवतेस हाक मारली व "आज पेढे प्रसाद द्या " म्हटले . त्याबरोबर मंडळीस वर नमूद केल्याप्रमाणे प्रसाद मिळाला .त्याबरोबर मंडळीनी बुवाला लाथा बुक्क्या मारल्या , कुणी त्याचा अंगरखा फाडला , उपरणे फेकून दिले . हे सगळं दृश्य पाहून मुसळराम यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्या कीर्तनकारास सोडविले . ते त्यास म्हणाले की , इथून पुढे पोटासाठी , ही चेटकी विद्या उपयोगात आणू नका ." कीर्तनकार मुसळरामास शरण आला व ते कीर्तनकाराला समर्थांकडे घेऊन गेले . समर्थ त्याला म्हणाले - "असा जादूटोणा का करता ?" कीर्तनकार म्हणाला -"माझ्या मुलीचे लग्न आहे .पैश्याची उणीव आहे ." एवढाच ना ? " समर्थ म्हणाले , " मी त्याची सोया करतो ." पुढे समर्थानी राजश्री कडून अडीच हजार रुपये कीर्तनकारास दिले व सांगितले कीं , आडमार्गाने जाऊ नका . रामरायाची सेवा करा .त्याच्या कृपेने काही कमी पडणार नाही .

" दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देईल कोण ।। "
हे लक्षात ठेवून वागा .

समर्थ जरंडेश्वरी असतांना शिवाजी महाराजांनी त्यांना साताऱ्याला आणले . समर्थ साताऱ्यात आहे कळताच , रांगनाथस्वामी त्यांना भेटायला निघाले व ते साताऱ्यात आले . शिवाजी महाराजांनी त्यांना साताऱ्यातून जातांना पहिले , त्यांचा तो भरजरी पोशाख , घोड्यावरची सवारी , मागे २०-२५ शिष्य लंगोटी मधे जातांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले . याला योगी म्हणावे तर अंगावर भरजरी कपडे , सरदार म्हणावे तर लंगोटी बद्ध शिष्य नेहमी जवळ . शेवटी न राहवून शिवाजी महाराजांनी आपल्या हुजऱ्यां ला पाठवले . रंगनाथ स्वामींनी आपले नाव,गाव व आगमनाचे कारण हे सर्व निवेदन केले .

शिवाजी महाराजांनी त्यांना परत निरोप पाठवला - "समर्थ येथेच आहेत , तेव्हा आज्ञा होताच आपण इथेच मुक्काम करावा आणि निरोप येताच इकडे भोजनास यावे . समर्थांनी अंतर्ज्ञानाने ही गोष्ट ओळखली आणि ते तिथे आले , येताच त्यांनी भोजनाची व्यवस्था करायला सांगितली . शिवाजी महाराज म्हणाले , " महाराज , रंगनाथस्वामी म्हणून कुणी व्यक्ती आली आहे - स्वतःला योगी म्हणवतात पण लोभाची आकांक्षा काही सुटली नाही , अशी त्यांची स्थिती आहे . समर्थ म्हणाले , रंगोबा ? अरे तो रंगोबा तर भ्रष्ट आहे . " त्याच्या पंक्तीला मला बसवणार आहे वाटतं ? मी जेवावे अशी जर तुमची उच्च असेल तर त्याला न येण्याबद्दल निरोप पाठवा ." लगेच शिवाजी महाराजांनी - खासनीसातर्फे , रंगनाथ स्वामींना निरोप देण्यास पाठवला . भोजनास आम्ही येऊ नये अशी राजांची ईच्छा आहे ना ! काही हरकत नाही आम्ही इथे स्वयंपाक करू व भोजन आटोपून येऊ असं सांगा .

रंगनाथस्वामींनी शिष्यांना जेवणाची तयारी करायला सांगितली , तेव्हा एक शिष्य म्हणाला - शिवाजी महाराजांकडे मुक्कामी जायचे असल्याने सगळा शिधा संपविला आहे . रंगनाथस्वामी म्हणाले - "अंगणात काही असेल तर बघा - शिष्य म्हणाला अंगणात खायला काहीच नाही आहे , नाही म्हणायला एक रेडा आहे ." स्वामी म्हणाले आणा तो रेडा इकडे , आज त्याचंच नैवेद्य खाऊ आपण . हे ऐकून खासनींस लटपटा कापू लागला . तेवढ्यात रंगनाथस्वामींनी एक सूरी घेतली आणि तो रेडा कापला . हे दृश्य पाहून खासनीस घाबरून परत आला . पण तो काहीच बोलेना - मी निरोप सांगितला एवढं सांगून तो चालला गेला . शेवटी काय प्रकार आहे हे बघायला स्वतः समर्थ आणि शिवाजी महाराज निघाले - रंगोबा म्हणून हाक मारताच , रंगनाथस्वामींनी स्वतः दार उघडले व त्यांना बसायला आसन दिले . स्वतः रंगोबा समर्थांची पद्य पूजा करू लागले . समर्थ म्हणाले , " आज विशेष भक्ती चाललेली दिसते ?" रंगनाथ स्वामी म्हणाले ,"महाराज , आपल्यासारखा असामान्य अतिथी आला आहे . तेव्हा अतिथी पूजनाची संधी कशी दवडू ?" समर्थ म्हणाले , आपल्याबरोबर तू आम्हालाही भ्रष्ट करणार वाटते ?" रंगनाथस्वामी म्हणाले , "तसं काही नाही . ईच्छा असेल तर पान मांडतो , नाहीतर आपल्या पूजनाचे पुण्य तरी जोडतो ." हे ऐकून समर्थ शिवाजीस म्हणाले , " शिवबा , पाहिलेस ! रेडा कापून वर कशा लांब लांब गप्पा चालल्या आहेत ह्याच्या ! शिवबा म्हणाले , "महाराज ! मला यातले काहीच कळत नाहीं . पण माझ्या हातून झालेल्या चुकीचे शासन चालले आहे की काय न कळे ! " पाने मांडून तयार झाली . समर्थ म्हणाले , "शिवबा , यांच्या पंक्तीला बसून आम्ही भ्रष्ट होणार , ईच्छा असेल तर तुम्हीही बसा ." समर्थांची आज्ञा होईल तसे करिन ." शिवराय म्हणाले . पाने वाढून झाली . नैवेद्य झाला . इतक्यात समर्थ म्हणाले , "रंगोबा , दारांत मेलेला रेडा पडला आहे , त्याला उठवून लावा ना . घरात प्रेत ठेवून आपण भोजन करायचे हे योग्य नाही ." रंगनाथस्वामींनी समर्थांचे चरणतीर्थ घेतलें आणि " जय जय रघुवीर समर्थ " म्हणून रेड्याच्या अस्थिचर्मावर शिपंडताच रेडा परत जिवंत झाला .

रंगनाथस्वामींच्या सामर्थ्याची कल्पना सर्वांना आली . नंतर भोजन झाल्यावर तांबुलसेवन चालले असतां रंगनाथस्वामींनी समर्थांवर कटिबंध तयार केला . नंतर सर्वजण राजवाड्यात आले . आपण रंगनाथस्वामींना हीन लेखलें म्हणून हा प्रसंग समर्थांनी घडवून आणला , अशी शिवबांची खात्री पटली . समर्थांना नमस्कार करून ते म्हणाले , "महाराज , क्षमा करा . चूक झाली माझी ." समर्थ म्हणाले , " तुझ्या सत्चरित्राला कलंक लागू नये म्हणून मला ही योजना करावी लागली . तुझ्या राज्यात साधू - सत्पुरुष केव्हा कोणत्या रूपाने येतील , हे सांगता येणार नाही . शिवाजी महाराजांनी समर्थचरणी लोटांगण घालून " राज्यात कोणत्याही साधूचा अगर सत्पुरुषाचा अवमान होऊ नये ' अशी सेवकांना आज्ञा दिली .

समर्थ मातापुरी गेले . तेथे देवीचे दर्शन घेऊन , श्रीदत्त्तात्रेयांचे स्थान आहे , तेथे ते गेले . तोच अनुष्ठान करीत बसलेले दहापाच ब्राह्माण दिसले . त्यांस विचारले कीं , "तुम्ही येथे का बसला ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की , " श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाकरिता अनुष्ठान करीत आहोत ." ते ऐकून समर्थ बोलले की , "उत्तम आहे .तुमच्या समागमे आम्हासही दर्शन घडेल ."असे म्हणून आपणहि तेथे बसले . एक मुहूर्तानंतर श्रीदत्तात्रेयांनी मलंग फकिराचा वेष धारण केला व एक बायको , तीन मुले ,पंचवीस कोंबडी , सहा बकरी , एक रेडा यांसह देवालयाजवळ आले आणि चांगली जागा पाहून स्त्रियेला बोलले की , "यहाँ खाना खानेका इरादा है । इस वास्ते हंडी पकाना । " असे म्हणताच त्या स्त्रीने रेड्यावरून ओझे उतरले . तिनें चूल मांडून तिजवर एक घागर पाणी मावण्याइतकी हंडी चढवली . तिने विचारले , " हंडीमे क्या डालना ? " तेव्हा फकीर बोलला कीं , " मुर्गी काटके डाल । " असे म्हणताच तिने पंचवीस कोंबडी होत्या त्या कापून हंडीमध्ये टाकल्या . तथापि हंडी रिकामी पाहून त्या मलंग स्त्रीने सांगितले की , "हंडी भरी नही ।" असे म्हणताच मलंग फकीर म्हणाला , " बकरीयां काय काट के डालो " ह्याप्रमाणे बकरीहि कापून हंडीत टाकली व म्हणाली की , "अबतक हंडी भरी नही ।" असे म्हणताच मलंग फकीर म्हणाला की, " छोरे काट के डालो । "हे ऐकून तिने मुले कापून हंडीत घातली आणि म्हणाली , "अबतक हंडी भरी नही ।" तेव्हा त्याने पुनः सांगितले कीं , " रेडा काटकर डाल । " असे बोलताच तिने रेडा कापून हंडीत घातला . परंतु हंडी भरली नाही , असे बायकोने सांगितले . तेव्हा फकीर बोलला की , "इन बम्मनोको काटकर डालो । " असे म्हणताच बाई सुरी घेऊन ब्राह्माणांकडे धावली . ब्राह्मणांनीं तिचे पूर्वीचे कृत्य पहिल्यामुळे ही आपणास पण कापील खरी , असा निश्चय करून आसन , जपविधी , माळा व गोमुखी वगैरे अवघे टाकून ते सर्व पळाले . रामदासस्वामी , कल्याण आणि उध्दव हे फक्त राहिले . हे पाहून बाई फकीरास म्हणाली कीं , "सब बम्मन भाग गाये ।" फकीर बोलला , "अच्छा , बहुत बेहत्तर हुआ । हंडी भरी नही , इस वास्ते जो एक बैठा है और दो खडे है उनको काटकर डालो । " ते ऐकून "जी हुकूम " म्हणून बाई हाती सुरी घेऊन हसतच कापण्यास आली हें पाहून समर्थांनी हास्यवदन होऊन मान पुढे केली . असे पाहून त्याजकडे न जाता बाई प्रथम कल्याण व उद्धव यांच्याकडे गेली . त्यासमयी त्यांनीही मान पुढे केली .

हे दत्तात्रेयमहाराजांनी पाहिले . प्रसन्न होऊन त्यांनी आपले मूळ रूप प्रगट केलें . हंडी ,बाई वगैरे सर्व गुप्त झाले . तेव्हा "रामदासा , आत ये " असा शब्द मंदिरातून आला . त्या समयी स्वामींनी आंत जाऊन साष्टांग नमस्कार केला . तेव्हा श्रीदत्तात्रेयमहाराजांनी मस्तकी हात ठेवून समर्थास उठविले . स्वामींनी श्रीदत्तांची पूजा करून बहुत प्रकारे स्तवन केले . तेणेकरून श्रीदत्तात्रेयस्वामीस बहुत संतोष झाला व त्यांनी समर्थास विचारले की , "श्रींची जी आज्ञा तीच आपली आज्ञा . त्याप्रमाणे सर्व करीत आहे ." तेव्हा श्रीदत्तात्रेय बोलले कीं , "तुम्ही येऊन दर्शन घेऊन जावे , ते न करता ब्राह्माणांजवळ बसण्याचे कारण काय ? " समर्थ उत्तरले , " गरीब ब्राह्मण दर्शनाकरितां बसले होते . त्यांची इच्छा पूर्ण होईल म्हणून मीहि त्यांच्याजवळ बसलों होतों . पुढे पाहतो तों आपण प्रत्यक्ष येऊन दर्शन न देतां उलट भय दाखवून सर्व ब्रह्मणास पळविले . हे स्वामींस योग्य कीं अयोग्य ? " ते ऐकून दत्तात्रेयांनी हास्य करून उत्तर दिले की , " ब्राह्मणास दर्शन दिलें पाहिजे ." तेव्हां श्रीदत्तांनी सांगितले की , तू त्यांना अधीकारी कर , म्हणजे दर्शन देऊ ." त्यानंतर दत्तात्रेय अदृश्य झाले .

नंतर स्वामींनी उध्दवास सर्व ब्राह्मणांस बोलवायला पाठवले . तेथे इतर मंडळी होती , त्यांनाही कल्याणाच्या हातीं बोलावून आणले आणि स्वयंपाकास प्रारंभ करविला , ब्राह्मण अर्धा कोस अंतरावर गेले होते . त्यांना उद्धव गोसावी यांनी माघारी आणले . उद्धवमुखानें समर्थांचे सविस्तर चरित्र ऐकल्यावर " आम्ही दुर्दैवी आहोत . स्वामी , आपण समर्थ आहात , हे न कळता गेलो . आतां श्रीदत्तात्रेय आपणच अहात . तरी आम्हांवर कृपा करावी ." अशी त्या ब्राह्मणांनी विनंती केली . हे पाहून स्वामींनी ब्राह्मणांस दयापूर्वक मंत्रानुग्रह दिला . नंतर श्रीदत्तात्रेय महाराज यांचे स्मरण करतांच पायी पादुका , हाती दंडकमंडलु अशी त्रिगुणात्मक मुर्ति पुढे उभे राहिली . त्यावेळी ब्राह्मणांस व आपल्या शिष्यमंडळींसह श्रीदत्तांचे दर्शन घडविले . समर्थांच्या हातून पूजा करवून नैवेद्य समर्पण केला व नंतर समर्थानी " विधी हरि हर सुंदर दिगंबर झाले " ही दत्तात्रेयांची आरती केली .

समर्थ आपल्या शिष्यांबरोबर मिरजेस होते . बरोबर जयरामस्वामी पण होते . मिरजेच्या एका भाविक गृहस्थाने एका देवळात कमानी मंडप घालून जयराम स्वामींचे कीर्तन करविले . कीर्तनाला अफाट गर्दी होती . श्रोते तल्लीन झाले होते . रामनामाचा गजर संपवून जयरामस्वामींनी निरूपणाला सुरुवात केली . "सद्गुरूचा व संतांचा क्षणभर सहवास झाला तरी रामदर्शन होते " असा सत्संगमहिमा ते वर्णन करीत आहेत , तो तेथील मुसलमान ठाणेदार तेथून चालला होता . त्याने हे वाक्य ऐकले . " कीर्तनात बेरंग नको " म्हणून त्या वेळी तो तसाच चालला गेला . दुसऱ्या दिवशी जयरामस्वामींना ठाणेदाराने बोलावले व त्यांना आणण्यासाठी पालखी पाठवली . जयरामस्वामींना या जलालखानची किर्ती माहिती होती . त्याने अनेक देवळे मोडली होती , मूर्ती फोडल्या होत्या , हिंदू भ्रष्ट केले होते . त्याने का बोलावले असेल म्हणून ते बुचकळ्यात पडले . नेमके याच वेळी समर्थ स्नानास नदीवर गेले होते . काही लोकांनी सांगितले की , ठाणेदाराने आपणांस बोलावले आहे . तेव्हा निदान जाऊन या .

जयरामस्वामी व काही शिष्यमंडळी महालात आली . त्यांना पाहून जलालखानने त्यांचा आदरसत्कार केला व सांगितले , "काल आपण कीर्तनांत सांगितले की , "संतांच्या सहवासात क्षणभर राहिलें तरी रामदर्शन होते ." ते वाक्य खरे करून दाखवा . नाहीतर ह्यातले गोमांस खावे लागेल ." असे म्हणून त्याने तबकावरचा सरपोस दूर केला . त्यातले मांस पाहून जयरामस्वामींचे पाय लटपट कापू लागले . जयरामस्वामी म्हणाले , " मी काही संत नव्हे , सिध्दपुरुष तर नव्हेच नव्हे , पण माझे गुरु आपणांस रामदर्शन करवतील ." जलालखानाने समर्थांना आणण्याची आज्ञा केली . जयरामस्वामींचा निरोप घेऊन एक शिष्य नदीवर पोचला व त्याने सर्व हकीगत सांगितली . समर्थ म्हणले , " जयरामांनी सत्संगाचा महिमा सांगून , लोकांना आपण फार मोठे साधू आहोत असे भासवले ; तेव्हा त्यांनी जलालखानाला रामदर्शन करवावे , नाहीतर जे शासन होईल ते भोगावे . मी काही येणार नाही ." शिष्य खिन्न झाला व परत आला .

समर्थांनी गुप्त होऊन दरबारात जयरामांच्या पाठीमागे उभे राहून " जय जय रघुवीर समर्थ " अशी गर्जना केली . त्यांनी जलालखानास विचारले , " तुला रामदर्शन घडवावयाचे आहे ना ? मग आम्ही ज्या रस्त्याने जाऊ त्याच रस्त्याने तू आलास तर रामदर्शन होईल ." जलालखान तयार झाला . तिघेही किल्ल्याच्या तटावर आले . "आमच्या बरोबर यायची तयारी आहे ना ? " समर्थांनी जलालखानास विचारले , तो "हो" म्हणाला , समर्थ बघतां बघतां एकदम सूक्ष्मरूप होऊन बुरुज्यांच्या जांगीतून बाहेर आले . जयरामही त्यांच्या पाठोपाठ आले . समर्थांनी जलालखानास सांगितले : " जलालखाना , जंगीतून खाली ये , इथे रामराय आहेत ." जलालखाना , जांगीतून खाली ये , इथे रामराय आहेत ." जलालखान म्हणाला , "साध्या रस्त्याने तुमच्याजवळ येतों ." समर्थ म्हणाले , "इतक्या सुखासुखी रामदर्शन होणार नाही . आम्ही ज्या मार्गे आलों त्या मार्गानेंच ये ." जलालखान साध्या पायरस्ताने येऊन समर्थाना शरण आला व म्हणाला , " महाराज , आतापर्यंत मी इथे आलेल्या साधूंना असेच छळले . आज माझे डोळे उघडले . आपला व आपल्या शिष्यांचा मी फार मोठा अपराधी आहे . मला आपला शिष्य करा . त्यासाठी मी धर्म सोडण्यास तयार आहे . समर्थ म्हणाले , " तुम्हाला परमेश्वराची भक्ती करायची आहे त्यासाठी धर्मांतर करण्याची काय जरुरी ? तुम्हाला रामरायाची भक्ति करायची असेल तर काम करतांना " राम " म्हणत जा. "

जलालखानाने समर्थांना मिरजेत राहण्याची विनंती केली . समर्थ म्हणाले , " आम्ही स्वेच्छाविहारी आहोत , तुम्हाला तळमळ असेल आणि सेवा करण्याची ईच्छा असेल , तर आम्ही येथे मठ स्थापन करण्याच्या विचारात आहोत . त्यासाठी जागा द्या ." हे ऐकताच त्यानें योग्य अशी जागा मठास बहाल केली . त्याठिकाणी वेण्णाबाईंची नेमणूक करून त्यांना आपल्या पूजेतील रामपंचायतन दिलें आणि जलालखानास वेणाबाईंना सल्ला देण्यास सांगितले . नंतर मिरजेत प्रतापमारुति स्थापून ते पुढे निघून गेले .

एकदां समर्थांना कोंडवळ्याच्या घळीतून चाफळास जावयाचे होते . पावसाळ्याचे दिवस असल्याने कोयना दुथडी भरून वाहत होती . कोयना पोहून जाण्याखेरीज समर्थांना दुसरा मार्गच नव्हता . आतां पलीकडे कोठून जावे , असा विचार करीत करीत ते पाटणला आले . तिथें चांदजीराव पाटणकर भेटले . समर्थांना पलीकडे जायचे आहे , हे त्यांना समजले . त्यांनी सांगडवाल्या माणसांना बोलावणे पाठविले . मुसळधार पावसांत कोयना नदीत सांगड घालण्यास कोणीही तयार होईना. बराच वेळ झाला तरी कोणीच येईना , हे पाहून समर्थ पोहून जाण्यासाठी सिद्ध झाले . सर्व गावकरी मंडळी समर्थांना म्हणाली , "महाराज , नदीला पाणी आहे , पाण्यात मगर आहेत आणि भोवरे सुद्धा आहेत . तेव्हा हा बेत रद्द करावा ." समर्थ म्हणाले , "एवढेच ना ? येऊन - जाऊन काय होणार ? विश्वकर्म्याने केलेल्या पंचभौतिक देहाचा गोळा नाहीसा होईल . आम्ही तर या देहावर केव्हाच तुळशीपत्र ठेवले आहे ." असे म्हणून समर्थांनी कोयनेच्या पुरात उडी टाकली .

अर्धा टप्पा गाठला , पण एका भोवऱ्यात ते सापडले व तीन वेळा खालीवर होऊन दिसलेच नाही . काठावर एकच हाकाटी झाली . सर्व लोक त्यांच्या अतातायीपणाला नावे ठेवू लागली . काही लोक म्हणाले , समर्थांच्या ऐवजी दुसरा कोणी गेला असता तर चालले असते . आता समर्थ गेले . त्यांचा संप्रदाय जाणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या राज्याला खीळ बसणार ." काही वेळाने सांगडवाले आले . सर्वांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला . दुसऱ्या दिवशी पाटणकरांनी चफळास निरोप पाठविला व भोई लोकांनी गळ टाकले . हेतू हा कीं , निदान देह तरी हातीं लागावा . पण व्यर्थ ! तिसऱ्या दिवशी चाफळ हुन कल्याण व उद्धव आलेत . त्यांनी तपस केला ज्याठिकाणी समर्थ नाहीसे झाले ते ठिकाण त्यांनी हेरले . कल्याण जाण्यास सिद्ध झाले . उद्धव म्हणाले , "समर्थ गेले , तुम्हीहि जाता , तेव्हां मी तरी मागें राहून काय करू ? मीहि येतो ." कल्याण हसून म्हणाले , "उद्धवा , समर्थ गेले म्हणून तुला कोणी सांगितले ? " उद्धव म्हणाले , "सर्व गावकरी म्हणत आहेत ." कल्याण म्हणाले , "समर्थ गेले असे म्हणतात ते निखालस खोटे आहे .सगळे जग बुडाले तरी समर्थ बुडणार नाहीत . इतके दिवस समर्थसेवेत राहून तू हेच का बोलतोस ? तू इथेच थांब . मी समर्थांना घेऊन येतो . "

कल्याणांनी रघुपतीचे व समर्थांचे स्मरण करून पुरात उडी मारली . समर्थ जसे सर्वविद्यानिपुण होते , तसेच त्यांचे पट्टशिष्य होते . कल्याण पोहत पोहत समर्थ बुडाले तिथे गेले व त्यांनी एकदम बुडी मारून तळ चपापला , तो समर्थ पद्मासन घालून बसलेले आढळले . कल्याण पुन्हा पाण्यावर आले . लोकांना वाटले की , हाही मरणार . पण कल्याणांनी एक दीर्घ श्वास घेऊन बुडी मारली व समर्थांच्या पद्मासनांत डोके खुपसून समर्थांना खांद्यावर बसवून वर आणले . काठांवर येताच उद्धवाने त्यांना हात धरून वर आणले . समर्थ व कल्याण दृष्टीस पडताच सगळ्यांना आनंद झाला . सर्वांनी समर्थांची पाद्य पूजा केली .

देहावर उदार होऊन गुरुप्राप्तीसाठी झटणाऱ्या कल्याणांचे सर्वत्र कौतुक झाले .

शिष्य असावा धारिष्ट्याचा । शिष्य असावा धृढ व्रताचा ।
शिष्य असावा अंतरीचा । परम शुद्ध ।।

सामनगडाचे बांधकाम सुरु होते , बांधकाम चालू असतांना , कामाची पाहणी करण्यासाठी शिवाजीमहाराज गडावर गेले . त्याठिकाणी हजारो गवंडी , सुतार , पाथरवट , बेलदार मंडळी खपत होती . हे दृश्य पाहून शिवाजी महाराजांच्या मनात क्षणभर विचार आला की , आपण आज हे गडाचे बांधकाम काढले , त्यामुळे इतक्या लोकांची कुटुंबे पोसली जात आहे , याचा पोशिंदा मीच आहे . अशा अहंकाराने ग्रस्त होऊन शिवराय पुढे जातात तोच समर्थ दिसले .

शिवरायांनी त्यांना वंदन केले आणि विचारले , "महाराज , आतां या वेळी आपण इकडे कुठे ?" समर्थ म्हणाले , "तुझ्या गडाचे बांधकाम बघायला आलो आहे ." असे म्हणून उभय गुरुशिष्य गडाकडे जावयाला निघाले . गडावर जाण्यासाठी शिवरायाने रस्ता करवूंन घेतला होता . पण मंध्यतरीच एक मोठा दगड फोडावयाचा राहिला होता . समर्थ म्हणाले , "शिवबा , बेलदाराला बोलावून आणा आणि हा धोंडा ताबडतोब फोडून घ्या ." शिवबाने बेलदाराला हांक मारली आणि त्यानें हातोडा मारून दगड फोडावयाला सुरुवात केली . एवढ्यात समर्थ म्हणाले , " हा दगड वाटेल तसा फोडायचा नाही . नारळाच्या एवढा धोंडा राहिला म्हणजे एका घावात दोन तुकडे करून तुझे कौशल्य दाखव ." असे म्हणताच बेलदाराने दगडावर घाव घातला आणि त्याचे दोन तुकडे केले . त्या दोन तुकड्यामध्ये मुठीएवढी पोकळी होती . त्यातच थोडेंसें पाणी होते आणि त्या पाण्यांत एक सजीव बेडकी होती . समर्थ म्हणाले , " पाहिलेस शिवबा , इथे काम करणाऱ्या लोकांच्या उदराला तू अन्न देशील यांत काहीच संशय नाही ; पण या खडकामध्ये बेडकीसारखा क्षुद्र जीवाची सुद्धां अन्नपाण्याची व्यवस्था तूं किती तत्परतेने केली आहेस ! खरोखर या त्रैलोक्याचा पोशिंदा तूंच आहेस ." एवढे उद्गार शिवरायांनी ऐकले आणि आपल्या मनांत जी अहंकाराची भावना उद्दीपित झाली होती . त्यावरच समर्थांनी आज घाव घालून आपला अहंकार दूर केला , अशा जाणिवेने शिवरायांनी आपापले मस्तक समर्थचरणी ठेवले

काशीक्षेत्रामध्ये सदाशिवशास्त्री येवलेकर या नावाचे एक गाढे विद्वान पुरुष राहत होते . वाढत्या ज्ञानाबरोबर त्यांचा अहंकारही फोफावला होता . अखिल हिंदुस्थानात संचार करून जयपत्रे मिळवावीत व भारतीय कीर्तीचा पुरुष म्हणून लौकिक मिळवावा म्हणून शास्त्रीबुवा निघाले . अहंकारामुळे शास्त्रीबुवा जसे ताठर झाले होते , तसाच त्यांच्या प्रवासाचा थाटही होता . रात्रंदिवस मशाली लावायच्या , जानवे मध्ये सूरी बांधून गावोगाव संचार करावयाचा आणि ज्या ठिकाणी आपला पराभव होईल त्या ठिकाणी मशाली विझवून सुरीने आपली जीभ कापावयाची , या तयारीने शास्त्रीबुवा निघाले . उत्तर प्रांत काबीज झाला . नंतर त्यांनी दक्षिणेकडे मोर्चा वळविला . दक्षिणेत शिवाजीमहाराजांचे नाव गाजले होते व त्यांच्या पदरी गागाभट्टसारखी विद्वान मंडळी आहेत , तेव्हां त्यांच्याकडून जयपत्र मिळाल्यास साऱ्या दक्षिणेत विजय मिळाला असे होऊन आपली कीर्ती वाढेल , या विचाराने शास्त्रीबुवा शिवरायांच्या दरबारी आले व त्यांनी आपला हेतू विदित केला . शिवराय म्हणाले , "आपण उद्या सकाळी एक सभा बोलावू आणि वाद करू . गागाभट्ट आदि करून विद्वान पंडितांना मी बोलावणेपाठवीन ." सदाशिवशास्त्री दुसऱ्या दिवसाची वाट पाहत राहिले .

आपल्याला सदाशिवशास्त्र्यांबरोबर वाद करावा लागणार म्हणून गागाभट्ट घाबरले व सदाशिवशास्त्रांच्या बिऱ्हाडी जाऊन म्हणाले , " शास्त्रीबुवा , उद्या वादाप्रसंगी मी येणार आहेच . पण या वादासंबंधी मला एकच सूचना करावीशी वाटते ती अशी कीं , आम्ही बोलून चालून आश्रित मंडळी . तेव्हां आश्रितांचा पराभव करण्यापेक्षा शिवरायांच्या गुरूंचा -समर्थांचा जर पराभव केला तर त्यांत फार मोठा विजय मिळेल . तेव्हां उद्याच्या सभेमध्ये समर्थांना बोलावण्याची सूचना करा . मी अनुमोदन देईन ." शास्त्रिबुवानी ते मान्य केले व दुसऱ्या दिवशी भर सभेमध्ये "समर्थांना आणावें , आम्हाला त्यांच्याबरोबर वाद करावयाचा आहे ." अशी त्यांनी शिवरायांना सूचना केली . गागाभट्टानेही अनुमोदन दिले . शिवराय म्हणाले , "शास्त्रीबुवा , समर्थ स्वेच्छाविहारी आहेत . तेव्हां आधी त्यांचा पत्ता लागणे कठीण . त्यांतून समर्थ वादविवाद करणारे नाहीत . क्रियाशील आहेत . तेव्हां आपण जर कुणाच्या सांगण्यावरून हा दुराग्रह धरीत असाल तर वेळीच सोडून द्यावा हे बरे ."

सदाशिवशास्त्री मान्यता देईनात . शेवटीं सर्व मंडळी चाफळास आली . त्या वेळी कल्याणही तेथे आले होते . ही सर्व मंडळी बहिरोबाच्या डोंगराच्या उत्तरेकडे आली . तेथे समर्थ एका मोठ्या वृक्षाखाली बसले होते . कल्याण स्वामी पुढे आले त्यांनी समर्थांना नमस्कार केला . "समर्थ म्हणाले , कल्याणा मागून कुणी मंडळी येत आहेत का ? " कल्याण म्हणाले , "शिवराय गागाभट्ट आणि काशीक्षेत्रातले विद्वान पंडित दिवसां मशाली लावून येत आहेत ." एवढ्यात सर्व मंडळी आली व सदाशिवशास्त्रयांखेरीज सर्वानी समर्थाना वंदन केले . समर्थांची आज्ञा होताच सर्व मंडळी एका बाजूला बसली . सदाशिवशास्त्री ताठरपणे उभेच होते . ते म्हणाले , "प्रथम वाद करून जय संपादन केल्यानंतर नमस्कार करावयाचा की आशीर्वाद घ्यावयाचा , हे ठरणार आहे ." समर्थ म्हणाले , "महाराज आपण ब्राह्मण म्हणजे साक्षात भूदेव आहात , तेव्हां मी आपल्याला वंदन कारतो . " असे म्हणून समर्थांनी त्यांना वंदन केले . शास्त्रीबुवा मनांत म्हणतात , "शिवाजीमहाराजांचा गुरु बोलण्यात तर पुष्कळ सरळ दिसत आहे . पण या स्वामीने , मी आल्या बरोबर मला उत्थापनसुद्धा दिलें नाही . बोलण्यात लीनता आणि कृतीत उद्धटपणा असा एकूण रागरंग दिसतो आहे ." सदाशिवशास्त्री म्हणाले , "हे पहा , मला असले भोळसट विचार मान्य नाहीत . मुकाट्याने वाद करा आणि निर्णय लावा ." समर्थांनी कल्याणाकडे पहिले . कल्याण म्हणाले , "पात्र योग्य आहे पण गांठी झाल्या आहे ; तेवढ्या दूर करणे जरूर आहे ." सदाशिवशास्त्र्यांना ही सांकेतिक भाषा उमगेना . पात्र कसले , गांठी कसल्या , काहीच उलगडेना .

शेवटी शेजारून एक मोळीविक्या चालला होता . त्याला समर्थांनी बोलाविले . त्याने मोळी एका बाजूला ठेवली आणि जोहार करून तो एका बाजूला उभा राहिला . समर्थ म्हणाले , "कोण आहेस रे तूं ?" तो म्हणाला , "मी महार आहे . चाफळात राममंदिरात मी मोळी टाकतो आणि भाकर तुकडा मिळेल त्यावर गुजराण करतो ." समर्थ म्हणाले , " कल्याणा ही कुबडी घे आणि त्याच्यासमोर जमिनीवर एक रेघ ओढ ." कल्याणाने रेघ ओढल्यावर समर्थांनी त्या अंत्यजाला रेघेच्या आत बोलावून विचारले , " तूं आता कोण आहेस ?" तो म्हणाला , "महाराज , मी वैश्य आहे ." पुढे आणखी दोन रेषा ओढून त्याला आत घेतल्यावर त्याने अनुक्रमे "क्षत्रिय आहे " व "ब्राह्मण आहे " असे उत्तर दिले . . त्याची कांती पालटली आणि वाणीही बदलली . पुढे त्याने समर्थाना विचारले , "महाराज , मी दशग्रंथी ब्राह्मण आहे . तेव्हा वाद कुणाशी करू तेवढं सांगा ." समर्थ म्हणाले ," आपल्याकडे हे सदाशिवशास्त्री येवलेकर आलेले आहेत . त्यांच्या बरोबर वाद कर ." असे म्हणताच त्याने शास्त्रीबुवांसमोर आसन ठोकले . वादाला सुरुवात झाली व रंगही भरला . वेदान्तापासून सुरुवात होऊन न्याय , मीमांसा इ . गोष्टींचा परामर्श घेऊन या ब्राह्मणाने सदाशिवशास्त्र्यांचा पराभव केला आणि शास्त्रीबुवाना पूर्वपक्ष करायला लावला . शास्त्रीबुवा मनांत म्हणाले , मी समर्थांसमोर वादासाठी उभा राहिलो असतानासमर्थांनी अंत्यजास सर्वज्ञ करून माझा तीन वेळा पराभव केला . आतां पूर्वपक्ष करिन तर फजितीला पारावारच राहणार नाही . तेव्हा पराभव मान्य करावा , असे मनाशी ठरवून त्यांनी मशाली विझवल्या आणि सुरिनी आपली जीभ कापणार , एवढ्यात समर्थ म्हणाले , " कल्याणा ! बघतोस काय ? "ब्राह्मणाला आवर . कल्याण पुढे झाले आणि शास्त्रीबुवांच्या हातातील सूरी त्यांनी काढून घेतली . समर्थ म्हणाले , "शास्त्रीबुवा , कुणाची सुरी , कुणाची जीभ कोण कापीत आहे , याचा विचार करा . आधी वाटेल तशा प्रतिज्ञा करू नये . ज्ञानामुळे अहंकार वाढू न देता "जगात शेराला सव्वाशेर असतोच , पृथ्वी बहुरत्ना वसुंधरा आहे " हे लक्षात ठेवा आणि यापुढे कोणाशीही वृथाभिमानानें वागू नका ." शास्त्रीबुवांनी समर्थांचे म्हणणे मान्य केले आणि समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले .

एवढ्यात तो मोळीविक्या म्हणाला , "महाराज , मला आता मुक्त करा ." समर्थ म्हणाले , " जा ना , तुला कोणी अडविले आहे ? " तो म्हणाला , "महाराज , आपण कृपानुग्रह केल्याखेरीज मला मुक्ती नाही . मी पूर्वीचा चित्ररथ गंधर्व होतो . पण मदिरा आणि मदिराक्षींच्या धुंदीमुळे मी नारदांचा अपमान केला , म्हणून नारदांनी शाप देऊन सांगितले की , ज्या अर्थी तू पशुतुल्य वर्तन करून माझा अपमान केला आहेस , त्या अर्थी तुला पशुयोनीत दोन आणि मनुष्ययोनीत एक जन्म घ्यावा लागेल . मी खाडकन शुध्दीवर आलो आणि उ:शाप मागितला . त्या वेळी नारदांनी मला मुक्तीचा मार्ग सांगितला तो असा कि , " जगत्पाल राजाच्या वेळी तू रेडा होशील आणि मुकुंदराजाच्या हातून तुझा उद्धार होईल . श्री ज्ञानेश्वरांच्या वेळी तू रेडा होशील व त्यांच्याच हातून तू त्या योनीतुन मुक्त होशील. समर्थांच्या काळात तू अंत्यज होशील आणि त्यांच्या हातून तुला मोक्ष मिळेल व तू चित्ररथ गंधर्व होशील ." तेव्हा आता मला मुक्ती मिळावी ." असे म्हणताच समर्थांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि पूर्वीचा चित्ररथ गंधर्व निघून गेला आणि ब्राह्मणाचा देह धरणीवर कोसळला . जातेवेळी शास्त्रीबुवांनी संप्रदयाची दीक्षा मागितली . तेव्हा समर्थांनी त्यांना आपल्या संप्रदायात घेऊन त्यांचे नाव "वासुदेव पंडित " असे ठेवले व त्यांना कण्हेरी येथे मठ स्थापून राहण्यास सांगितले .

अफजलखानाचा कशा रीतीने बंदोबस्त करावा , याविषयी शिवराय व प्रधानजी एकांती खल करीत असतांना , समर्थांचे पत्र घेऊन एक शिष्य राजश्रीकडे आला . राजश्रींना भेटून त्याने ते पत्र प्रधानजीच्या हाती दिलं . प्रधानजींनी पात्रातील मजकूर वाचून दाखविला . त्यातील मजकूर या प्रमाणे -

विवेकें करावें कार्य साधन । जाणार नरतुन हें जाणून ।
पुढील भविष्यार्थी मन । रहाटोची नये ।। १ ।।
चालूं नये असनमार्गी । सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीर कृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।। २ ।।
रजनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिलति येरझार ।लाविलें भ्रमण जगदीशें ।। ३ ।।
आदिमाया मूळ भवानी । हे सकल ब्र्हमाण्डची स्वामिनी ।
एकांती विवेक करुनी । इष्ट योजना करावी ।। ४ ।।

प्रत्येक ओवीच्या चरणाचे पहिले अक्षर घेतले म्हणजे 'विजापूरचा सरदार निघाला आहे ' असा अर्थ होतो . 'इष्ट योजना ' याचा अर्थ आपण योग्य तो घ्यावा . समर्थांनी शिवरायांसाठी देवीची प्रार्थना केली त्यातला सारांश

देखिली तुळजा माता । निवालो अंतरी सुखे ।
तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला ।। १ ।।
आघात संकटें वारी । निवारी दुष्ट दुर्जना ।
संकटीं भरवसा मोठा । तात्काळ काम होतसे ।। २ ।।
एकचि मागणे आता । द्यावे तें मजकारणे ।
तुझाचि वाढवी राजा । शीघ्र आम्हांसी देखतां ।। ३ ।।
दुष्ट संहारिले मागें । ऐसे उदंड ऐकतो ।
परंतु रोकडे काही । मूळ सामर्थ्य दाखवी ।। ४ ।।
रामदास म्हणे माझें । सर्व आतुर बोलणे ।
क्षमावे तुळजे माते । ईच्छा पूर्णचि ते करी ।। ५ ।।

समर्थांच्या अनेक शिष्यांमध्ये कल्याणाची गुरुनिष्ठा सर्वश्रुत आहे . परंतु त्या काळामध्ये कल्याण म्हणजे हेव्यादाव्याचा आणि मत्सराचा विषय झाला होता . समर्थ फक्त कल्याणालाच तेवढी कामें सांगतात आणि आम्हाला ओझ्याच्या बैलांइतकी सुद्धा किंमत नाही , अशी शिष्यांमध्ये बोलणी सुरु होती . हे वृत्त समर्थांना कळताच त्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं . एकदां रामघळीत असतांना समर्थांनी विड्याचे पाने लपवून ठेवली आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी कल्याणाखेरीज सर्व शिष्यांना उठविले व मला " विडा कुटून द्या " म्हणून आज्ञा केली . कधी नव्हे ते समर्थांनी आज आज्ञा केली तेव्हा हि संधी साधण्यासाठी जो तो धडपडू लागला . कुणी पानदान आणले कुणी खलबत्ता आणला , कुणी तस्त आणून ठेवले . एकजण विडा कुटायला सुरुवात करणार तोच , त्याने समर्थांना प्रश्न केला "महाराज , पाने संपली दिसत आहेत ." समर्थ म्हणाले , "पाने संपली म्हणून काय झालं ? " वेली पण खुंटल्या काय ?रानांत जा आणि ताबडतोब पानें घेऊन या ." आतां आणीबाणीचा प्रसंग आला . "इतक्या मध्यरात्री पानें आणावयाला रानात कसे जावयाचे ?" एक शिष्य म्हणाला , " महाराज, आम्ही सकाळी उठल्याबरोबर प्रथम पानें आणावयाचे काम करूं ." समर्थ म्हणाले , "अरे तुम्ही सकाळी पानें आणाल ही गोष्ट खरी , पण मला विडा आता हवा आहे , त्याची काय वाट ? " शिष्य म्हणाले , " तसें पहिले तर आतासुद्धा पाने आणावयाला हरकत नाही . पण रात्रीं वेलींना कसे शिवायचे ? "

समर्थांनी सबब ओळखली आणि कल्याणाला उठविले . समर्थ म्हणाले , " कल्याणा , पाने संपली आहेत ." एवढे ऐकताच कल्याणाने खडावा चढविल्या आणि तो पानें आणण्यास निघाला . इकडे शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली . " एवढे वैराग्यसंपंन्न आणि निरासक्त असूनसुद्धा आज महाराजांना विड्याचा मोह आवरत नाही . "" व्यसन हे असेच आहे बरे ! अशी त्यांची बडबड सुरु असतांना समर्थ आले आणि म्हणाले , " अरे , तुम्ही इकडे गप्पात गुंग झाला आहांत ; तिकडे कल्याण निघाला सुद्धा आणि त्याची काय अवस्था आहे , याचा काहीं विचार तरी तुमच्या मनात आहे किंवा नाही ? आताच कल्याणाची आर्त किंकाळी कानी आली . चला , उठा आपण कल्याणाकडे जाऊं या . चुडे पेटवुंन घ्या ." शिष्य चडफडत उठले आणि समर्थांच्या बरोबर निघाले .

काहीं अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी कल्याणाची स्वारी बेशुद्ध होऊन पडलेली दिसली . शेजारीच ज्याने कल्याणला दंश केला तो नाग फणा काढून बसला होता . समर्थ नागावर संतापले आणि म्हणाले , " आम्ही निरुपद्रवी माणसे या ठिकाणीं राहत असतांना आम्हाला तुम्ही त्रास का देता ? राहावयाचे असल्यास सरळपणाने इथे रहा .नाहीपेक्षा इथून बऱ्या बोलाने चालते व्हा . " हे वाक्य जणू काही नागाने ऐकले , त्याला ते समजलें . त्यानें समर्थांना प्रदक्षिणा घातली आणि आपला फणा समर्थांच्या चरणी ठेवून तो निघून गेला .

आतां कल्याणाच्या अंगात भिनलेले विष कसे नाहीसे करावयाचे ? समर्थानी भैरोबाला विनंती केली . अकरा खंडी गूळ वाटण्याचा संकल्प केला . त्याप्रमाणे भैरोबाने विष काढून घेतले आणि कल्याण पूर्ववत होऊन पाने आणण्यासाठी निघाला . समर्थ म्हणाले , "कल्याणा ! जातोस कुठे ? " कल्याण म्हणाला , "महाराज , कामगिरी पूर्ण झाली नाही ." समर्थ म्हणाले , " अरे , पानाची जरुरी नाही . पानपुडीत हवी तेवढी पाने आहेत . या पानांच्या निमित्ताने मी तुमची परीक्षा घेतली एवढेच .

उडपी संस्थानात श्री मध्वाचार्य नावाचे साधू होते . समर्थ म्हणजे साक्षात मारुतीचा अवतार आहेत , असेही वृत्त त्यांच्या कानी गेले होते . तेव्हा समर्थांची कीर्ती कितपत खरी आहे आणि ते खरोखरीच मारुतीचे अंश आहेत की नाहीत , कीं उगीच त्यांनी आणि त्यांच्या शिष्यानी बुवाबाजीचे स्तोम माजविले आहे , ह्याची चौकशी करण्याकरिता एका हुशार शिष्यास त्यांनी पाठवले . सदर शिष्य मजल - दरमजल करत चाफळजवळ एका गावी पोचला . त्याने नदीतीरावर स्नान केले , भोजनाची सिद्धता झाली आणि पाणी आणण्यासाठी स्वारी नदीकाठी गेली . एवढ्यात अन्नाच्या वासावर असणारे एक कुत्रे त्यांच्या अन्नाला शिवले . ते पाहून ब्राह्मणाच्या तळ पायाची आग मस्तकात गेली . त्याने कुत्र्यास हुसकावले . पण अन्नाची वाट काय ? कुत्र्याने अपवित्र केलेले अन्न टाकून दिले तर उद्या पर्यंत जेवणाची सोय काय ? असा विचार करीत असतांना त्याने भीत भीत आजूबाजूला बघितले आणि कुणीही पाहिलं नाही याची खात्री करून घेतली . कुत्र्याच्या स्पर्शाने अपवित्र झालेले अन्न त्याने तुलसीदलाने शुद्ध केले आणि ते अन्न सेवन 'करून स्वारी चाफळ साठी निघाली .

एक -दोन दिवसात ही व्यक्ती चाफळास पोचली . समर्थांची भेट झाली . मध्वाचार्यांनी दिलेले पत्र त्याने समर्थांना दिले . हे पत्र म्हणजे प्रत्यक्ष भेटच , या भावनेने समर्थांनी त्या पत्रास वंदनकेले आणि वाचले . दोन सत्पुरुषांची पत्र रूपाने भेट झाली . समर्थांनी ब्राह्मणास सांगितले की , "महाराज नैवेद्याची सिद्धता झाली आहे . आपण इथेच भोजन करा ." ब्राह्मण म्हणाला "आम्ही तप्त मुद्रांकित ब्राह्मण आहोत . आमचे सोवळे - ओवळे फार कडक असते . आम्ही दुसऱ्याचे हातचे पाणी सुद्धा पीत नाही , मग भोजन तर दूरच राहिले ! "

यावर समर्थांनी दिवाकर गोसाव्यास शिधा देण्यास सांगितले . ब्रह्माणाने शिधा घेतला व स्वयंपाक तयार करून घेतला . त्याने आपले पान मांडून घेतले . रामरायाला नैवेद्य झाला . पंगत बसली . समर्थांनी तूप वाढण्यासाठी तुपाचे भांडे आपल्या हातात घेतले . समर्थांच्या सुदैवाने आणि ब्राम्हणाच्या दुर्दैवाने या ब्राम्हणाचे पान पहिले आले . समर्थांनी तुपाची धार त्याच्या भातावर धरली . ब्राह्मण संतापला व समर्थाना अद्वातद्वा बोलू लागला समर्थांनी तुपाचे भांडे जमिनीवर ठेवले आणि ते पाय पसरून गळा काढून रडू लागले . हा ब्राह्मण बोलला ते समर्थांना लागले असेल , म्हणून सर्वजण त्यांची समजूत काढू लागले व म्हणाले याच्या बोलण्यावरून आपण श्रमी कां होता ? " समर्थ म्हणाले , " नाही हो , या ब्राह्मणाने जे सांगितले ते अक्षरश: खरे आहे . " समर्थांनी हंबरडा फोडला , " रामराया , कशाला रे मला हा अपवित्र देह दिलास ? कुत्र्याच्या स्पर्शाने अपवित्र केलेले अन्न तीर्थाने आणि तुलसीदलाने शुद्ध होते . पण मी चांडाळाने अपवित्र केलेले अन्न ह्या उपायांनी शुद्ध होऊ शकत नाहीं ना ? देवा , कुत्र्यापेक्षाही मी अपवित्र ना ? " हे शब्द ऐकताच दिवाकर गोसावी पुढे झाले व म्हणाले , "महाराज , आपण काय बोलत आहात , हे काहीच समजत नाही ." समर्थ म्हणाले , " माझे म्हणणे खोटे असेल तर या ब्राह्मणास विचारा . त्यांनी नदीतीरावर तयार केलेल्या अन्नास कुत्रे शिवले , म्हणून ते अपवित्र झालेले अन्न विष्णुतीर्थने व तुलसीदलाने त्यांनी पवित्र करून घेतले व मी मात्र चुकून तूप वाढल्यामुळे अपवित्र झालेले अन्न शुद्ध होऊ शकत नाही , याबद्दल मला वाईट वाटते . रामा , तू स्वतःचा आणि या ब्राह्मणाचा देह पवित्र केलास आणि माझा अपवित्र ठेवलास हाय रे देवा ! " असे म्हणून समर्थ आणखी मोठयाने रडू लागले व जमिनीवर गडबडा लोळू लागले . दिवाकर गोसाव्यांनी ब्राह्मणास हकीकत विचारली . नदीकाठी घडलेली सर्व हकीगत त्याने सांगितली व समर्थांचे पाय धरले . समर्थ म्हणाले , "महाराज, आपण काय माझे पाय धरता ? " आपण तप्तमुद्रांकित वैष्णव आहात . आम्ही काय साधे वैष्णव आहोत ! " हे ऐकून ब्राह्मण साष्टांग नमस्कार घालून म्हणाला , "महाराज , चुकीबद्दल क्षमा असावी . मी वृथाभिमानाने प्रेरित झालो होतो व रघुरायाच्या प्रसादास मुकत होतो . महाराजांनी मला प्रसाद द्यावा . मी तो आनंदाने घेतो ."

ब्राह्मण जेवायला बसला . अक्का व वेण्णाबाईंनी त्याला वाढले . काही दिवस चाफळमठात वास्तव्य करून , समर्थांचा निरोप घेऊन तो मध्वशिष्य उडपीला गेला . समर्थदर्शन झाले व त्यांची अलौकिक साक्ष ब्राह्मणास पटली . त्याने ती सर्व हकीगत मध्वाचार्यांना सांगितली . " समर्थ साक्षात मारुतीचा अंश आहेत ." दक्षिण मानसयात्रेच्या वेळी ते आपणास भेटतील " असे त्याने आपल्या गुरूंना सांगितले .

एके रात्री एका विस्तीर्ण वटवृक्षावर ब्रह्मसमंधांची भांडणे सुरु होती . त्यापैकी दोन ब्रह्मसमंध एका बाजूला आणि एक ब्रह्मसमंध दुसऱ्या बाजूला होता . दोघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हाकलून द्यावयाचा चंग बांधला होता आणि तो एकाकी पडलेला ब्रह्मसमंध गयावया करू लागला आणि म्हणाला ," महाराज , ही जागा जरी पुढे या ठिकाणी येणाऱ्या वामनपंडितांसाठी राखून ठेवली असली , तरी ते येई पर्यंत मी इथे राहतो . मला नाही म्हणू नका . मी ज्या वृक्षावर राहत होतो ते आता अजीर्ण झाले आहे . ते केव्हा कोसळेल याचा नेम नाही. तेव्हा माझ्यावर दया करा . मला राहावयाला जागा द्या . " शेवटी ते दोन ब्रह्मसमंध म्हणाले , " आम्ही तुला जागा देऊ , पण तू तत्पूर्वी खुद्द वामनपंडितांची परवानगी आणली पाहिजे . " त्या ब्राह्मसमंधाने ते मान्य केले आणि तो वामन पंडितांकडे निघाला ."

एके रात्री एका विस्तीर्ण वटवृक्षावर ब्रह्मसमंधांची भांडणे सुरु होती . त्यापैकी दोन ब्रह्मसमंध एका बाजूला आणि एक ब्रह्मसमंध दुसऱ्या बाजूला होता . दोघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हाकलून द्यावयाचा चंग बांधला होता आणि तो एकाकी पडलेला ब्रह्मसमंध गयावया करू लागला आणि म्हणाला ," महाराज , ही जागा जरी पुढे या ठिकाणी येणाऱ्या वामनपंडितांसाठी राखून ठेवली असली , तरी ते येई पर्यंत मी इथे राहतो . मला नाही म्हणू नका . मी ज्या वृक्षावर राहत होतो ते आता अजीर्ण झाले आहे . ते केव्हा कोसळेल याचा नेम नाही. तेव्हा माझ्यावर दया करा . मला राहावयाला जागा द्या . " शेवटी ते दोन ब्रह्मसमंध म्हणाले , " आम्ही तुला जागा देऊ , पण तू तत्पूर्वी खुद्द वामनपंडितांची परवानगी आणली पाहिजे . " त्या ब्राह्मसमंधाने ते मान्य केले आणि तो वामन पंडितांकडे निघाला ."

इंद्रायणीच्या तीरावर वामनपंडित आणि त्यांची पत्नी गिरीबाई स्नान करीत होत्या . एवढ्यात ब्रह्मसमंधाने ब्राह्मणाच्या रूपाने येऊन वामनपंडितांना नमस्कार केला व त्यांच्या जागेवर काही काल राहण्याची परवानगी मागितली . वामनपंडितांना काहीच बोध होईना . शेवटी ब्रह्मसमंधाने सर्व हकीगत खुलासेवार सांगितल्यावर वामनपंडित म्हणाले , " आमच्या जागेवर तुम्ही कायमचे राहा . मी जरी तिथे आलो तरी तुम्हास उठवणार नाही . पण महाराज , ही जागा माझ्यासाठी आहे हे तुम्हाला कसे समजले , एवढे मला सांगता का ?" ब्रह्मसमंध म्हणाला , आमची योनि नीच योनी म्हणून जरी समजली गेली असली , तरी आम्हांला त्रिकालज्ञान असते आणि साक्षात भगवद्दर्शन झाले तरी ही योनि भोगल्याखेरीज मानव सुटत नाही ." वामनपंडित म्हणाले , " मग या योनीत न गुंतावे यासाठी काहीच उपाय नाही का ? " ब्रह्मसमंध म्हणाला , "नाही कसा ? उपाय आहे . संतसंगतीमुळे हे दुःख टाळता येते ." वामनपंडित म्हणाले , " मग इथे जवळपास कुणी संत असेल तर मला सांगा . मी त्याला शरण जातो . ब्रह्मसमंध म्हणाला , " इथे पुष्कळ संत आहेत , आता जवळपास संत म्हणजे ..... देहूगावात संत तुकाराम महाराज आहेत , त्यांना शरण जा .... " . वामन पंडित आणि त्यांच्या पत्नी गिरीबाई निघाल्या .

देहू गावांत कीर्तनाला रंग चढला होता . टाळ - मृदूंग यांचा ध्वनी आणि पांडुरंगाचा गजर याने सारे वातावरण दुमदुमून गेले होते . वामन पंडित आले त्यांची आणि तुकाराम महाराजांची भेट झाली दृष्टादृष्ट झाली . नजरेच्या भाषेत भाव प्रगटले आणि वामन पंडितांनी तुकारामहाराजांच्या चरणावर लोटांगण घातले . पंडित म्हणाले , " महाराज , माझ्यावर दया करा आणि मला अनुग्रह द्या ." तुकाराम महाराज म्हणाले , "शास्त्रीबुवा , आपण वेदशास्त्र संपन्न आहेत , विद्वान आहात , ब्राह्मणकुलोत्पन्न आहात , तेव्हां माझे म्हणणे ऐकून घ्या . आपण रामदासांना शरण जा . त्यांनाच गुरु करा . " गाढवभर पोथ्या उलथिसी पाने । परी गुरूगम्य खुणे नेणेचि बाप्पा ।। " हे ऐकून वामपंडित समर्थांकडे जाण्यास निघाले .

त्या वेळी समर्थांचा मुक्काम रामघळीत होता . वामनपंडित आले आणि समर्थांना वंदन करून म्हणाले , " महाराज , माझ्यावर कृपा करा आणि अनुग्रह द्या ." समर्थ म्हणाले , "शास्त्रीबुवा , आपण मोठे अधिकारी , विद्वान ब्राह्मण आहात . तेव्हा आम्ही पामरांनी आपल्याला अनुग्रह कसा द्यायचा ? आतां इतक्यात अनुग्रह न करता मी तुम्हाला तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगतो . तुम्ही बारा वर्षेपर्यंत बद्रिकाश्रमी राहावे .तपश्चर्या करावी आणि मग आम्हाला भेटावे ." वामनपंडितांनी ते मान्य केले आणि तपश्चर्येसाठी गिरीबाईंच्या समवेत बद्रिकाश्रमी जाण्यासाठी निघाले .

समर्थांनि संगीतल्याप्रमाणे त्यांनी बद्रिकाश्रमी बारा वर्षे तपश्चर्या केली . पण भगवद्दर्शन होईना आणि संतांच्या सहवासाचा आनंद उपभोगता येईना , म्हणून वामनपंडित निराश झाले आणि त्यांनी गंगेत देहाचे विसर्जन करावे , असा विचार केला . पाठोपाठ गिरीबाई होत्याच . दोघांनी मध्यरात्री एक उंच कडा पहिला . खालुन गंगानदी वायुवेगाने धावत होती . आपल्या देहसमपर्णसाठी ही जागा योग्य आहे , असे ठरवून त्यांनी आपल्या डोळ्यांना पट्टे बांधले आणि "जय गंगामाता " असे म्हणून आता उडी टाकणार , इतक्यात भगवंतांनी त्या उभयतांना सावरले व दर्शन दिले . भगवान म्हणाले , "वामना , तुझ्या तपश्चर्येवर मी संतुष्ट झालो आहे . काय हवे असेल ते माग . " वामन पंडित म्हणाले , "देवा , मला संतसंगतीचा आनंद द्या ." भगवान म्हणाले , एक वेळ वैकुंठी राहण्याची इच्छा केली असतीस तर ती पुरी केली असती ; पण संतसंगतीचा आनंद संतांच्या संमतीखेरीज असा मिळवायचा ? तू समर्थांकडे जा ."

वामनपंडित समर्थांकडे आल्यावर समर्थांनी त्यांना श्रीशैल पर्वतावर जाण्यास आज्ञा केली . तिथेहि बारा वर्षे तपश्चर्या झाली . तेथे त्यांना साक्षात अवधूतदर्शन झाले आणि अवधूतांनीही पुन्हा समर्थांकडे जाण्याचा आदेश दिला . वामनपंडित समर्थांना भेटण्यास परत निघाले .

वामनपंडित समर्थांकडे येत असतांना वाटेत एके ठिकाणी वामनपंडित अन्न शिजत लावले आणि ते संध्येला बसले . इकडे भाताचे पातेले खुरावरून घसरले . त्या वेळी गिरीबाई शेजारीच बसल्या होत्या . पण अन्नाला शिवता येईना . वामनपंडित कट्टर "तप्तमुद्रांकित " वैष्णव होते . ते स्वतःच्या पत्नीच्या सुद्धां हातचं खात नव्हते . इकडे संध्या करीत असतांना त्यांची समाधी लागली . आता हाक मारावी तरी पंचाईत आणि काही न बोलावे तर अन्न अग्निमुखात जात आहे , असा काहीसा विचार मनात येऊन गिरीबाई हसल्या आणि हसल्या बरोबर वामनपंडित डोळे उघडून तिला हसण्याचे कारण विचारले . गिरीबाई म्हणाल्या , "काही कारण असे नाही , एरवीच हसले ." वामनपंडित म्हणाले , "तुला माझी शपथ आहे , खरे सांग ." गिरीबाई म्हणाल्या , " महाराज , इतके शास्त्राध्ययन झाले , इतकी तपश्चर्या झाली , तरी अजून "सत्चितानंद " या पदाचा विचार करावा लागतो , या गोष्टीचे मला हसू आले ." वामनपंडित म्हणाले , "मला आज खार ज्ञान झाले . तू पत्नी आहेस , म्हणून वंदनादि व्यवहार करता येत नाही . नाहीतर तुझ्या चरणी गुरुमाऊली म्हणून लोटांगण घातले असते ." नंतर वामनपंडितांनी आपले व्रत सोडून ते पत्नीच्या हातून तयार झालेले अन्न खाऊ लागले . अशाप्रकारे प्रवास करीत वामनपंडित समर्थांना भेटण्यासाठी येत होते .

इकडे वामनपंडित आपल्याला भेटायला येत आहेत , हे पाहून समर्थ गजेवाडीपर्यंत समोर गेले आणि वामनपंडितांना त्यांनी वंदन केले . वामनपंडित म्हणाले , "महाराज , हा असा उलटा व्यवहार कसा ? माझ्या हातून काही चूक झाली काय ? " समर्थ म्हणाले , "चूक काय होणार ? आता तुम्ही पूर्वीचे वामनपंडित राहिले नसून तुमच्यात विशेष फरक पडला आहे आणि त्यांतल्या त्यांत तुम्हांला पत्नीने उपदेश केल्यानंतर तुमची मन:स्थिती पुष्कळच पालटली आहे . तेव्हा प्रथम पत्नीला वंदन करा ." समर्थांची आज्ञा म्हणून वामनपंडितांनी पत्नीला वंदन केले व ते समर्थांच्या सहवासात राहू लागले .

समर्थांची आज्ञा म्हणून दासबोध वाचीत असतांना वामनपंडित एके जागी थांबले . मन नि:शंक होईना . चतुर्दश भुवने स्थापन केल्याबद्दल आभार आहे , पण उडविल्याबद्दल आधार मिळेना . बरें समर्थांना याबद्दल विचारायचे धैर्य होईना . शेवटी ते समर्थांना म्हणाले , "महाराज , मी ग्रंथ वाचतो , आपण अर्थ सांगावा ." " समर्थांनी अर्थ सांगायला सुरुवात केली . पुन्हा चौदा भुवने स्थापावीत आणि समर्थांनी आधार न देता उडवावीत , असे बऱ्याच वेळा झाले . वामनपंडितांचे काही केल्या समाधान होईना . शेवटी समर्थांनी मारुतीरायाचे उग्ररूप धारण केले . ते स्वरूप पाहताच वामनपंडित घाबरले आणि ते विचार करीत आहेत , तेवढ्यात मारुतीने आपल्या पृच्छाने एक तडाखा दिला आणि विचारले , " वामना , शंका ?" वामनपंडित म्हणाले , "दूर झाली ." पुन्हा एकदा कबुली घेऊन मारुतीराय अंतर्धान पावले . शेवटी समर्थांनी विचारले , "वामना , शंका दूर झाली ना ?" वामनपंडित म्हणाले , "नाही". समर्थ म्हणाले , आता त्रिवार कबुली दिलीस आणि आता नाही म्हणतोस ? " वामन पंडित म्हणाले , " दडपणाने घेतलेला कबुली जबाब होता तो . तुमचे रूप पाहून मला भिती वाटली . पण खरे सांगायचे म्हणजे शंका अद्याप तशीच आहे ." पुढे समर्थ म्हणाले , "तुम्हाला अद्याप आधार सापडू नये म्हणजे आश्चर्य आहे . जरा बृहदारण्यकोपनिषदात बघा . आधार सापडेल ." शेवटी वामनपंडितांनी पोथी पहिली आणि त्यांना आधार सापडला . एवढा एकच भाग कसा आपल्या लक्षात आला नाही , याबद्दल त्यांना फार खंत वाटली . नंतर समर्थांनी त्यांना उपदेश केला आणि "आपण आपली लेखणी परमेश्वराच्या गुणवर्णनाच्या कामी लावा ." असे सांगितले . वामनपंडितांची यमक जुळविण्याची हातोटी नांवाजण्यासारखी होती , त्यामुळे समर्थ त्यांना "यमक्या वामन " असे म्हणत असत .

समर्थांनी अन्नपूर्णा बाईंना दिलेला आशीर्वाद खरा ठरला .त्यांना योग्य समई पुत्र रत्न प्राप्त झाले आणि त्यांनी ते समर्थ चरणी अर्पण करण्यास आणले . समर्थांनाही रामरायाने दिलेला आशीर्वाद खरा ठरतो आहे हे पाहून आनंद झाला . रामरायाच्या भक्तीने गहिवरून ते गिरीधर पंतांना सांगू लागले .

'मी कर्ता ऐसे म्हणसी । तेणे तू कष्टी होसि ।।
राम कर्ता म्हणता पावसी । यशकीर्ती प्रताप ।।

त्या बालकाच्या सर्वांगावर हात फिरवून त्याला प्रेमाने आशीर्वाद देत समर्थ म्हणाले - " आपण या मुलास वाढवा, योग्य समयी आम्ही याचा स्वीकार करू असे म्हणून समर्थ आपल्या मठात परत गेले . समर्थ प्रसादाने अवतरलेला उद्धव हळूहळू आता धावू लागला , बोलू लागला , लिहू-वाचू लागला .अन्नपूर्णा बाई नेहमी त्याला टाकळी येथे समर्थ दर्शनास आणत . समर्थांनी लिहिलेले करुणाष्टके , एकवीस सामासी पोथीचे तो नित्य समरण करी . मनात येणाऱ्या शंकांचे समर्थांकरवी निवारण करी . त्याच्या बुद्धीची तीक्ष्णता पाहून समर्थाना त्याचे कौतुक वाटे . वैराग्य ही उध्दवास मीळालेली ईश्वरदत्त देणगी होती , तो जसजसा मोठा होत गेला तसतसा तो आई वडिलांपेक्षा समर्थ सानिध्यात जास्त वावरू लागला.

उद्धवची मौंज

सन १६३१ ! उद्धव सात वर्षाचा झाला . त्याचे मौंजीबंधन करायचे ठरले . उद्धवची मौंज हे काही कर्मकांड किंवा नुसता संस्कार नव्हता .ते एक असाधारण व्रत होते . ते पेलण्याची ताकद उद्धवमध्ये होती म्हणून समर्थानी उद्धवाला स्वतः च्या मांडीवर बसवले व त्याची मौंज लावली . समर्थांच्या मांडीवर मौंजीबंधन करण्याचे भाग्य फक्त दोघांनाच लाभले . त्यापैकी एक उद्धवस्वामी व दुसरे राघवस्वामी हे कल्याणस्वामींचे पुतणे होत.

मुंज झाल्यावर उद्धवाने घराला रामराम ठोकला , तो कायमचाच . त्यावेळी तो अवघा सात वर्षाचा होता . समर्थांच्या टाकळीतील मठीत त्याने आपला मुक्काम ठोकला . जप,वाचन,लेखन ,चिंतन यामध्ये उद्धवाचा दिवस जात असे . दुपारी तो समर्थांन सोबत भिक्षेस जात असे . एवढ्या पोरवयात उद्धवाला आलेले वैराग्य पाहून लोकांना आश्चर्य वाटे . कौटुंबिक मायापाश तोडल्याखेरीज अध्ययन आणि अध्यापन होणार नाही हे कोडे त्याच्या बालमनाला लहानपणीच सुटले. यातच उद्धवची थोरवी सामावली आहे .

पहिला मठ व मठपती -

लहानपणी मुलांना खेळवताना त्यांना गमतीने म्हटले जाते की - तुला दुधात टाकू की दह्यात ? - बालक उद्धवाला सुद्धा समर्थ हेच म्हणायचे - तू प्रपंची होणार की परमार्थी ? आणि समर्थ त्याला म्हणत आम्ही तुला परमार्थात टाकणार ! बालपणीचा हा खेळ आज प्रत्यक्ष साकार होणार होता . समर्थ बारा वर्ष टाकळी सोडून भारत भ्रमण करायला जाणार होते. टाकळी येथील माणसे समर्थ विरह होणार म्हणून व्याकुळ झाली होती .उद्धव तर कमालीचा अस्वस्थ झाला होता. मी पण आपल्या बरोबर येणार असा आग्रह व विनंती तो करू लागला .समर्थाना सोडून राहणे ही कल्पना पण त्याला असह्य होती . समर्थ म्हणाले - उद्धवा तू अजून लहान आहेस - येवढा प्रवास तुला झेपणार नाही तेव्हा - मी परत येई पर्यन्त कठोर साधना करावी . आत्मज्ञान प्राप्त करावे . मन एकदा स्वस्वरुपी स्थिरावले की मग हवा तेवढा प्रवास व कार्य करा .

अभ्यासे प्रकट व्हावे । नाही तरी झाकोन असावे ।।
प्रकट होवोनी नसावे । हे बरे नव्हे ।।

जातांना समर्थांनी उध्दवास गोमयाच्या मारुतीची नित्य उपासना सांगितली व उध्दवास टाकळी येथील मठपती म्हणून नेमणूक केली .समर्थ संप्रदायातील उद्धवस्वामी हे पहिले मठपती . समर्थ स्थापित टाकळी हा पहिला मठ व वयाच्या ८ व्या वर्षी मठपती होण्याचे भाग्य उध्दवास लाभले . समर्थनी उध्दवास ब्रह्मचर्याची दीक्षा दिली व त्रयोदशाक्षरी रामनामाचा मंत्र सांगितला . त्याचे वर्णन गिरिधरस्वामी करतात .

उद्धव बाळकासी समर्थ ऊर्ध्वपादे धरिले ।
प्रपंची होसी परमार्थी होसी पुसिले ।
वैराग्य दीक्षेत बालपणी करणी उपदेशिले ।
सत्पात्र केले भूमंडळी ।।

त्याचे गुरुदेव त्याला आता एक्दम १२ वर्षांनी भेटणार होते, पण जातांना तपश्चर्येचा आणि रामनामाचा आदर्श समोर ठेवून गेले होते . त्यामुळे समर्थ येई पर्यंत काय करायचे याचा मूर्तिमंत आदर्श उद्धवाने पहिला होता व तो आपल्या हृदयात जोपासला होता . समर्थ भारत भ्रमण करत असतांना उद्धवाने सांगितल्या प्रमाणेलागले आपली पुरश्चरण व उपासना सुरु ठेवली . थोड्याच दिवसात लोग त्याला उद्धवस्वामी म्हणू लागले . बालवयामध्ये त्याचा हा निर्धार सगळ्यांचा कौतुकाचा विषय होता . दास विश्राम मध्ये आत्मारामबुवा रामदासी लिहितात .

शहाणा सुंदर धीर उदार । काळाप्रवीण गाईक चतुर ।
सद्गुरू सेवनी हाततत्पर । प्रत्यक्ष ज्या सदा मारुती ।।
लाडका मोठा गुरुदेवाचा । निर्मल निश्चल भाव जयचा ।
आठव नसे ज्या प्रपंचाचा । सेवेत राहिला सान्निधी ।।

यावरून उद्धवस्वामीच्या व्यक्तिमत्वाची यथार्थ कल्पना येते . हे वर्णन आदर्श विद्यार्थ्यास तंतोतंत लागू पडते .

सन १६४४ ! उद्धवस्वामी आता २० वर्षांचे झाले होते . समर्थ पण नाशिकात पोहोचल्याची खबर टाकळीत येऊन पोचली . उद्धव - समर्थ भेटीनंतर समर्थ जवळ जवळ महिनाभर टाकळी येथे राहिले . आपल्या प्रवासातील अनेक अनुभव , अनेक घटना समर्थ रोज लोकांना सांगत उद्धव त्या सगळ्या गोष्टी कान व मन देऊन ऐकत . उद्धवस्वामी सर्वांगाचे कान करून देशस्थितीचे भयानक वर्णन ऐकत होते व आपल्या चित्तात साठवत होते व लिहून ठेवत होते. मात्र समर्थांनी आपल्या प्रवास वर्णनाचे काही काव्य उद्धवसाठी लिहून ठेवले होते. ते वर्णन उद्धवस्वामींच्या टाकळी व इंदुरबोधन येथील मठांमध्ये सापडले आहे . देशाच्या भयानक परिस्थितीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात -

किती गुजीरणी ब्राह्माणी भ्रष्टविल्या ।
किती शामखी जहाजी फाकविल्या ।
किती एक देशांतरी त्या विकील्या ।
किती सुंदरा हाल होऊनि मेल्या ।।

आणखी एका काव्यात समर्थ वर्णन करतात

"देश नासला नासला , उठे तोचि कुटी ।
पीके होताचि होताचि , होते लुटा लुटी ।।१।।
काळाकरिता जिवलगा ,झाली तुटातुटी ।
अवघ्या कुटुंबा कुटुंबा , होते फुटाफुटी ।।२।।
उदंड चाकरी चाकरी , मिळेना भाकरी ।
लोक निलंड ,निलंड , काढूनि नेती पोरी ।।३।।
न्याय बुडाला बुडाला ,जहाली शिर्जोरी ।
पैक्या कारणे कारणे , होते मारामारी ।।४।।"

देशाची ही दुरावस्था पाहून उद्धवस्वामींच्या मनात अतिशय खोलवर परिणाम झाला आणि म्हणूनच काय तर वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत उद्धवस्वामी लोकसंग्रहाचे आणि समुदाय संघटनेचे महान कार्य केले .

सारंगपूर येथील मठ -

इंदुरबोधन उर्फ निजामाबादजवळील सारंगपूर येथील घटना . निजामाबाद हे हैदराबाद संस्थानाचे त्याकाळचे मोक्याचे ठिकाण . सारंगपूरचा निसर्ग अतिशय सुंदर व रम्य आहे . भरपूर वनश्री , उत्तम फळबाग , डोंगररांगा हे सारंगपूरचे वैभव होते. पण १६५२ मध्ये निजामाबादला प्रचंड दुष्काळ पडला . शेती ओस पडली ,गावे ओस पडली . निजाम संस्थानांनी याचा निमित्त साधून हिंदूंना विशेषतः ब्राह्माणांना छळणे सुरु केले . एक दिवस निजाम अधिकारी सारंगपूर ला आले व त्यांनी गावातील सर्व ब्रह्मणांना एकत्र यायला सांगितले . त्या ब्रह्माणांवर ते इस्लामी अधिकारी ओरडून म्हणाले - "तुमच्या हिंदू धर्मात पाऊस पडणारे मंत्र आहेत , तुमच्या साधू संतांनी त्यांच्या सामर्थ्याने पाऊस पडल्याच्या कथा पुराणात आहेत. ऐसे असता तुम्ही बम्मन लोक शांत कसे बसलात ? पाऊस पडावा यासाठी तुम्ही अनुष्ठान करा " जवळच येथे एक तलाव आहे तेथे उभे राहा आणि पाऊस पाडण्यासाठी अनुष्ठान करा . पाऊस पडण्या आधी बाहेर आलात तर याद राखा ! . जी हजुर म्हणत ब्राह्मण अनुष्ठानाला बसले , पण या संकटातून आपली कशी मुक्तता व्हावी याची विवंचना त्यांना लागली . कळवळीने ते देवाची प्रार्थना करू लागले . तेवढ्यातच त्यांच्या कानावर घनगंभीर आवाजात श्लोक पडला -

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।।
हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।
-- जय जय रघुवीर समर्थ

श्लोक म्हणणाऱ्या त्या तरुणाला ब्रह्माणांनी विचारल आपण कोण ? तो तेजस्वी तरुण म्हणाला मी उद्धव ! तलावात ब्राह्माण काय करीत आहात ते पाहा, अशी आज्ञा माझ्या गुरुदेवांनी मला दिली म्हणून मी इथे आलो . आपले गुरु कोण ? त्यांचे नाव काय ? ब्रह्माणांनी विचारले . माझे गुरु रामदास्वामी ! ते महाराष्ट्र प्रांती असतात . ब्राह्माणांनी आपली सगळी शोकांतिका उद्धवस्वामींना सांगितली . उध्दव स्वामींनी ब्रह्माणांच्या अनुष्ठानाची सगळी हकीगत समर्थांना सांगितली . समर्थ त्यावेळी निजामाबादेस होते . ते तंजावरच्या दिशेने निघाले होते . सारंगपूरच्या वनश्रीमुळे त्यांनी तिथे मुक्काम केला होता म्हणून त्यांनी उध्दवास ब्राह्मणांच्या ठिकणी पाठवले होते. समर्थ आणि उद्धवस्वामी त्या तलावाजवळ आले . ब्रह्माणांना तलावाबाहेर काढून तेथील एका मोठ्या शिळेवर त्यांनी मारुतीरायचे भव्य चित्र काढले व म्हणाले चला आता मारुतीरायला अभिषेक कररुया ! श्रद्धा ठेवा पाऊस नक्की पडेल .

परमेश्वराच्या रूपानी समर्थ प्रगटले होते. जसा जसा अभिषेकाचा मंत्र घोष व जलधारा वाढू लागल्या तसेतसे आकाशात मेघ दाटू लागले आणि काय आश्चर्य ! थोड्याच वेळात आकाशातून जलधारा वर्षू लागल्या . ब्राह्माणांना अतिशय आनंद झाला , त्यांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातला . समर्थानी येथे दोन मठ स्थापन केले . एक मठ निजामाबाद येथे स्थापन करून तेथे राममूर्ती ची स्थापना केली , तर दुसरा मठ सारंगपूर येथील मारुतीमंदिराजवळ स्थापन केला .

या प्रसंगाचे वर्णन करणारी उद्धवस्वामींची फार सुंदर कविता आहे .

अशा प्रकारे सारंगपूर येथे समर्थांनी अनेक शिष्य तयार केले . काही दिवस तेथे मुक्काम करून पुढच्या प्रवासाला निघाले . जातांना समर्थांनी तेथील मठाची व्यवस्था उध्दवास दिली . वास्तविक उद्धवस्वामींना समर्थांबरोबर पुढच्या प्रवासाला यायचे होते . परंतु समर्थांच्या कार्याचे महत्व लक्षात घेता जड अंतः कारणानी त्यांनी समर्थाना निरोप दिला . एकाच वेळी दोन मठाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान समर्थाच्या पुरुष शिष्यांपैकी फक्त उद्धवस्वामींना लाभला . स्त्री - शिष्यांपैकी अंबिकाबाई या वाळवे आणि राशिवडे या मठांच्या मठपती होत्या . उद्धवस्वामी जवळ जवळ दोन वर्ष सारंगपूर व निजामाबादेस राहिले व तिथे त्यांनी मोठा संप्रदाय तयार केला .

गुरुनिष्ठा

समर्थ व उद्धवस्वामी चाफळ येथील मठात रहात असताना झालेली घटना . समर्थांना घोड्यावर बसण्याची हौस होती. शिवाजी महाराजांनी त्यांना एक उत्तमपैकी घोडा दिला . एके दिवशी समर्थ दुपारीच घोड्यावर रपेट मारायला निघाले . उद्धवस्वामी त्यावेळी मठात होते . त्यांनी समर्थ उन्हात गेले आहेत , वाटेत त्यांना तहान लागली तर ? असा विचार करून उद्धव मठातून तुंब्या भर पाणी घेऊन समर्थांच्या मागे निघाले . बराच वेळ समर्थ घोड्यावरून फिरत होते उद्धवस्वामी पण त्यांच्या मागे तुंब्या घेत पळू लागले. अखेर समर्थांनी घोडा थांबवला आणि म्हणाले - " उद्धवा , तहान खूप लागलीय बघ "

स्वामीजी हे घ्या पाणी - हातातील पाण्याचा तुंबा समर्थांच्या हातात ठेवत उद्धव म्हणाला . समर्थांनी संपूर्ण तुंब्या रिकामा केला आणि उद्धवची पाठ थोपटीत म्हणाले - "उद्धवा तुझी गुरुनिष्ठा असामान्य आहे , तुझ्या पाण्याने माझा शिवस्वरूप आत्मा तृप्त झाला आहे. तुला आयुष्यात पाण्याची कमी पडणार नाही ."असे म्हणून समर्थानी उद्धवाला "शिव " हे नाव दिले . तेव्हा पासून बरेच जण उद्धवस्वामींना "शिव" किंवा "शिवरावस्वामी" म्हणू लागले . उद्धवस्वामींनी आपल्या काव्यात काही ठिकाणी "शिव "तर काही ठिकाणी "उद्धव " हे नाव ठेवले आहे . सारंगपूर येथे मेघांना उद्देशून लिहिलेली कविता "शिव" या नावाने लिहिली आहे . समर्थांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा योगायोग म्हणा उद्धवस्वामींचे दोन्ही मठ व समाधी गोदावरी तटावरच आहे .

माहुलीच्या ठाणेदारास वठणीवर आणले -

उद्धवस्वामी माहुली येथे काही दिवस वास्तव्याला होते . तेथील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर स्नान करत व गोदातीरी गायत्री जप करीत . ही बातमी माहुलीच्या ठाणेदारास कळली . त्याने आपल्या साथीदारांसह उद्धवस्वामीस अटक केली व त्यांना कोठडीत बंद केले . २-३ ते दिवस गेले उद्धवस्वामी बिना पाणी आणि अन्नाचे कोठडीत बांध होते . मनोमन ते समर्थांचा धावा करीत होते . "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।। हा श्लोक खोटा का ठरावा याचा ते विचार करू लागले ? प्रभू रामचंद्राने आपल्या भक्तीची उपेक्षा का करावी ? असा निराशाजनक विचार ते करू लागले .

समर्थ त्यावेळी परळीत होते . उद्धवाला अटक झाल्याची बातमी त्यांना कळताच ते मनापासून संतापले व आपला सोटा घेऊन ते तडक माहुलीच्या ठाणेदारास वठणीवर आणण्यास निघाले. समर्थांचा तो रुद्रावतार पाहून ठाणेदार घाबरला व समर्थांना मला क्षमा करा म्हणून गयावया करू लागला . समर्थांनी त्याला सोट्याने बेदम बदडून काढले व बंदिवासातून उद्धवाची सुटका केली . साश्रूनयनाने उद्धवाने समर्थांना नमस्कार केला . स्वामीजी ! आपलं समर्थाचिया सेवका वक्र पाहे । हे ब्रीद कधी खोट ठरणार नाही याची मला पूर्ण खात्री होती . तेव्हा समर्थांनी प्रेमाने उद्धवाच्या पाठीवरून हाथ फिरवला व म्हणाले - आपल्या मठात रोज सूर्यनमस्कारचा दंडक घातला आहे तो याच कारणासाठी ,हिंदू समाज हा दुबळा झाला आहे . आपण मठामध्ये भक्ती आणि शक्ती या दोन्हीच्या उपासना नित्य नेमाने केल्या पाहिजे . आपण स्वतःहुन आक्रमण करू नका , पण कोणी केल्यास ते मोडण्या इतके सामर्थ्यशाली व्हा ! परमेश्वर संकटकाळी मदत करेल हा सुद्धा मनाचा दुबळे पणाच आहे .

उद्धवस्वामींचे कीर्तन - चाफळ मठात पुष्कळ शिष्य एकत्र बसले होते . बऱ्याच वर्षांनी इतके शिष्य एकत्र जमण्याचा योग आला होता . प्रत्येक जण आपल्या मठाची व कार्याची माहिती देऊ लागला गप्पा ऐन रंगात आल्या असतांना समर्थ तिथे आले आणि म्हणाले चला देवळात जाऊ या , आता उध्दवाचे कीर्तन आहे . उद्धवस्वामींचा कीर्तनाचा व्यासंग किती दांडगा आहे हे प्रत्येकाला माहिती होते .त्यामुळे उद्धवस्वामींचा कीर्तन म्हणजे सगळ्यांना पर्वणीच होती .उद्धवस्वामींचं कीर्तन म्हणजे भक्तीचा अथांग सागर अशा आनंदातच सगळे जण मंदिरात येऊन बसले .

"नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।"

या संत नामदेवांच्या उक्तीप्रमाणे समर्थांचे सारे शिष्य कीर्तनाद्वारे भक्ती आणि ज्ञान यांचा सर्वत्र प्रसार करीत होते . उद्धवस्वामी तर भक्ती आणि ज्ञान याचे मूर्तिमंत स्वरूप होते . पांढरे शुभ्र रामदासी वस्त्र बांधून आज ते कीर्तनाला उभे होते . हातामध्ये झांज होते . पाठीमागे चाफळच्या दासमारुतीची प्रेमळ व शांतमुर्ती , दृष्टीसमोर प्रसन्न बांधविमोचन राम आणि मध्यभागी निस्पृह महंतांची सभा . अशा मनोहारी वातावरणात उद्धवस्वामींचे कीर्तन सुरु होते.

"शरण शरण हनुमंता । तुज आलो रामदूता ।।
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।।"

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांनी पूर्वरंगाला घेतला . बाकीच्या महंतांना हा अभंग नवीनच होता . त्यामुळे कीर्तन खूप रंगात आले . कीर्तनाचा पूर्वरंग झाला . बिभीषणाचे आख्यानही झाले . आरती साठी सारे जण उभे राहीले . समर्थ उद्धवस्वामींजवळ आले ,पाहतात तर काय उद्धवस्वामींच्या पांढऱ्या शुभ्र वस्त्राला शेंदूर लागलेला ! हा शेंदूर कुठला ? नीट निरखले तर खुद्द मारुतीराय उद्धवस्वामींच्या कीर्तनात हातात झांज घेऊन उभ्याने साथ करीत आहेत . उद्धवस्वामींच्या त्या भावतन्मय आणि प्रासादिक कीर्तनामुळे मारुतीची निश्चल मूर्ती नाचू लागली , डोलू लागली . समर्थांच्या सांगण्यावरून सगळ्यांनी -"सत्राने उड्डाणे हुंकार वदनी " - ही आरती म्हटली . त्यांनतर समर्थ म्हणाले -"उद्धवा ,येथून पूढे बसूनच कीर्तन करीत जा , आज मारुतीरायांना जवळ - जवळ पाच तास उभे राहून झांज वाजवावी लागली . तेव्हा बसूनच कीर्तन केलेले बरे . "

आपली आज्ञा प्रमाण ! असे म्हणून उद्धवस्वामींनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला . तेव्हापासून ते आजपर्यंत उद्धव मठाच्या परंपरेतील महंत बसूनच कीर्तन करतात . तसेच कीर्तनाच्या आधी व नंतर मागे वळून नमस्कार करतात . त्या मागे श्रद्धा अशी कि , ज्या प्रमाणे उद्धवस्वामींच्या कीर्तनात साथ केली त्याप्रमाणे आपल्याही कीर्तनात मारुतीराय साथ करीत आहेत. चाफळ माठातील उद्धवस्वामींच्या या कीर्तनाचे वर्णन करताना "दासविश्राम " या ग्रंथात आत्माराम महाराज म्हणतात -

"उद्धव बाबा थोर महंत । ज्याचे कीर्तनी नाचे हनुमंत ।।
पाळुनिया आज्ञा समर्थ । टाकळी माजी राहिला ।।"

उद्धवस्वामींचा शिष्यसंप्रदाय

समर्थ रामदास आणि गिरिधरस्वामी आंग्लाई मंदिराच्या तटावर उभे होते. त्यांची दृष्टी अजिंक्यताऱ्यावर खिळली होती . समोरून प्रचंड भगवी वस्त्र परिधान केलेला प्रचंड मोठा जनसमुदाय सज्जनगडाच्या दिशेने येत होता . सारेजण तरुण होते. समोरून येणाऱ्या या तरुण संन्यासांच्या संचालनास समर्थ मोठ्या कौतुकाने बघत होते . त्या संचालनाचे नेतृत्व करत होते उद्धवस्वामी ! आपल्या सातशे शिष्यांसह ते समर्थ भेटीला सज्जनगडावर आले होते . समर्थ स्वतः हुन त्यांना सामोरे गेले आणि त्याचं स्वागत केलं . उद्धवाने समर्थ चरणी साष्टांग नमस्कार घातला , समर्थांनी त्याला उठवून मिठी मारली . आपल्या शिष्याचा शिष्यवर्ग पाहून समर्थांना कृतार्थता वाटली .

"महंते महंत ची करावे । युक्ती बुद्धीने भरावे ।।
जाणते करून विवरावें । नाना देशी ।।"

ही समर्थांची ओवी उद्धवस्वामी खऱ्या अर्थी जगले होते . त्या दिवशी ते सातशे महंत सजजनगडावर मुक्कामी होते. या प्रसंगाचे वर्णन करताना गिरिधरस्वामी "समर्थप्रताप" या ग्रंथात लिहितात -

उद्धवे सप्तश भगवे निःस्पृह अतित आणिले ।
समर्थांसी श्री सज्जनपर्वतीं निवेदन केले ।
आपण येकाकी गुप्तस्वरूपे सेवकलीळे ।
सुलीन येकांतदर्शने घेतली ।।

पूर्वी उद्धवस्वामींनी टाकळी येथे एकटे राहून संप्रदाय प्रचाराच्या कार्याला सुरुवात केली तेव्हा संघटना कशी करावी , याचे मार्गदर्शन करणारे पत्र समर्थांनी उद्धवाला पाठवले होते . या पात्राला टाकळीचे आज्ञापत्र असे म्हणतात , या आज्ञापत्रात समर्थ लिहितात -

समर्थांच्या या आज्ञापत्राचे उद्धवस्वामींनी शब्दश:पालन केले आणि महाराष्ट्र , कर्नाटक , हैद्राबाद या विविध ठिकाणी हजाराहून अधिक लोकांना अनुग्रह दिला . समर्थांच्या कृपेने आणि सहवासाने उद्धवस्वामींचे जीवन पुष्प सार्थकी लागले . चाफळला असता त्यांना मारुतीरायाचे दर्शन झाले . माहूरगडला असता दत्तात्रयाचे दर्शन झाले . अफाट ग्रंथ संपदा व मोठा शिष्यसंप्रदाय यामुळे समर्थसंप्रदायात उद्धवस्वामींचे नाव अमर झाले .

संत वेण्णाबाई यांचा जन्म १६२८ साली कोल्हापूर येथे झाला . गोपाजीपंत गोसावी हे त्यांच्या वडिलांचे नाव , तर राधिकाबाई ही त्यांची आई . वेणू असे त्यांचे लहानपणीचे नाव . वेणू ही गोपाजीपंत यांची एकुलती एक मुलगी होती . गोपाजीपंत हे अतिशय भाविक व सश्रद्ध . त्यांनी लहानपणीच वेणू ला लिहायला , वाचायला शिकवलं . वेणू बुद्धीने हुशार होती , जेव्हा तिला चांगले लिहिता वाचता येऊ लागले तेव्हा त्यांनी तिच्या हातात - संत एकनाथ महाराज यांचे दोन ग्रंथ दिले . एक भागवत व दुसरा भावार्थ रामायण . या दोन्ही ग्रंथांचे तिने यथा सांग पारायण केली . राम व कृष्ण यांच्या कथा वाचण्यात तिने एवढे तल्लीन व्हावे की , तिला जेवणाचे सुद्धा भान नव्हते राहत . लहान वयातील तिची अंतर्मुखतां , अध्ययनशीलता पाहून बऱ्याच लोकांना तिचे आश्चर्य वाटे .

सन १६४० ! गोपाजीपंतांच्या वाड्यावर एकच गर्दी उठली होती . १२ वर्षाची वेणू आज पतीगृही जाणार होती . करवीरनगरी ला कायमचा रामराम करून ती आता मिरजेची वाट धरणार होती . मिरजेचे देशपांडे यांची सून म्हणून ती वावरणार होती . पण भावी आयुष्यात आणि स्वगृहाच्या दारात काय वाढून ठेवलाय ते फक्त परमेश्वरास ठाऊक होते ?.
जेमतेम १५ दिवस वेण्णाबाईंनी मिरजेत काढले असेल व तत्कालीन प्रथेप्रमाणे त्या माहेरी आल्या . तीन चार दिवस माहेरी राहणं होत नाही तर तोच निरोप आला की , " तुमचे पती आजारी आहेत आणि घरी आपली वाट पाहत आहेत ." तो निरोप ऐकून वेण्णाबाईंना धक्का बसला . त्या तातडीने मिरज येथे जायला निघाल्या . ब्राह्मण आळीत पाऊल टाकल्या बरोबर ,सगळ्यांच्या नजरा वेण्णाबाईंवर खिळल्या , सगळे लोक त्यांच्याकडे खेदाने , अनुकंपेने पाहू लागले . घरात पाऊल ठेवल्यावरचे विदारक दृश्य बघून त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला व आपल्या सासूबाईंच्या कुशीत लपून त्या ओक्शाबोक्शी रडू लागल्या . त्यांचे पती हे जग सोडून गेले होते . वेण्णाबाईंना वैधव्य प्राप्त झाले होते . नियती आपला खेळ खेळत होती . हे वैधव्य त्यांना शाप की वरदान ठरणार होतं हा येणारा काळच सांगणार होता . पण या वैधव्यानं त्यांच्या जीवन प्रवासाची दिशा व दृष्टी दोन्ही बदलली !

सन १६४८ ! वैधव्याचे भकास जीवन वेणाबाई जवळपास गेली ८ वर्षे जगत होत्या . त्यांच्या सासूबाई त्यांची आईप्रमाणे काळजी घेत होत्या , पण सौभाग्याचा तिलकाची रिकामी जागा काही त्या भरून काढू शकणार नव्हत्या . ही जागा आता फक्त एकाच ठिकाणी भरून निघणार होती आणि ती म्हणजे सद्गुरूशरण .

वैधव्यानंतर वेण्णाबाई अधिक अंतर्मुख झाल्या . आता रामायण , भागवत या ग्रंथांचे अध्ययन अधिक वाढले होते. त्यामुळे , मनात खूप शंका उपस्थित होत पण त्याच निराकरण करणारी एकही अधिकारी व्यक्ती त्यांना भेटली नाही . त्यामुळे वेण्णाबाईंना आता सद्गुरूची ओढ लागली .

"सद्गुरूविण जन्म निर्फळ । सद्गुरूविण दुःख सकळ ।
सद्गुरूविण तळमळ । जाणार नाही ।।"

आपण जे वाचतो त्याचा अर्थ समजण्यासाठी आणि समजलेला अर्थ जीवनात उतरवण्यासाठी सद्गुरू प्राप्ती व्हावी अशी ईच्छा त्यांच्या मनी बळावू लागली . १६४८ सालच्या श्रावण महिन्यातील सकाळ त्यांच्या आयुष्यला कलाटणी देणारी व त्यांच्या मनातील सद्गुरू तळमळ दूर करणारी ठरली . वेण्णाबाई अंगणात असतांना त्यांच्या कानी "तुंबाभर दूध मिळेल का ? हा प्रश्न आला" . एक चाळीस वर्षाचा संन्यासी , अंगामध्ये हुर्मुजी रंगाचे वस्त्र परिधान केलेला . एका हातात कुबडी , पायात खडावा अन काखेत झोळी घेतलेला तपस्वी त्यांच्या समोर उभा होता . अंगकांती विलक्षण तेजस्वी , सर्वांगावर उपासनेचे आणि साधनेचे तेज झळाळत होते . वेण्णाबाईंना त्यांचे हे स्वरूप बघून क्षणभर आपल्या समोर मारुतीराय उभे असल्या सारखे वाटले . त्या तश्याच स्तिमित अवस्थेत विचार करू लागल्या की आपल्या समोर उभी असलेली हि व्यक्ती कोण , संन्यासी , बैरागी की साक्षात रामभक्त हनुमान ? तेवढ्यात आतून त्यांच्या सासूबाईंची हाक कानी पडली - "श्रावण मास आहे ना ? त्यामुळे मारुतीला दुधाच्या नैवेद्याचा नवस केला आहे तेव्हा दूध नाही " समर्थांना उद्देशून तवेण्णा बाईंच्या सासूबाई म्हणाल्या . वेण्णा बाई तडक आत गेल्या व त्या आपल्या सासूबाईंना सांगू लागल्या - आई ! तुंबाभर दूध मागणारा संन्यासी कुणी भिक्षेकरी नसून साक्षात हनुमंताचा अवतार आहे . मी स्वतः डोळ्याने त्यांची शेपूट व गदा पहिली आहे ! तुमचा दुधाचा नवस आहे ना मग चला माझ्याबरोबर . वेण्णाबाई व त्यांच्या सासूबाई तुंबाभर दुधघेऊन बाहेर आल्या तर बघतात की तो भिक्षेकरी निघून गेला होता . आपल्या घरी वस्तू असूनही एक अधिकारी व्यक्ती व मारुतीरायचा अवतार रिक्त हस्ते निघून गेला याची हुरहूर त्या दोघीनां लागली . पुढे वेण्णाबाईंना काव्यस्फूर्ती झाली तेव्हा त्यांनी रचलेला खालील अभंग त्या तुंबाभर दुधाची आठवण करून देतो

मागावया ते याचक । त्यासी दवडिता निरर्थक ।
सामर्थ्य असोन कोणी येक । तो अधर्मी जाणावा ।।

आकस्मित आलेला तो योगी पुरुष आला आणि निघून गेला . पण त्या सत्पुरुषाचे काही क्षणांचे दर्शन वेण्णाबाईंना मोठा आशेचा आणि आधाराचा वाटला .

पुर्ते कोणा कडे पाहिना । पुर्ते कोणासी बोलेना ।।
पुर्ते येकेस्थळी राहीना । उठोन जातो ।।

जातो स्थळ स्थळ ते सांगिना । सांगितले तेथे जाईना ।
आपुली स्थिती अनुमाना । येऊच नेदी ।।

प्रत्येय बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकाला ।
नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ।।
-- ग्रंथराज दासबोध

या आत्मचरित्रानुसार समर्थ वेण्णाबाईंना चटक लावून गेले . आता समर्थांचा ध्यास त्यांना लागला होता . तो भिक्षेकरी पुन्हा यावा असे त्यांना वाटू लागले . आपण त्यांचा अपमान केला आता ते पुन्हा येतील का असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला . पण , खरे साधूपुरुष यांना मानापमान नसतोच , या विचाराने त्या स्वतः च समाधान करून घेत व समर्थ पुन्हा येतील अशी आशा बाळगत . त्या काळात वेण्णाबाईंच्या मनःस्थितीचे वर्णन करतांना गिरीधरस्वामी लिहितात -

" तैसी मूर्ती दृष्टी पडो । तैशा पाई वृत्ती जडो ।।१।।
ब्रह्माचारी सूत्र शिखा । पाई शोभती पादुका ।।२।।
कटी अडबंद कौपीन । कंठी तुळसीमणी भूषण ।।३।।
दिव्य मुख दिव्यनेत्र । भाळी आवळू सुंदर ।।४।।
रामदास दिव्य नाम । सखा ज्याचा आत्माराम ।।५।।
ऐसा सद्गुरुचरणावरी । किंकर लोळे दासपरी ।। ६ ।। "

अशा मनः स्थितीत बरेच दिवस गेलेत आणि एक दिवस वेण्णाबाईंच्या आयुष्यात तो भाग्याचा दिवस आला . दुपारी भोजनसमयी त्यांच्या घरी भिक्षेला एक याचक दारात उभा झाला आणि मोठ्याने श्लोक म्हणू लागला -

"अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ।
जया वर्णिता सिणली वेड वाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।। "

तुंबाभर भिक्षा मागणारा तो भिक्षेकरी आज माधुकरी मागायला आला होता . समर्थ आज दारात नव्हे तर एकदम वाड्याच्या अंगणात उभे होते . वेण्णाबाईंच्या सासूबाई स्वयंपाकघरात जाऊन भिक्षा घेऊन आल्या . वेण्णाबाई समर्थांच्या दर्शनार्थ बाहेर आल्या , वेण्णाबाईंच्या कपाळी सौभ्याग्यचा कुमकुम तिलक नसून वैधव्याचा जीवन बघून त्यांनी अतिशय प्रेमाने त्यांना विचारले -

"बाळ सध्या काय वाचतेस तू ? "
नाथांचे भागवत वाचते आहे मी . समर्थानी आत्मीयतेने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर वेण्णाबाईंनी तितक्याच तन्मयतेने दिले . "नुसतेच वाचतेस ,की अर्थ समजावून घेऊन वाचतेस ? समर्थांनी लगेच त्यांना पुढचा प्रश्न विचारला .

वेण्णाबाईंना म्हणाल्या - वाचतांना अर्थ समजावून घेते पण मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मावळतात . कोण त्यांचा अर्थ समजावून सांगणार ? "
समर्थ म्हणाले - कोणते प्रश्न मनात येतात ?
आजपर्यंत मनात डांबून ठेवलेले सगळे प्रश्न वेण्णाबाईंनी एकादमात त्यांच्या पुढे खालील प्रमाणे उपस्थित केले .

१. जीव कशाला म्हणायचे ? उ - जो अज्ञानी आहे त्याला जीव म्हणायचे . २. शिवाचे लक्षण कोणते ? उ - सर्वज्ञानी असणे हे शिवाचे लक्षण आहे . ३. आत्मा म्हणजे काय ? उ - आत्मा हा शिवस्वरूप असतो . ४. परमात्मा म्हणजे काय ? उ - परमात्मा हा शिवस्वरूप असतो . ५. अनात्मा म्हणजे काय ? उ - अनात्मा हा अनुर्वाच्या असतो . ६. प्रपंच म्हणजे काय ? उ - प्रपंच हा मायिक जाणावा . ७. सृष्टी कोणी निर्माण केली ? उ - सृष्टी ही परमेश्वराने निर्माण केली . ८. शेवटी सृष्टी कोण संहार करते ? उ - शेवटी परमेश्वर सृष्टीचा हा खेळ मोडून टाकतो . ९.

एवढा संवाद संपला . तेवढ्यात वेण्णाबाईंच्या सासूबाई भिक्षाघेऊन आल्या आणि त्यांनी समर्थांच्या झोळीत भिक्षा घातली . "रामराया आपले कल्याण करील असा आशीर्वाद दिला ". त्या माउलीसाठी समर्थ हे केवळ भिक्षेसाठी माधुकरी मागायला येत्यात त्यासारखेच एक गोसावी , पण वेण्णाबाईंना मात्र समर्थांमधला वेगळेपणा जाणवला . समर्थांचेवैशिष्ट्य व अधिकार त्यांनी पुरेपूर ओळखला . ज्या सद्गुरू भेटीसाठी आपण गेले कित्येक दिवस तळमळत होतो , ते सद्गुरू हेच होत ही खूणगाठ त्यांच्या मनी पटली .

शिष्याची मनोभूमी तयारझाली म्हणजे उपदेशाचे बीज पेरण्यासाठी सद्गुरु चालत दारी येतात असे त्यांना त्यांच्या वडिलांनी पूर्वी सांगितले होते . पितृवत्सल समर्थांच्या भेटीने पितृवचन खरे झाल्याची त्यांची खात्री पटली . रोज ध्यान करतांना त्या समर्थांची मूर्ती चित्तात साठवू लागल्या . समर्थांचा त्यांना आता ध्यास लागला होता . त्यांची साधन वाढली , चिंतन वाढले , अंतर्मुखता वाढली , एकाग्रता वाढली !

कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात , समर्थांचे कीर्तन सुरु असल्याची वार्ता वेण्णाबाईंना कळाली . त्यांचे मन कोल्हापुरात समर्थांचे कीर्तन ऐकण्यास व त्यांच्या दर्शनास व्याकुळ झाले . त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना , बरेच दिवस माहेरी गेले नसल्याने माहेरी जाण्याची ईच्छा प्रगट केली शिवाय कोल्हापूरला समर्थांचे कीर्तन सुरु आहे तेव्हा काही काळ घरी जाऊन येण्याची विनंती त्यांनी केली . त्यांनी पण त्याला लगेच होकार दिला .

बऱ्याच दिवसानंतर मुलगी माहेरी आल्याने त्यांच्या आई वडिलांना पण अतिशय आनंद झाला . बोलता बोलता घरात आई वडिलांनी पण समर्थांचा अनुग्रह घेतल्याचा ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला . सद्गुरुकृपेची ही एक खूण असे त्यांना वाटू लागले . वडिलांबरोबर वेणाबाई रोज समर्थांच्या कीर्तनात जाऊ लागल्या . समर्थांचे कीर्तन हे नुसते अध्यात्मिक नसून त्यात सामान्य माणसाचा संसार सुखाचा कसा होईल याचा खोलवर अभ्यास दिसे . माणसाच्या रोजच्या व्यवहारिक जीवनापासून ते राजकारण व स्वराज्य का मिळाले पाहिजे या विचारांची गरुडझेप पाहून वेणाबाई अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्या . वेण्णाबाईंना समर्थांचा लागलेला छंद हळूहळू वाढत गेला व कित्येकदा कीर्तन संपल्यानंतर त्या तासनतास त्यांचा मनात येणाऱ्या प्रश्नांचे व शंकांचे निराकरण करत असे . समर्थ अत्यंत प्रेमळपणे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत . वेण्णाबाईंच समर्थांच्या प्रत्येक कीर्तनात हजर राहणं , कीर्तन संपल्यानंतर समर्थांना समर्थांना तासंतास प्रश्न विचारणं हे लोकांच्या कृष्णनजरेतून काही सुटले नाही . लोक वेण्णाबाईंना पाण्यात पाहू लागले त्यांची निंदाही करू लागले . अगदी समर्थांना निष्ठा असलेले लोक सुद्धा त्यांना नावं ठेवू लागले .

ही सारी आपली चेष्टा होते आहे हे वेण्णाबाईंच्या लक्षात येत होते , पण त्यांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले होते . कारण लोकांची पर्वा करायला लागलॊ तर आपले वयक्तिक आयुष्य लोकांच्या नजरेत चांगलं होईल पण पारमार्थिक आयुष्याचे कल्याण होणार नाही याची पूर्ण खात्री होती . लोक हे केवळ सुखाचे सोबती आहेत . संकट समयी आपले सद्गुरूच आपल्याला तारून नेणार आहेत याची त्यांना जाणीव होती . जेव्हा त्यांना काव्यस्फूर्ती झाली तेव्हा ते आपल्या निंदकाचे आभार मानितात . त्यांचा हा अभंग त्यावेळच्या मनः स्थितीचे पूर्णपणे वर्णन करतो

रामनामेंविण मज कंठेना ।।ध्रु ०।।
कोणी वंदिती कोणी निंदिती ।
वास मी त्यांची पाहीना ।।१।।

हृदयी धरिले सद्गुरुचरणा ।
प्राणांतिही विसंबेना ।।२।।

वेणीचे निजधन रामची जीवन ।
होणार ते का सुखे होईना ।।३।।

एका अभंगात तर वेण्णाबाईंनी आपल्या निंदकाचे आभार मानलेत . निंदा करणारे लोक आपले हितच करतात , असे म्हणून वेण्णाबाई लिहितात .

" माता थोर की पाहता जनी ।
ते मल कढी पृथक भजनी ।।
धन्य माझी निंदक जननी ।
जिव्हा करुनि क्षाळीजे ।।"

माझी निंदा करणारे लोक मातेपेक्षाही अधिक धन्य होत .कारण माता मुलाची घाण कागदाने किंवा पानाने काढते , पण माझे निंदक इतके सज्जन आहेत की ,त्यांनी माझ्या मनातील मळ ते त्यांच्या जिभेने स्वच्छ करतात .

जन निंदेचे हे लोण वेण्णाबाईंच्या घरापर्यंत पोहोचले . आता बाहेरच्या लोकांसारखे त्यांचे माता -पिता सुद्धा , तू आता समर्थांना भेटत नको जाऊस म्हणू लागले . तेव्हा मात्र त्यांना मनस्वी वाईट वाटले .

वेण्णाबाईंना विषप्रयोग

निंदक व लोकांची पर्वा न करता वेण्णाबाईंनी आपले सारे आयुष्य कंठले असते . पण घरात आई वडिलांचा विरोध सुरु झाला तेव्हा आता त्यांच्या मनाविरुद्ध कसे वागायचे हा यक्ष प्रश्न त्यांना पडला . आपली कन्या निष्कलंक , चारित्र्यसंपन्न आहे याची त्या माता - पित्यांना पूर्ण जाण होती पण ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही दंडक आपण पाळायला हवे . या उपदेशात व्देष नव्हता फक्त त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालू होता . आई वडिलांच्या या प्रयत्नाने त्या संभ्रमात पडल्या ,इतके वर्ष आपण सद्गुरू शोधात भटकत होतो आणि आता समर्थानुग्रह घेण्याची वेळ अली तर हे पारमार्थिक जीवन लोकलज्जेस्तव का सोडून द्यावे असा प्रश्न त्यांच्या मनी पडला . तेव्हा आज कीर्तन संपल्यानंतर समर्थांना भेटून आपल्या मानतील गोष्ट समर्थांना सांगावी आणि आई - वडील कि समर्थ ? समाज जीवन की परमेश्वर ? लौकिक जीवन की अध्यात्मिक जीवन ? या मनातील प्रश्नांचा आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा . समर्थांनी आज नेमके मीराबाईंचे आख्यान घेतेले होते , जणू काही त्यांनी वेण्णाबाईंचे मन ओळखले होते . मीराबाईंनी जननिंदा कशी सहन केली याचे रसभरीत वर्णन समर्थ करीत असतांना वेण्णाबाईंचे डोळे पाणावले . साधुसंतांना लोकनिंदेला कसे सामोरे जावे लागते याचे रसभरीत आख्यान समर्थांनी पूर्वरंगात अनेक उदाहरणे घेऊन समजाविले -

उदंड लोक धिक्कारिती । तरी चळी न द्यावी शांती ।
दुर्जनास मिळोन जाती । धन्य तो साधू ।।

समर्थांचा तो पूर्वरंग व मीराबाईंचे आख्यान ऐकून त्यांचा दाह शांत झाला . ज्या शंका मनात होत्या त्याचे निराकरण समर्थांनी आधीच केले . मनातील शंका दूर झाल्या . कीर्तन संपल्याबरोबर वेण्णाबाई समर्थांच्या दर्शनास गेल्या व त्यांनी समर्थांना मीराबाईंच्या अभांगातील शंका विचारल्या . जवळ जवळ पहाटे ४. ३० पर्यंत त्यांची समर्थांसोबत चर्चा सुरु होती . जेव्हा मंदिरातील पहाटेचा चौघडा वाजाल तेव्हा सगळ्यांना भान आले . मीराबाई आज अतिशय प्रसन्न होत्या . पण घरी गेल्यावर आपल्या पदरी काय वाढून ठेवलाय याची त्यांना काय कल्पना असणार .

गावातील २-४ प्रतिष्ठित मंडळी त्यांचा वाड्यावर बसले होते आणि त्यांच्या वडिलांना सांगू लागले . काल पर्यन्त कीर्तन संपल्यानंतर तासन तास गप्पा चालायच्या आज मात्र हद्द झाली चक्क पहाटे आपली मुलगी कीर्तनांहून घरी परत येते आहे . समाज मर्यादेचं काही भान आहे कि नाही या पोरीला . आता तर कीर्तनकारच्या स्थळी मुक्काम पण होऊ लागले . त्यांचे हे बोलणे ऐकून वेणाबाई शांतपणे म्हणाल्या .

आमची वेदान्तावर चर्चा सुरु होती , मंदिरातील चौघडा वजला तेव्हा आम्हांला पहाट झाल्याचे भान झाले. शिवाय मी एकटी नव्हती माझ्यासोबत उद्धवस्वामी, कल्याणस्वामी ,दिवाकर गोसावी हे पण होते . वेण्णाबाईंचे हे उत्तर ऐकून आलेले गृहस्थ अजून संतापले व म्हणाले काल पर्यन्त ही मुलगी मान वर करून बोलत नव्हती आज ताडकन उत्तर देते आहे हीच काय तर हिची रामभक्ती . वेण्णाबाईंना समर्थांच्या कालच्या कीर्तनातला पूर्वरंग आठवला , त्या पुन्हा तेजस्वीपणे म्हणाल्या - मी शुद्ध आहे , निष्कलंक आहे जशी मीराबाईंची कृष्णावर भक्ती होती तशी माझी रामावर भक्ती आहे .

उपहासाने ते गृहस्थ म्हणाले - अहो , बाईसाहेब मीराबाईंनी विष पचवून आपली भक्ती सिद्ध केली , तुमच्याच्याने होणार आहे का ते साहस ? भक्तीच्या गप्पा मारणे सोपं आहे

वेण्णाबाई शांतपणे म्हणाल्या - " माझी अशी दृढ श्रद्धा आहे की , मी जर पवित्र असेल आणि माझी भक्ती खरी असेल तर मला विषबाधा मुळीच होणार नाही . आणा तो विषप्याला मी तो आनंदाने ग्रहण करीन . " वेण्णाबाईंचे हे आत्मविश्वासकी उत्तर बघून आलेले ते सर्व गृहस्थ चवताळले आणि त्यांनी तो विषप्याला वेणाबाई समोर ठेवला . आता खऱ्या अर्थाने वेण्णाबाईंची परीक्षा होती , त्यांचीच नव्हे तर , प्रभुरामचंद्रांच्या उपासनेची , समर्थावर असलेली त्यांच्या निष्ठेची पण .

त्यांनी शांतपणे रामचंद्राचे ध्यान केले , समर्थांचे समर्थांचे स्मरण करीत तो प्याला त्यांनी आपल्या ओठांना लावला . विषप्राशन केल्या नंतर ही वेण्णाबाई तशाच तेजस्वी व शांत दिसत होत्या . हे बघून आलेल्या त्या गृहस्थांचे चेहेरे पडले . सारे जण एकमेकांकडे अपराधिक नजरेने बघू लागले . प्रत्येकाला आपली चूक उमगली होती पण कोणालाच कंठ फुटेना आणि पुढेहून क्षमा मागण्याचे धाडस होई ना . वेण्णाबाईंच्या घरातील त्या घनगंभीर शांततेचा भंग करीत एक श्लोक दुमदुमला -

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ।।
हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।
-- जय जय रघुवीर समर्थ

तो आवाज होता साक्षात वेण्णाबाईंचे सद्गुरु - समर्थ रामदास्वामी यांचा . समर्थ अंगणात येताच सारे जण उभे झाले व त्यांनी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला व झालेल्या गुन्हा बद्दल क्षमा मागू लागले . राधिकाबाई समर्थांसाठी भिक्षा घेऊन आल्या तेव्हा समर्थ म्हणाले - " आई ! आज आम्हाला माधुकरी नको तर भिक्षे मध्ये आपली कन्या आम्ही नेणार आहोत .येथून पुढे त्या संप्रदायाच्या चाफळ येथील मठात राहणार आहेत ". गोपाजी पंत व राधिकाबाई यांना आपली कूस धन्य झाल्यासारखे वाटले . साऱ्या गावकर्यांनी वेण्णाबाईंना निरोप दिला . त्यांना निरोप देण्यासाठी देण्यासाठी सारा गाव लोटला . सर्वात पुढे समर्थ , मागे कल्याण , उद्धव आणि वेण्णा असा प्रवास सुरु झाला . वेण्णाबाईंच्या जीवनाचे नवे पर्व आता सुरु झाले होते .

चाफळ मठात वेण्णाबाईंनी पाउल ठेवले ते वेण्णास्वामी म्हणून . आता कोणी त्यांना वेणू किंवा वेणाबाई म्हणत नसे . कारण त्या आता समर्थ अनुग्रहित झाल्या होत्या . समर्थ सांप्रदायिक झाल्या होत्या नव्हे नव्हे तर रामदासी झाल्या होत्या . समर्थांचा अनुग्रह मिळाल्या नंतर त्यांच्यातली प्रतिभाशक्ती पूर्णपणे जागरूक झाली होती . त्यांना आता काव्य स्फुरू लागले होते . चाफळ च्या मठात त्या प्रभुरामचंद्रा समोर आपल्या भक्तीचा भावकल्लोळ शब्दांकित करू लागल्या .

बंधविमोचन राम । माझा बांधविमोचन राम ।
सकलही ऋषीमुनी भजती जयासी । एकचि तो सुखधाम ।। १ ।।
सद्गुरुकृपा ओळखिला जो । कौसल्येचा राम ।।२ ।।
भावभक्तीच्या सुलभसाधनी । पुरवी सकळही काम ।।३।।
शरणही वेणा आत्मारामा । पावली पूर्णविराम ।।४।।

वेण्णास्वामींचे अभंग सर्वतमुखी होऊ लागले . अभंगाच्या रूपाने त्यांचा नावलौकिक होऊ लागला मात्र त्या म्हणत -

आम्ही स्वामींचे अंकित । रामनामे मुंद्रांकित ।। धृ ।।
गुरुवाक्य प्रेमनौका । मायासागर तरलो देखा ।। १ ।।
अहंब्रह्म उपदेशिले । अहं गेले ब्रह्म ठेले ।।२ ।।
आली अनुभवाची खूण । खूण केली रामार्पण ।।३।।
वेणीस्वामी अवघा जाला । विज्ञानासी अंत झाला ।। ४ ।।

त्यांच्या वेदान्तावरील प्रभुत्वाने सर्वाना साश्चर्य कौतुक वाटे . याच काळात त्यांनी "पंचीकरण " हा प्रबंध लिहिला . वेण्णास्वामी आता मठामध्ये सर्वांच्या आदरस्थानी बसल्या होत्या . त्या मात्र या सगळ्याचे श्रेय समर्थाना व प्रभुरामचंद्राला देत . याचकाळात सीतास्वयंवर आणि रामायण या दोन ग्रंथांची त्यांनी रचना केली . सीतास्वयंवर हा त्यांचा ग्रंथ फारच लोकप्रिय झाला . कृष्णस्तुति ,राम - गुहक संवाद , कौल या स्फुटप्रकरणांचे लेखनही त्यांनी केले . कौल या त्यांच्या काव्याला सामाजिक जाणिवेची जबरदस्त बैठक आहे . या काव्यात प्रजा रामरायाला जे मागणे मागते आहे ते स्वकेंद्रित नसून सगळी प्रजा सुखी असावी ,समृद्ध असावी ,दारिद्र्य , रोगराई ,भ्रष्टाचार नसावा अशी मागणी प्रजाजन करीत आहे . एवढेच नव्हे तर शेवटी राज्यकर्त्यांना भेटण्याची सामान्य जनांना संमती असावी असे म्हणून वेण्णास्वामींनी त्यांच्या सामाजिक जाणिवेतील परिपक्व व साहसी वृत्तीचे दर्शन दाखविले आहे.

समर्थ मोठे क्रांतिकारक संत होते - ज्या काळात विधवा स्त्रियांच्या कीर्तनाला जाणे समाज कमीपणाचे समजत त्याकाळात समर्थांनी वेण्णाबाईंना कीर्तनाचा अधिकार दिला आणि चाफळच्या मठात रामनवमीच्या उत्सवात त्यांचे कीर्तन ठेवले . सगळ्या चाफळ गावात , शिष्यांमध्ये आणि मठा मध्ये चर्चा होऊ लागली की रामनवमीच्या उत्सवात कीर्तन आणि ते पण एका विधवेच ? पण समर्थ स्वतःहून त्यांच्या कीर्तनास येऊन बसले . त्यामुळे गावातील आणि शिष्य हे चुपचाप मंडपात येऊन बसले. वेण्णास्वामींचे पाठांतर ,त्यांची विद्वत्ता , भक्तिरसाने आणि समाजचिंतनाने रसरसलेले भावप्रधान कीर्तन ऐकून सगळे जण मंत्रमुग्ध झाले . त्यांचा कीर्तनाचा व्यासंग पाहून कित्येकांनी त्यांच्या चरणी आपले मस्तक टेकवले . समर्थ प्रतापात गिरिधरस्वामी म्हणतात -

वेणाबाई वांचुनी काही । इतर कन्येसी आज्ञा नाही ।
येकासनी बैसोनी कीर्तन करणे पाही । प्रसंगानुसार मर्यादे ।।
नीति न्याय भजन मर्यादा । समर्थ संप्रदाई चालिली सर्वदा ।
कर्म उपासना ज्ञानविज्ञान प्रसिद्धी । दासबोध ग्रंथ निर्धार ।।

सभेमध्ये उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी फक्त वेण्णास्वामी यांना होती . वेण्णाबाईंची कीर्ती वाढली . १६५५ साली मिरज येथे एक मठ व मारुती मंदिर स्थापन करून समर्थांनीं वेणास्वामी यांना त्या मठाचे मठपती केले .एक विधवा स्त्री मठपती झाली . परमार्थाचा प्रसार करणाऱ्या एका मठाची सूत्रधार झाली . वेण्णास्वामींच्या अधिकारवाणीला आज अधिकाराने पीठ मिळाले , पण वेणास्वामी मात्र विनम्रच होत्या .

मोठ्या मोठ्या पंडितांचा वादविवादात पराभव करण्याएवढी विद्वत्ता त्यांनी संपादन केली होती . या विद्वत्तेला रामायणाच्या भक्तीची विलक्षण गोडी होती म्हणून की काय वामन पंडितांसारखे गाढे व्यासंगी पंडित व सुप्रसिद्ध कवी हातात वीणा घेऊन स्वतः वेण्णास्वामींच्या कीर्तनात साथ देत असत . एवढेच काय तर १६७६ साली स्वतः गागाभट्ट वेण्णास्वामींची कीर्ती ऐकून त्यांच्या कीर्तनांत येऊन बसले . वेण्णास्वामींनी या कीर्तनाद्वारे संप्रादयाचा खूप प्रसार केला . उत्तरप्रदेश व कर्नाटकात पण वेण्णास्वामींचे शिष्य असल्याचा समर्थप्रताप ग्रंथात उल्लेख आहे .

वेणास्वामी जश्या सश्रद्ध आणि भाविक होत्या तश्या त्या शिस्तबद्धही होत्या . बेशिस्त त्यांना मुळीच खपत नसे . मात्र एखाद्याचे माणसाचे किंवा साधकाचे बेशिस्त वर्तन पहिले की त्या ती चूक अश्या पद्धतींनी दाखवत की समोरच्याला आपण केलेल्या चुकीची तर जाणीव होतेच शिवाय त्याचं मनपण दुखावल्या जात नसे . एकदा असेच एक महंत खाटेवर आडवा पडून दासबोध ग्रंथ वाचत होता . दासबोधासारखी पवित्र पोथी , जीवनदायी ग्रंथ असा अंथरुणावर लोळून वाचणे वेण्णास्वामींना पटले नाही . त्या महंताच्या खाटेजवळ गेल्या व त्यांनी त्या महंताला वाकून नमस्कार केला . वेण्णास्वामींचा अधिकार त्याला माहित होता , घाबरून तो म्हणाला - आपण हे काय करताय ? - वेण्णास्वामी म्हणाल्या माफ करा मी आपल्याला नाही ; दासबोधस्वरूपी समर्थांना नमस्कार केला . समर्थ नेहमी म्हणतात ना मी दासबोध स्वरूपी आहे म्हणून !

ते महंत खजील झाला आणि त्याला त्याची चूक उमगली . सन १६५७ ची गोष्ट रमनवमी उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी वेणास्वामी यांना मुद्दामून मिरजेहून बोलावण्यात आले . समर्थ त्यावेळी शिवथरघळीत होते . मठाची व उत्सवाची सर्व तयारी वेण्णास्वामींवर सोपवून अक्काबाई निवडक स्त्रीशिष्यांसोबत , सातारा, कऱ्हाड ,सांगली या भागात उत्सवासाठी भिक्षा मागायला गेल्या . आपल्याला उत्सवाची एवढीमोठी जवाबदारी पेलणार का याचा त्या विचार करू लागल्या .त्यातच अक्काबाई बाहेर गेल्यानंतर ४ दिवसांनी वेण्णाबाईंनी अंथरूण धरिले . पंधरा दिवस झाले तरी ताप काही हटेना . तेवढ्यात समर्थांचे पत्र आले की , "आम्ही राममूर्तींचे उध्वार्चनासमयी येऊ " . आता वेण्णास्वामी रडकुंडीला आल्या ,ताप आल्याने अंथरूण सोडता येईना इकडे उत्सवाची तयारी खोळंबली आहे , आता एका रामरायाशिवाय दुसरा कोण यातून सोडविणार म्हणून अंगातले सगळे बळ एकवटून त्या उठल्या व मंदिरात जाऊन रामरायाला साश्रूनयनांनी विनवू लागल्या . वेण्णास्वामींची ही शोचनीय स्थिती पाहून प्रत्यक्ष राममूर्तीच्या नेत्रातून अश्रू आले . या घटनेनंतर मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली व रामरायाचा उत्सव अतिशय व्यवस्थित पार पडला . समर्थांना आणि अक्काबाईंना पण वेण्णास्वामींची ही कर्तबगारी पाहून अतिशय कौतुक वाटले .

आपल्या या प्रसंगाचे वर्णन अभंगात करताना वेणास्वामी म्हणतात -

पतितपावना जानकीजीवना ।
अरविंदनयना रामराया ।। धृ ।।
आक्का गाव गेली मज वेथा जाली ।
दयाळा राहिली नवमी तुझी ।। १ ।।
नवमी समारंभ पाहू द्या बरवा ।
मग देह राघवा जावो राहो ।। २ ।।
अक्का गाव जाता तूच निरविले समर्था ।
ते भाक रघुनाथा साच करी ।। ३ ।।
सोसवेना वेथा ऐके सिताकांता ।
वेणीचे आकांता पाव वेगीं ।। ४ ।
ऐकुनी करुणा अयोध्येचा राणा ।
मूर्तीच्या नयन अश्रू आले ।।५।।
ऐकुनी वचन जानकी जीवन ।
कृपेचा पावन वेणीस दिल्हा ।।६।।

शिष्याकडून गुरूचा पराभव झाला तर गुरूला अभिमानच वाटतो . पराभवाचा अपमान न वाटता त्या पराभवाने त्यांचा आनंद दुणावतो . अशा प्रकारचा विजयी पराभव स्वीकारण्याचा प्रसंग समर्थांच्या वाट्याला आला . एकदा समर्थ वेण्णास्वामींच्या' मठामध्ये दत्त म्हणून उभे झाले आणि घनगंभीर आवाजात म्हणू लागले -

असे हो जया अंतरी देव तैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ।
अनन्यास रक्षीतसे चाप पाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।।

--- जय जय रघुवीर समर्थ

माठातील काशीराज या विद्यार्थ्यास म्हणाले , " बाळ पाय धुवायला पाणी दे " . त्याने देवाची पूजा करण्यासाठी तांब्यात ठेवलेले सोवळ्याचे पाणी समर्थाना पाय धुवायला दिले . वेण्णास्वामींकडे बघून मिस्किलपणे हास्य करून समर्थ म्हणाले - " या पाठशाळेतील सर्व मुले ब्रह्मरूपी झाले की काय ? सोवळ्याचे पाणी पाय धुवायला दिले म्हणून विचारतो . "

नम्रपणे उत्तर देत वेण्णास्वामी म्हणाल्या -"गुरुदेव , जैसा देव तैसा गुरु " ही आपली ग्रंथराज दासबोध मधील शिकवण . देवापेक्षा गुरु श्रेष्ठ हे आपणच म्हणता ना ;तेव्हा या पोराने देवपूजेचे पाणीच आपण देवस्वरूप आहात म्हणून दिले .

समर्थ हसले , वेण्णास्वामींच्या युक्तिवादाने ते निरुत्तर झाले होते . 'शिष्यदिच्छेत्पराजयमं' अशी त्यांची अवस्था झाली .

सन १६७८ . चाफळच्या रामजन्मोत्सवासाठी वेणास्वामींनी मिरज सोडले ते कायमचे . मिरजेकरांना हे काहीच ठाऊक नव्हते . मठाची व्यवस्था बाई नावाच्या बाईंवर सोडून त्या समर्थस्थापित मारुतीरायाला व रामपंचायतनला कायमच्या सोडून निजधामीं जायला निघाल्या .

चाफळ ला आल्या आल्या त्या समर्थाना म्हणाल्या .... "या वेळी मला माहेरी जायचे आहे . तेवढ्यासाठी मी येथे आले आहे .. " यावर समर्थ

"सज्जनगडावर गेल्यावर पाहू " असे म्हणाले . रामनवमीचा उत्सव सालाबादप्रमाणे साजरा झाला . स्वतः वेण्णास्वामींनी उत्सवात कीर्तन केले . मात्र या वेळी त्यांच्या कीर्तनात अनार्तमुखता अधिक होती . चाफळातील हनुमानजयंती उत्सव आटोपल्यावर समर्थ आपल्या शिष्यांसमवेत सज्जनगडावर परतले . एक दोन दिवस निघून गेले. वेणास्वामी परत समर्थांजवळ येऊन म्हणाल्या मला माहेरी जायचे आहे , केव्हा पाठवणार ?

समर्थ म्हणाले - "उद्या बघू "

असे रोज घडू लागले , वेणास्वामी समर्थांना विचारीत व समर्थ उद्या बघू असे म्हणत . बाकीच्या शिष्यानं वाटे की , वेणास्वामी परत कोल्हापूरला जाण्याबद्दल विचारात आहेत . पण निवृत्ती हे वेण्णास्वामींचं महेर होतं व प्रवृत्ती हे सासर होते . आपले कार्य आता संपले आहे याची पूर्ती जाणीव त्यांना झाली होती . समर्थांची अवस्था मात्र " शिष्य मागतो समाधी । पुत्र मरे बापा आधी । " या निवृत्ती नाथांच्या अभांगाप्रमाणे झाली होती . चैत्र वद्य चतुर्दशी ! सकाळीच समर्थानी सगळ्यांना सांगितले अरे वेणी आज माहेरी जाणार आहे. दुपारी ४ वाजता तिचे कीर्तन होईल बरे ! अजूनही माहेरी म्हणजे कोल्हापुरी असाच सर्वांचा समाज होता . त्या दिवशी स्वतः वेण्णाबाईंनी धाब्याचा मारुती ,आंग्लाई देवी ,पेठेतला मारुती यांचा नैवेद्य केला व स्वतः प्रसाद ग्रहण केला . गडावर ४ वाजताचा ठोका पडला आणि वेण्णास्वामींचे कीर्तन सुरु झाले . समर्थ स्वतः जातीने कीर्तनाला हजर होते . पूर्वरंग झाला समर्थांनी वेण्णास्वामींच्या गळ्यात हार घातला . उतरंगामध्ये त्यांनी राम ,लक्ष्मण व सीता हे निजधामाला कसे गेले याचे आख्यान घेतले . आख्यान चालू असतांना समर्थांचे सन्यस्थ , वितरागी अंतः करण हादरले . उत्तरंग पूर्ण झाला "श्री राम जय राम जय जय राम " , "जय जय रघुवीर समर्थ " हा जयघोष करत समर्थचरणी नमस्कार घातला आणि आपल्या अश्रूंनी समर्थ चरण भिजवले . बराच वेळ झाला तरी वेण्णास्वामी काही उठल्या नाहीत ,सर्वांना कळून चुकले की - राम ,सीता ,लक्ष्मण यांप्रमाणे वेण्णास्वामी पण निजधामीं गेल्या कायमच्या ! आता त्या सगळ्याच्या लक्षात आले की वेण्णास्वामींचे माहेरी जाणे काय ते . सज्जनगडावर वेणास्वामी यांची समाधी बांधण्यात अली आहे . आजही समर्थ समाधी मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर असलेल्या वेण्णास्वामींच्या समाधीला लोक नमस्कार करतात आणि धन्यता पावतात !

भगूर हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले छोटेसे गाव . या तारुण्यातच कृष्णाजीपंत कुलकर्णी हे सद्गृहस्थ राहत होते . ते व्यवसायाने पटवारी होते . लग्न झाल्यानंतर ऐन तारुण्यातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते . पत्नी गेल्यानंतर त्यांनी तीर्थाटनाचा ध्यास घेतला . प्रवास करीत करीत ते कोल्हापुरास आले . कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरात त्यांची भेट पराजीपंत कुलकर्णी यांच्याशी झाली . बऱ्याच वर्षानंतर झालेल्या भेटीमुळे दोघांनाही अतिशय आनंद झाला होता . पराजीपंतांनी अतिशय आग्रहपूर्वक कृष्णजीपंतांना आपल्या घरी नेले व काही दिवस मुक्कामी ठेवले . इकडे जगदंबेच्या मनात मात्र काही वेगळाच डाव मांडला होता .

परजीपंतांना एक लग्नाची बहीण होती . तिचे नाव लक्ष्मीबाई . एकदा रात्री स्वप्नामध्ये जगदंबेने कृष्णाजीपंतांना दृष्टांत दिला - " पराजीपंतांच्या बहिणीशी लग्न करून तू पुन्हा संसार कर " . घडलेला दृष्टांत पाराजीपंताना कसा सांगणार आणि पुन्हा या संसार चक्रात कशाला गुरफ़टावे या विचारताच काही दिवस गेले . तिसऱ्या दिवशी पराजीपंतांना जगदंबेने दृष्टांत दिला आणि सांगितले - "तू तुझी बहीण कृष्णजीपंतांना दे " . तेव्हा मात्र पाराजीपंतांनी स्वतः हा विषय कृष्णाजीपंतांना सांगितला . आता काही केल्या पुन्हा संसाराचा योग काही टाळता येणार नसल्याची कृष्णाजीपंताची खात्री पटली . ज्याप्रमाणे "निवृत्ती -ज्ञानदेव - सोपान - मुक्ताई " ही चार आदर्श भावंडे जन्मास घालून मराठी संत परंपरा उजळ करण्यासाठी नियतीने संन्यास घेतलेल्या विठ्ठलपंतांना पुन्हा सन्यास करण्यास भाग पाडले , त्याचप्रमाणे समर्थ संप्रदयाचा इतिहास उजळ करणारी दोन भावंडे समाजाला देण्यासाठी जणू नियतीने कृष्णाजीपंतांचे संसारिक जीवन पुनश्च्य घडविले . पराजीपंतांनी , कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई व कृष्णाजीपंत यांचा थाटामटात लग्न लावून दिले . लग्नानंतर लक्ष्मीबाईंचे रखमाबाई असे नाव ठेवण्यात आले . कृष्णाजीपंत रखमाबाईंना घेऊन परत भगूर येथे आले व आपला पूर्वीचा व्यवसाय करू लागले .

आता त्यांच्या या संसाराला ८ वर्षे पूर्ण झाली होती . या काळात त्यांना दोन गुणवंत व बुद्धिमान मुले झाली . थोरल्याचे नाव अंबाजी असे ठेवण्यात आले व धाकट्याचे नाव दत्तात्रेय ठेवण्यात आले . अंबाजीचे वय जेमतेम ८ वर्षाचे असेल , कृष्णाजीपंतना आपली अपुरी राहिलेलं तीर्थाटन पूर्ण करण्याची ईच्छा झाली . तेव्हा ते , रखमाबाई , अंबाजी व दत्तात्रेय यांना घेऊन कोल्हापुरास पराजीपंतांकडे आले व आपल्या मनातील ईच्छा त्यांना वर्तवली . पाराजीपंतांनी मोठ्या आनंदाने त्याना तीर्थाटनास जाण्याची परवानगी दिली व आपल्या बहिणीला आणि दोन भाच्यांना आपल्या जावळ ठेवले . असे म्हणतात की , कृष्णाजीपंत जे तीर्थाटनास गेले ते परत आलेच नाही त्यांनी प्रवासातच सन्यास घेतला .

वर उल्लेखल्याप्रमाणे अंबाजीचा जन्म १६३६ साली भगूर येथे झाला . कोल्हापूरच्या अंबामातेच्या कृपेने त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव अंबाजी ठेवण्यात आले . दुसरा पुत्र दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाने झाला म्हणून त्यांचे नाव दत्तात्रेय ठेवण्यात आले . अंबाजीचे मामा पराजीपंत हे अतिशय सात्विक,सत्प्रवृत्त व सश्रद्ध गृहस्थ होते . त्यांच्या प्रेमळ छत्रछाये खाली अंबाजीचे शिक्षण झाले .

१६४६ साली अंबाजी दहा वर्षांचा झाला तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न करण्यासंबंधी त्यांची आई व मामा विचारात असे . तेव्हा तो प्रत्येक वेळेस नकार देत असे कारण तो अभिजात ब्रह्मचारी होता . कित्येक वेळा तो तासनतास ध्यान करत असे तेव्हा त्याच्या आईला याला काही बाधा झाली कि काय अशी शंका येत असे . खरे म्हणजे तो सद्गुरुंच्या शोधात होता . आपण संसार करायचा नाही आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी घरदार सोडवायचे हे त्याने लहानपणीच ठरविले होते. ईच्छा तेथे मार्ग या उक्ती प्रमाणे त्याला बालवयातच सद्गुरू प्राप्त होणार होते.

१६४५ साली समर्थ चाफळ येथे वास्तव्याला आले . कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यावे म्हणून ते काही काळ कोल्हापुरास वास्तव्याला होते . मंदिरात समर्थांचे कीर्तन होत असे . पराजीपंत आपल्या बहीण व भाच्यांसह कीर्तनाला नियमित येत असत . समर्थांची बरीच कीर्तने ऐकल्या नंतर त्यांनी समर्थांकडून अनुग्रह घेण्याचे निश्चित केले आणि एके दिवशी ते कीर्तन संपल्यावर समर्थाना नमस्कार करून म्हणाले - महाराज उद्या माधुकरी साठी आमच्या घरी या आपली चरणकमल आमच्या घराला लागू द्या . आपल्या अनुग्रहाने आम्हाला सनाथ करा .

समर्थानी घरी येण्याचे आश्वासन देताच , पाराजीपंतांना अत्यानंद झाला . साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा . या उक्तीप्रमाणे तो दिवस पाराजीपंतांच्या आयुष्यातला अत्युच्च आनंदाचा दिवस होता . तथापि या अनुग्रह प्रसंगातून आपल्या बहिणीचा आणि भाच्यांचा भाग्योदय होणार आहे याची सुतराम कल्पना त्यांना नव्हती .

ठरल्याप्रमाणे दुपारी समर्थ पाराजीपंतांच्या घरी आले . त्यांच्या पूजेची सगळी व्यवस्था अंबाजीकडे सोपंवण्यात आली होती . त्यानी पण ही जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली . त्याची सर्व कामातील व्यवस्थितपणा ,कुशलता व शिस्त बघून समर्थांना खूप कौतुक वाटले .

अंबाजीचे वय जेमतेम १० वर्षांचे असेल . असा हुशार मुलगा आपल्या संप्रदायात असल्यास याचेही कल्याण होईल व संप्रदयाच्या कार्यात पण खूप मदत होईल असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला . त्याच्या हस्ताक्षराची परीक्षा घ्यावी म्हणून समर्थांनी त्याला दौत व लेखणी घेऊन येण्यास सांगितले . समर्थांनी एक सवाई म्हंटली व ती त्याला लिहून काढण्यास सांगितली . त्याने ती लगेच पाठ केली व आपल्या सुवाच्च अक्षरात लिहून काढली . समर्थांना त्याचे हस्ताक्षर बघून अतिशय आनंद झाला . त्याचे हस्ताक्षर अतिशय वळणदार व दोन्ही बाजूला समास सोडून लिहिले . अशा प्रकारे समर्थांनी एकामागोमाग ११ सवया म्हटल्या आणि त्याने त्या लगेच पाठ करून लिहून काढल्या . अशाप्रकारे अंबाजी समर्थांच्या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाले . हा मुलगा आपल्या कार्यासाठी कसा मागावा असा विचार ते करू लागले . तेवढ्यात पराजीपंत समर्थांसाठी भेट म्हणून वस्त्र , धान्य व द्रव्य घेऊन आले . समर्थ म्हणले आम्ही रामदासी आम्हला या वस्तूंचा काय उपयोग . तेव्हा पराजीपंत म्हणाले , महाराज आपण बोला मी आपली काय सेवा करू शकतो ? - समर्थ म्हणाले आम्हाला जर काही द्यायचे असल्यास हा अंबाजी द्या .

पराजीपंतांनी रखमाबाईंना हाक मारली व त्यांना समर्थांचा मानस सांगितला - तेव्हा रखमाबाई म्हणाल्या .

आम्हा मायलेकरांची अशी ताटातूट न करावी . अंबाजी बरोबर मला व माझ्या धाकटा मुलगा दत्तात्रेय यांस देखील आपल्याबरोबर घ्यावे . आम्ही तीघेपण आपणास शरण आलो आहोत .

असे म्हणून त्यांनी समर्थाच्या चरणावर डोकं ठेवले . समर्थांनी पितृवात्सल्याने त्यांची पाठ थोपटली . तथास्तु ! म्हणत त्यांनी आता तयारीस लागा , आपल्याला उद्या कोल्हापूर सोडणे आहे .मासूरला मोठा उच्छाव मांडणे आहे . दुसऱ्या दिवशी समर्थांचे कोल्हापुरातील कार्यक्रम आटोपून ते मसूर ला जाण्यास निघाले . बरोबर अंबाजी , दत्तात्रेय , रखमाबाई ही सगळी मंडळी होती . ते प्रथम शिरगावला आले . तेथे समर्थांनी मारुती मंदिराची स्थापना करून तेथे मठ बांधला . दत्तात्रेयस्वामी यांना मठपती केले . रखमाबाई अन दत्तात्रेयस्वामी यांच्यावर मठाची व्यवस्था सोपवून समर्थ आणि अंबाजी पुढच्या प्रवासाला निघाले .

अंबाजीचा कल्याण झाला -

चैत्र शुद्ध प्रतिपदा , मसूर येथे समर्थ स्थापित मारुती येथे रामनवमी उत्सव सुरु झाला . त्यावेळी मसूर हे आदिलशाही दरबारातील गाव पण त्याची जहागिरी ही शहाजीराजांकडे असल्याने उत्सवात कुठलेच यवनी विघ्न येण्याचे कारण नव्हते . मसूर गावातील लोकांना तर खूप आनंद झाला होता . कारण अशाप्रकारचा कार्यक्रम ते पहिल्यांदाच अनुभवत होते . रामनवमीच्या दिवशी मिरवणूक निघणार होती . ज्यासाठी गावकऱ्यांनी भला मोठा रथ तयार केला त्यात श्रीरामपंचायतन ठेवले व वाजत गाजत मिरवणूक गावातून निघू लागली . "बजरंग बली की जय" असं म्हणत गावकरी तो भला मोठा रथ स्वतः ओढत होते . थोडे अंतर पुढे जात नाही तर , तो रथ एका आंब्याच्या झाडाच्या फ़ांदीने जणू काही अडवलाच . आता एक तर रथ मागे न्यावा लागला असता नाहीतर ती फांदी कापावी लागली असती . समर्थांनी लगेच फांदी कापण्यास सांगितले . ५-६ उत्साही शिष्य झाडावर चढले आणि फांदी कापू लागले . समर्थ त्यांना थांबा ! म्हणाले आणि फांदी शेंड्याकडे बसून बुंध्याकडे कापायला सांगितले . कारण खाली विहीर होती आणि फांदी उलटी कापली तरच विहिरीत कचरा न पडता फांदी तुटणार होती . पण फांदी तुटल्याबरोबर फांदीच्या टोकावर बसलेली व्यक्ती सरळ त्या खोल विहिरीत पडणार होती . त्या भीतीपोटी वर चढलेले उत्साही शिष्य खाली उतरले . अंबाजी मात्र काही विचार न करता फांदीच्या टोकावर बसून कुह्राडीचे घाव बुंध्यावर करू लागलला . बरेच लोक समर्थांना नाव ठेवू लागले ही काय शिष्यांची परीक्षा घ्यायची वेळ आहे का ? उत्सव महत्वाचा की परीक्षा ?. पण अंबाजीचे याकडे काहीच लक्ष नव्हते थोड्याच वेळात फांदी तुटून अंबाजी त्या खोल विहिरीत जाऊन पडला .सगळे लोक विहिरीजवळ धावले पाहतो तर काय अंबाजीचा काही पत्ता नाही .

शेवटी अक्काबाई म्हणाल्या "महाराज " अंबाजीचा अंत्यसंस्कार आज करायचा की उत्सव संपल्यावर ?

त्यावर समर्थ म्हणाले - अरे ! तुम्हाला काय वाटत अंबाजी मेला की काय ? चला मी बघतो काय ते . समर्थ विहिरीजवळ आले आणि डोकावून ओरडले - " अंबाजी ,कल्याण आहे ना ?"

"हो कल्याण आहे महाराज ! " पाण्यातून मोठ्याने आवाज आला .

"चल ये मग वरती ." समर्थांचे हे वाक्य ऐकताच अंबाजी वर आला . सगळ्यांना आनंद झाला ."सद्गुरू रामदासस्वामी महाराज की जय " या गर्जनेने रथाची प्रदकक्षीणा परत सुरु झाली . त्या दिवसापासून अंबाजीचे "कल्याण " असे नाव पडले . स्वतः समर्थ त्याला "कल्याण " अशी हाक मारत . त्याची गुरुभक्ती व सेवा पाहून लोक आदराने त्याला कल्याणस्वामी म्हणू लागले .

दिसामाजी काहीतरी लिहावे

समर्थांनी कल्याणाची निवड केली होती ती मुळ ग्रंथ लेखनासाठीच ! कल्याणचे अक्षर सुंदर होते . तेव्हा संप्रदयाचे सर्व लेखन कल्याणाकडे सोपवावे असे त्यांनी ठरविले . त्याचे अक्षर सुंदर होतेच तथापि ते अजून सुंदर व्हावे म्हणून त्याला समर्थ म्हणाले -

"तुझे अक्षर म्हणावे तेवढे सुंदर नाही, आणखी सुधरायला पाहिजे . "

तेव्हा कल्याण म्हणाला महाराज आपण मला एक कित्ता द्या तो मी रोज गिरवीन जेणे करून माझे अक्षर अधिक सुंदर होईल .

त्याबरोबर समर्थांनी आपल्या झोळीतून एक पोथीचे सुंदर पान काढून ते कल्याणाला दाखविले . उत्कृष्ट हस्ताक्षराचा नमुना म्हणून त्यांनी ते पान जपून ठेवले होते . तो कित्ता कल्याण पुन्हा पुन्हा गिरवून कल्याणाने आपले हस्ताक्षर अधिक सुंदर केले . समर्थांना पण त्याचे हस्ताक्षर पाहून अधिक समाधान वाटले . कारण समर्थ संप्रदयात लिखाणाला फार महत्व असे . दिसा माझी काहीतरी लिहावे , अशी सर्व शिष्याना सक्त ताकीद होती . लिहावे कसे या विषयावर समर्थांनी दासबोधात एक स्वतंत्र प्रकरण लिहिले असून त्यामध्ये त्यांनी केलेल्या खालील सूचना आजही विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत

दिसामाजी काहीतरी लिहावे

समर्थांनी कल्याणाची निवड केली होती ती मुळ ग्रंथ लेखनासाठीच ! कल्याणचे अक्षर सुंदर होते . तेव्हा संप्रदयाचे सर्व लेखन कल्याणाकडे सोपवावे असे त्यांनी ठरविले . त्याचे अक्षर सुंदर होतेच तथापि ते अजून सुंदर व्हावे म्हणून त्याला समर्थ म्हणाले -

"तुझे अक्षर म्हणावे तेवढे सुंदर नाही, आणखी सुधरायला पाहिजे . "

तेव्हा कल्याण म्हणाला महाराज आपण मला एक कित्ता द्या तो मी रोज गिरवीन जेणे करून माझे अक्षर अधिक सुंदर होईल .

त्याबरोबर समर्थांनी आपल्या झोळीतून एक पोथीचे सुंदर पान काढून ते कल्याणाला दाखविले . उत्कृष्ट हस्ताक्षराचा नमुना म्हणून त्यांनी ते पान जपून ठेवले होते . तो कित्ता कल्याण पुन्हा पुन्हा गिरवून कल्याणाने आपले हस्ताक्षर अधिक सुंदर केले . समर्थांना पण त्याचे हस्ताक्षर पाहून अधिक समाधान वाटले . कारण समर्थ संप्रदयात लिखाणाला फार महत्व असे . दिसा माझी काहीतरी लिहावे , अशी सर्व शिष्याना सक्त ताकीद होती . लिहावे कसे या विषयावर समर्थांनी दासबोधात एक स्वतंत्र प्रकरण लिहिले असून त्यामध्ये त्यांनी केलेल्या खालील सूचना आजही विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत सुंदर हस्ताक्षर हे समर्थांच्या महंतांचे प्रमुख लक्षण होते . संप्रदायाच्या वीस लक्षणांत समर्थ म्हणतात -

"पहिले ते लिहिणे । दुसरे ते वाचणे ।
तिसरे ते सांगणे । अर्थांतर ।।"

याचा अर्थ लिहिणे , वाचणे व लोकांना समजावून सांगणे या तीन गोष्टींना समर्थांनी विशेष महत्व दिले . समर्थांचा असा दंडक असे की प्रत्येक शिष्यानी काही ना काही तरी लिहून काढलं पाहिजे . तंजावर येथील शरीफजीराजे भोसले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात समर्थांच्या शिष्यानी उतरवून काढलेले विविध कवींचे चाळीस हजार ग्रंथ उपलब्द आहेत . स्वतः कल्याणस्वामींनी हजारातून अधिक ग्रंथ उतरवून काढलेले आहेत . म्हणून कल्याणाचे गुरु बंधू अनंत कवी म्हणतात -

"स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहीतसे "

तसेच गिरीधर स्वामी म्हणतात -

"कल्याण नामा ग्रंथ विस्तारी । उत्कट कीर्ती विश्वाभीतरी ।"

श्री आत्माराम असे म्हणतात की , समर्थान बरोबर फिरतांना उद्धव जवळ पास ४० किलोचे ओझे कायम असे . त्यात लिखाणाचे सामान - शाई , दौत , लेखणी , लिहिण्यासाठी कागदं आणि कधी काळी लागलेच तर संदर्भ ग्रंथ असे . समर्थांनी एखादी गोष्ट मागितली म्हणजे ती नाही म्हणायची पाळी येऊ नये म्हणून कल्याण एवढी काळजी घेत असे .

"जो लेखणी सहित कागद दाऊंती वाहे ।"

असे वर्णन कल्याणस्वामींचे केले आहे . रघुनाथ पंडित , समर्थ व कल्याणस्वामी बद्दल लिहितात -

ऐसे जें जें स्वामी बोलती । तें तें लिही सिघ्रगती ।
गद्य पद्य सवाया रीती । ग्रंथचिया वेदोक्त ।।
स्वामी मुखींचे निघता वचन । मागें लिहीत चाले आपण ।
ऐसें दोघांचे स्वामी सेवकपण । न कळे जाण कवणासी ।।
समर्थे बोलावे येणे लिहावें । पुनरपि नलगे पुसावे ।
ऐसें गुरुकृपेंचे लाघव । बोलता चि नये ।।

या वर्णना वरून गुरु -शिष्यांचे संबंध किती प्रेमाचे होते हे लक्षात येते . धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील नऊशे चोवीस पानांचे एक लठ्ठ बाड असून त्यामध्ये समर्थांची संपूर्ण कविता आहे .

उन्मत्त हत्तीला वठणीवर आणले

कल्याण समर्थांच्या तालमीत तयार होऊ लागला . तो रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असे त्यामुळे त्यांची अंगकाठी व भव्य दिव्य देह यष्टी पाहून सगळे जण त्याला बिचकून असत . समर्थांना केवळ बुद्धिमान शिष्य नको होते , तर शक्ती आणि युक्ती यांचा समन्वय हवा होता .

"शक्तिने मिळती राज्ये । युक्तिने कार्य होत असे ।
शक्ति युक्ति जये ठायी । येथे श्रीमंत धावती ।।
धकाधकीचा मामला । कैसा कळे अशक्ताला ।
नाना बुद्द्धी शक्ताला । सांगीत जाव्या ।। "

हीच समर्थाची देखील धारणा होती . म्हणून त्यांनी जागो जागी मारुतीचे मंदिर बांधले आणि तेथे बलोपासनेचे बीज पेरले . या मंदिरांमध्ये त्यांचे तरुण शिष्य - सूर्यनमस्कार , जोर बैठका , कुस्ती खेळत असत . त्यामुळे त्यांची ही मंदिरे शक्ती केंद्र होती . कल्याणस्वामी तर शक्तीचे मूर्तिमंत प्रतिक होते . त्यांच्या शक्तीसंबंधी एक कथा प्रसिद्ध आहे .

चाफळला रामनवमीचा उत्सव सुरु होता . एक सजवलेला हत्ती राममंदिरासमोर आणण्यात आला . हत्तीवरून राममूर्तीची मिरवणूक सुरु झाली . वाद्यांच्या जल्लोषात मिरवणूक सुरु असतांना अचानक हत्ती उन्मत्त झाला आणि मिरवणुकीत सैर भैर पळू लागला . मिरवणुकीत एकाच गोंधळ उडाला . त्या हत्तीला रोखण्याची कुणामध्येच हिम्मत होई ना . शेवटी समर्थ कल्याणला म्हणाले - "कल्याणा बघतोस काय ? हत्तीला आवर ". एखादा पेहलवान रिंगणात उतरावा तसे कल्याण स्वामी त्या हत्तीसमोर उभे झाले आणि त्याचा डावा दात तोडून उजव्या हाताने त्यांनी हत्तीच्या मस्तकावर जोरदार प्रहार केला . हत्ती क्षणात शांत बसला . कल्याणाचे हे सामर्थ्य बघून सर्वांना आश्चर्य वाटले . कल्याणच्या साहसामुळे उत्सवातील फार मोठे संकट टळले होते . त्यामुळे सारे लोक त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करू लागले .

संस्कृत पंडितांचे गर्व हरण -

कल्याण स्वामींचा द्वेष करणारे बरेच शिष्य चाफळ मठात होते . कल्याण स्वामींची थोडी जरी कुणी स्तुती केली की म्हणायचे या- "अहो ह्या कल्याणाला दुसरा उद्योग तरी आहे का ?नुसते खायचे , प्यायचे आणि दिवसभर काबाडकष्ट करायचे . आम्ही बघा,सध्या संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करतो आहे . ह्या उलट आम्ही कल्याणला कधी हातात पुस्तक घेतांना बघितले नाही . "

शिष्यांची ही चर्चा समर्थांच्या कानी गेली आणि त्यांनी एक दिवस या संस्कृत पंडितांची परीक्षा घ्यायची ठरवली . समर्थ एक दिवस राम मंदिराच्या मंडपात बसले असतांना बरेच शिष्य जवळ ठेऊन बसले . या शिष्यांन मध्ये कल्याण पण येऊन बसले . समर्थ म्हणाले - "मला असे कळले आहे की - आपल्यापैकी बरीच मंडळी ही संस्कृत भाषेचा अभ्यास करते आहे " .

"होय स्वामीजी ! आम्ही संस्कृत शिकतो आहे त्यातले ४-५ शिष्य म्हणाले . त्याच बरोबर समर्थ त्यांना म्हणाले - "हे पहा ! आता मी संस्कृत श्लोकाचे २ चरण तयार करील . माझ्या पाठोपाठ लगेच तुम्ही पुढचे दोन चरण तयार करून तो श्लोक पूर्ण करायचा ."

होय स्वामीजी ! संस्कृत शिकणारे शिष्य म्हणाले . समर्थांनी दोन चरण संस्कृतातून म्हटले ; पण त्यापुढचे दोन चरण तयार करून श्लोक कोणालाच पूर्ण करता येईना . सारे संस्कृत पंडित गप्प झाले . शेवटी समर्थांनी कल्याणला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले . समर्थ आज्ञा होताच कल्याणाने लगेच पुढचे दोन चरण पूर्ण केले . अशा पद्धतीने समर्थांनी चाळीस श्लोकांचे दोन चरण तयार केले व कल्याण स्वामींनी त्या पुढील दोन चरण तयार करून चाळीस श्लोक पूर्ण केले .

चाळीस श्लोकांच्या या प्रकरणास "दासगीता" असे म्हणतात . यावरून समर्थ व कल्याण या दोघांच्या संस्कृतवरील प्रभुत्वाची कल्पना येईल . "विद्या विनयेन शोभते " या संस्कृत उक्तीनुसार ज्ञानी माणसे ही नेहमी नम्र असतात .

हृदय परिवर्तन

रामनवमीचा उत्सव जवळ आला होता , त्यामुळे चाफळ येथील मठात धान्य , द्रव्य व पैसे भंडारगृहात ठेवण्यात आले होते . कल्याण स्वामी समर्थांचे पाय दाबत होते , तेवढ्यात कल्याणस्वामींनी ४-५ चोर भंडारगृहाच्या दिशेनी जातांना दिसले आणि त्यांचे हात पाय दाबता दाबता थांबले . समर्थ म्हणाले -" कल्याणा का थांबलास" ? कल्याणस्वामी म्हणाले - गुरुदेव ४-५ चोर भंडारगृहाच्या दिशेने गेले आहेत , थांबा त्यांना बदडून आपल्या समोर उभा करतो ! समर्थ म्हणाले - नको ! जे द्रव्य तिथे आहे ते तरी कुठे आपले आहे जे काही आहे ते सर्व रामरायचे आहे तेव्हा सोडून दे त्यांना . त्यावर कल्याणस्वामी म्हणाले - दासबोधाच्या शिकवणी प्रमाणे "उद्धटासी उद्धट आणि ठकासी महाठक " अशी आपलीच शिकवण आहे , तेव्हा आपणच या वेळी वेदांत सांगू लागलो तर समाजात बंडाळी माजेल . कल्याणाच्या या युक्तीवादावर समर्थ निरुत्तर झाले .
कल्याणस्वामी आपला सोटा घेऊन धावत भांडारगृहाकडे धावले , कल्याणस्वामींच्या हातातील सोटा, त्यांचा रुद्रावतार पाहून ते चोर घाबरले . कल्याणस्वामींनी त्यांना पकडून समर्थांपुढे उभे केले . "बाबांनो चोरी कशाला करता ? उद्या पासून मठात येत जा रामरायची सेवा करत जा " - मी तुम्हाला दोन वेळचे जेवण घालतो . असे म्हणतात कि ते सर्व चोर समर्थ शिष्य झाले आणि मठात सेवा करू लागले .

समर्थ कल्याणाचे उष्टे खातात -

एकदा समर्थांचे कीर्तन चालू असतांना समर्थ म्हणाले - " आम्ही रांधतो . ते कल्याण सेवन करतो . कल्याण सेवन करतो आणि आम्हास उच्छिष्ट देतो . तेव्हा कीर्तनास रंग चढतो ". समर्थांच्या या वाक्याचा लोकांनी असा अर्थ काढला की - समर्थ हे कल्याणाचे उष्टे खातात . वास्तविक समर्थांचा म्हणण्याचा हा उद्देश होता की , आम्ही कविता करतो , कल्याण ती पाठ करतो व कीर्तनात आम्हाला ती कविता कल्याण वेळेवर सुचवतो . लोकांनी घेतलेला गैरअर्थ पाहून समर्थांना हसू आले व म्हणून पुढे आपल्या एका कीर्तनात ते म्हणाले -

"आम्ही रांधले ते सर्व सेवुनि । अवशिष्ट देतो मज काढुनि "।
या कल्याणसाहित्या कोदंडपाणी । कीर्तन रंग माजविला ।।
या बोलण्याचा ऐसा अर्थ । कवने करितो तरी बहुत ।
पुन्हा न स्फुरती कीर्तनात । ते स्मरण देतो कल्याण ।।"

स्वतः कल्याणस्वामी उत्कृष्ट कीर्तन करीत असत . समर्थांसमोर उभं राहून कीर्तन करण्याचा मान ज्या मूठभर शिष्याना होता त्या पैकी कल्याणस्वामी एक होते . कल्याणस्वामींच्या कीर्तनाला समर्थ स्वतः टाळ घेऊन बसत असत . एकदा कल्याणस्वामी कीर्तन करीत असतांना त्यांना एक अभंग आठवेना , तेव्हा समर्थांनी त्यांना टाळ फेकून मारला व कल्याणांना लगेच तो अभंग आठवला अशी एक कथा आहे .

समर्थांना वेड लागले -

१६७६ साली समर्थांनी आपला मुक्काम चाफळतील मुक्काम हलवला व कायमचे वास्तव्य करण्यासाठी ते सज्जनगडावर आले . सज्जनगडावर त्यांनी एक फर्लांगभर अंतरावर एक मारुती स्थापन केला त्याला धाब्याचा मारुती म्हणत असे . एक दिवस आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावी म्हणून ते पहाटेच मारुती जवळ उपासनेला बसले . बसतांना कपाळाला कुंकवाचा मळवट , केस मोकळे सोडले आणि बाजूला तलवार घेऊन बसले . संपूर्ण सकाळ गेली , भोजन समय जवळ आला तरी समर्थ कुठे दिसेनातं म्हणून एक शिष्य त्यांना शोधत धाब्याच्या मारुती पर्यंत आला , तो जवळ येताच समर्थ त्याच्यावर ओरडले -

"ये पुढे ये तुझे मस्तकच उडवतो ". समर्थांचा तो अवतार पाहून शिष्य घाबरला . त्याने पळत जाऊन ही बातमी सगळ्या गडावर सांगितली , बरेच शिष्य तिथे येऊन पोचले. ते सारे जण जवळ येताच समर्थ म्हणाले - "खबरदार ! कुणी पुढे आले तर , मस्तकच तोडून टाकीन . मला ब्रह्मा चे वेड लागले आहे . सगळीकडे मला ब्रह्म दिसतो आहे . मला पिसे भरले आहे "

सगळ्या शिष्याना काही सुचेना , कल्याणस्वामी पण परळीला गेले होते . ते परत येताच त्यांच्या कानी ही खबर पोहोचली . शिष्य त्यांना म्हणाले - "समर्थांना वेड लागले आहे , त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे " . कल्याणस्वामी शिष्यांचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले . त्यांनी रागानी सर्वांना प्रश्न केला की -
"इतके दिवस समर्थांच्या सोबत राहून हीच पारख केलीस ? तेव्हा सगळे शिष्य म्हणाले - इतकंच आहे तर तुम्ही त्यांना घेऊन या ! "

कल्याणस्वामी तडक समर्थांजवळ आले - आणि समर्थ कल्याणावर पण ओरडू लागले -

कल्याण ! खबरदार पुढे येशील तर , मी खांडोळी करून टाकीन तुझी .

हात जोडून कल्याणस्वामी समर्थाच्या चरणी झेपावले - गुरुदेव ! आपल्या हातून मरण येण्याएवढी भाग्यवान गोष्ट या जगात कोणती असेल ?".
समर्थांनी दोन्ही हातांनी कल्याणला उचलले व त्याची गुरुनिष्ठा पाहून त्याला कडकडून मिठी मारली . दोघेही गुरु-शिष्य आनंदाने मठाकडे परतले. जेवतांना समर्थांनी सगळ्यांना उद्देदेशून "आला आला ब्रह्मपिसा जावळी " हा अभंग म्हटला .

डाळ गप्पू

सज्जनगडावर जे तळे आहेत त्याला जिवंत झरे नाहीत . पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते . अशा साठलेल्या पाण्यामुळे कफ वाढू शकतो . सज्जनगडावर येण्यापूर्वी समर्थांना कफची व्यथा होतीच . वैद्यांनी त्यांना जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला . जिवंत पाणी उपलब्ध होण्याचे सज्जनगडापासूनचे जवळचे ठिकाण म्हणजे उरमोडी नदी . सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि .मी अंतरावर आहे . कल्याणांनी समर्थांसाठी या नदीचे दोन हांडे पाणी आणण्याचे कबुल केले . सद्गुरुसेवेची एवढी चांगली संधी मिळाल्या बद्दल त्यांना आनंद झाला .

दोन भले मोठे हांडे घेऊन कल्याणस्वामी उरमोडी नदीवर जात आणि ते भरलेले हांडे कावड करून गडावर घेऊन येत . एक दिवस समर्थ तटावरून उभे राहून किल्ल्याचे निरीक्षण करत असतांना कल्याणस्वामीना त्यांनी पाणी आणतांना पहिले . कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या . भुकेने आणि तहानेने त्याचा चेहेरा व्याकुळ आणि काळवणला होता . कल्याणाची काहीतरी न्याहारीची व्यवस्था केली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करून समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ , अर्धा शेर गूळ व पावशेर साजूक तूप न्याहारी म्हणून देण्यास सांगितले . दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींचा शिधा सुरु झाला . त्यामुळे बाकीच्या शिष्याच्या पोटात दुखू लागले . कल्याणला डाळीचा हा शिधा मंजूर झाला म्हणून सारेजण त्याला "डाळगप्पू " असे म्हणू लागले . कल्याणच्या तोंडावर कुणाला बोलण्याची सोय नव्हती , पण त्याच्या पशचत बाकीचे शिष्य म्हणत -

" आता हा डाळगप्पूच पाहा ! केवढी ढोर मेहनत करतो . भरमसाठ खायचं आणि गुरासारखं राबराब राबायचं . कधी जप करणे नाही , की अशा दिनचर्येने त्यांचं कधीही सार्थक होणार नाही ." शिष्यांची आपआपसातील ही चर्चा समर्थांच्या कानावर गेली . एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले - "तुमचयापैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कुणी केली आहेत ?"

एकाच वेळी गलका करून शिष्य म्हणू लागले , माझे ५१ पारायण झालीत , कुणी ५००, कुणी १००० असे सांगू लागले . समर्थानी मुद्दाम विचारले . "ऐसा सद्गुरुपाणी - " हा पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही , तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" समर्थांच्या प्रश्नामुळे सारे गोंधळले . अगदी अकराशे पारायण केलेले शिष्य सुद्धा लज्जायमान होऊन गप्प बसला . तेवढयात समर्थानी कल्याणला हाक मारली व तीच ओवी त्यांना विचारली . तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले - "स्वामीजी, ऐसा सद्गुरू पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी । देहाविण लोटांगणे । तया सद्गुरुसी ।। ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे . "

कल्याण एखादवेळेस चुकला असेल म्हणून काही शिष्यानी लगेच दासबोध बघितला . ओवी तर बरोबर होतीच सोबत स्थलनिर्देश पण अचूक होता . समर्थ म्हणाले - " कल्याणा , तुझे दासबोधाचे किती पारायणे झालीत ! " हात जोडून कल्याण म्हणाला , गुरुदेव , आपल्या कृपेने आयुष्यात एकच पारायण झालं . पण मनापासून झाले . बरं ते जाऊ दे , अलीकडे गडावर कुणी डाळ गप्पू नावाचा साधक आला आहे का ? तेव्हा कल्याण म्हणाले - "स्वामीजी " , जीव - शिव , सुख -दुःख ही दोन दळ जो गप्प करून टाकतो व सदैव , अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय . मात्र ही व्यक्ती माझ्या पाहण्यात आली नाही . "

कल्याणा, छाटी उडाली

एका संध्याकाळी समर्थ गडाच्या पूर्वेकडील तटावर उभे होते . उन्हाळ्याचे दिवस होते , त्यामुळे संध्यकाळचा वारा आल्हाददायक वाटत होता . अचानक एकदम मोठ्याने वारा आला आणि समर्थांच्या खांद्यावरील छाटी उडाली . सगळेजण तटावर उभे असल्याने छाटी आता कुठेतरी डोंगरात जाऊन पडणार हे निश्चित होते .

"कल्याणा , छाटी उडाली ". असे समर्थ म्हणताच , कल्याणाने तटावरून उडी मारली आणि हवेतच समर्थांची छाटी पकडली . जवळ जवळ तटावरून २०० फूट खाली कल्याणस्वामींची उडी पडली . पण त्यांना काही एक इजा झाली नाही . जणू काहीच झाले नाही अशा थाटात कल्याणस्वामी गडावर आले . ह्या व अशा अनेक प्रसंगावरून कल्याणस्वामींची गुरुनिष्ठा दिसून येते .

समर्थ कल्याणास रागावले

कल्याण समर्थांचा लाडका शिष्य खरा ; पण एक दिवस समर्थांची बोलणी खायचा प्रसंग त्याच्यावर आला . ती घटना अशी की - छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुक्काम तेव्हा सातारा येथे होता. छत्रपतींची तब्येत ठीक नसल्याने , समर्थानी कल्याणाच्या हस्ते त्यांच्या साठी तीर्थ पाठवले . समर्थ शिष्य कल्याण आपल्या साठी तीर्थ घेऊन आले आहेत ही बातमी शिवाजी महाराज यांना कळताच ,त्यांनी कल्याण स्वामींना विश्रांतीच्या खोलीत येण्यास सांगितले . कल्याण स्वामींनी ते तीर्थ शिवाजी राजे यांना दिले व निरोप घेऊन निघणार तोच राजे म्हणाले - आपल्यासाठी काही सेवा असल्यास निःसंकोच मागा . कल्याणस्वामींना ही चांगली संधी वाटली . त्यांनी त्यांचे धाकटे बंधू दत्तात्रेय यांच्या शिरगाव येथील मठासाठी अकरा गाई दानस्वरूप मागितल्या . छत्रपतींनी तत्काळ आज्ञा फ़र्मावून शिरगाव मठासाठी अकरा गाई दिल्या व त्याची व्यवस्था करण्यास सांगितले . गडावर परतताच कल्याणाने समर्थाना घडलेला सारा वृतान्त सांगितला . गाईचे वृत्त कळताच समर्थ संतापले आणि त्यांनी कल्याणाची चांगलीच कान उघडणी केली . समर्थ कल्याणास म्हणाले - "आर्जववृत्तीने वागणे हा निःस्पृहतेचा धर्म नव्हे . आपण गाईंचे वृत्त राजांचे कानी घालून फार मोठी चूक केली . पुन्हा ऐसे न करणे "

यावरून समर्थ आपल्या शिष्यांशी किती कडक व काटेकोरपणे वागत होते याची कल्पना येते . "कार्यकर्ता होऊ नये राजदारी " हा त्यांचा सर्व महंतांना सक्त आदेश होता . .राज्यकर्त्याचे मिंधेपण पत्करल्यास कार्यकर्ता लाचार होतो व आपल्या ध्येयापासून आणि तत्त्वापासून तो दूरदूर भरकटत जातो . राजाश्रयावर चालणाऱ्या संस्था किंवा मठ ध्येयवादी माणसे निर्माण करू शकत नाही . म्हणून शिवाजी महाराजांची सनद त्यांनी दोन - तीनदा नाकारली . पुढे राजांचा आणि आपला अंतःकाल जवळ आला हे ओळखून आपल्या संप्रदाय चालावा म्हणून १६७८ साली सनद स्वीकारली .

समर्थ आजाराचे सोंग घेतात -

एक दिवस समर्थ - अग आई ग , अग आई ग ! रामराया , या यातनांतून माझी सुटका करा ." असे विव्हळतच उठले . बरेच शिष्य त्यांच्या भोवती गोळा झाली . समर्थांच्या पोटरीला मोठे खांडुक झाले होते . पिकल्यामुळे ते अतिशय दुखत होते . एक शिष्य म्हणाला - "मी मंत्रिकाला बोलावतो " , दुसरा म्हणाला की मी - "वैद्यांना बोलावतो " . समर्थ म्हणाले - "कुणालाही बोलवून फायदा होणार नाही . " तुमच्या पैकी कुणी हे खांडुक चोखले तरच उतारा पडेल ." असे म्हणून समर्थ पुन्हा विव्हळू लागले . एकही शिष्य ते खांडुक चोखायला पुढे आला नाही . उलटं ते बघून सगळ्यांना किळसच आली . तेवढ्यात कल्याणस्वामी आपला व्यायाम आटोपून समर्थ दर्शनार्थ तिथे आले . समर्थ आजारी असल्याचे कळल्याने ते त्यांच्या जावळ गेले . खांडुक चोकल्याने उतारा पडेल हे कळताच आनंदाने ते खांडुक चोखण्यास तयार झाले . समर्थांनी आपल्या पोटरीवरील बांधलेली पट्टी बाजूला केली व कल्याणास खांडुक चोखण्यास सांगितले . कल्याणाने खांडुक चोखण्यास प्रारंभ केला व ते मोठ्याने हसू लागले . बाकीच्या शिष्याना कळेना की कल्याण का हसतो आहे ते , तेव्हा कल्याणाने समर्थांनी पोटरीला बांधलेला आंबा शिष्याना दाखवला व ते म्हणाले - "समर्थांना कोणताच आजार झालेला नाही" केवळ शिष्यांची परीक्षा घ्यायला त्यांनी ते आजाराचे नाटक केले होते.

कल्याणस्वामींचे निर्वाण

समर्थांच्या निर्वाणानंतर जवळजवळ तेहतीस वर्षे समर्थांच्या अस्थी चाफळच्या तुळशीवृंदावनात होत्या . कल्याणस्वामींचे शिष्य केशवस्वामी दरवर्षी त्या अस्थी काशीला गंगेत विसर्जन करण्याचा विषय कल्याणजवळ काढीत असत व कल्याणस्वामी या बाबतीत चालढकल करीत ."आता नको , पुढे बघू " असे म्हणत . कल्याणस्वामींच्या नकाराचे रहस्य केशवस्वामींच्या लक्षात येईना . मात्र त्या नाकारला ते मान देत असत . असे तेहतीस वर्षे चालले . शेवटी १७१४ सालच्या आषाढ शुद्ध त्रयोदशीला समर्थांच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी केशवस्वामींनी तुळशीवृंदावनातून काढल्या . काशीला जाण्यापूर्वी गुरुदेवांचे दर्शन घ्यावे म्हणून ते डोंगावला आले , तो कल्याणस्वामींनी देखील आषाढ शुद्ध त्रयोदशीला देह ठेवल्याची वार्ता त्यांना ऐकायला मिळाली .

केशवस्वामी ओक्शा-बोक्शी रडू लागले . या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला . शेवटी समर्थ व कल्याणस्वामी या दोघांच्या अस्थी एकत्र घेऊन केशवस्वामी काशीला गेले व त्यांनी अस्थिविसर्जन केले . अशाप्रकारे दोघेही गुरुशिष्य अस्थींच्या रूपाने पुन्हा एकामेकांना भेटले . आज डोमगाव येथे स्वामींचे खूप मोठे समाधी मंदिर आहे .

धन्य धन्य हे गुरूशिष्यपण । धन्य धन्य हें सेवाविधान ।
धन्य धन्य हे अभेद्य लक्षण । धन्य धन्य लीला अगाध ।।१।।
कल्याणाचे नाम कल्याणकारी । कल्याणाचे ध्यान सर्वास तारी ।
कल्याणाचा हस्त माथा जयाचे । च्याऱ्ही मुक्ती वंदिती पाय त्याचे ।।२।।
कल्याण होणे जरि तुज आहे । कल्याणपायी मन स्थिर राहे ।
कल्याण वाणी पडतां सुकानी । कल्याण जालें बहुसाल प्राणी ।।३।।
अविनाश हे कल्याण नाम ज्याचे । करी सर्व कल्याण सर्वां जिवांचे ।
समर्थ जना ऊतरायांसी पारी । अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी ।।४।।
-- जय जय रघुवीर समर्थ ।।

सन १६८२ ! माघ महिना सुरु झाला होता . समर्थ बराच वेळ एकांतात राहत असत . जणूकाही आपल्या जीवनाचे ते सिंहावलोकन करत होते . त्यांचे आनंदवन भुवनचे स्वप्न साकार झाले होते . ज्या शिवरायांनी हे स्वप्न साकार केले , ते या रंगमंचावरून केव्हाच निघून गेले होते . त्याप्रमाणे आपल्या निर्याणाचा वेळ आता आला आहे हे ओळखले होते . वेण्णाबाईंनी पण आपली जिवनयात्रा संपवली होती आपलाही अंतःकाळ जवळ आला आहे हे त्यांनी ओळखले होते .त्यांनी आपला मुक्काम आता सज्जनगडावरच ठेवला होता .

छत्रपती शिवराय यांच्या निधनानंतर संभाजी महाराज छत्रपती झाले . समर्थांनी आपल्या निर्याणापूर्वी संभाजी महाराजांना उपदेश पर पत्र लिहिले -

एकदा आपल्या निवडक शिष्यांबरोबर समर्थ सज्जनगडावरील मठात बसले होते . माघ वाद्य नवमीला देह ठेवायचा असे त्यांनी ठरवले होते . आपला अंतः काळ जवळ आला आहे हे शिष्यापैकी कोणाच्या लक्षात येते की नाही हे पाहण्यासाठी समर्थांनी खालील दोन पदे म्हटली -

"रघुकुळटिळकाचा वेध सन्निध आला ।
तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला ।।"

समर्थांचा हा अपूर्ण श्लोक तात्काळ पूर्ण करित उद्धवस्वामी म्हणाले -

"अनुदिना नवमी हे मानसी आठवावी ।
बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी ।।"

शाब्बास उद्धवा ! असे म्हणत समर्थांनी त्यांची पाठ थोपटली खरी ; मात्र उद्धवस्वामींना समर्थ आपल्याला कायमचे सोडून जाणार ही कल्पना असह्य वाटू लागली . कारण त्यांच्या जन्मापासून समर्थांचा सहवास त्यांना लाभला होता .

माघ वद्य नवमीस समर्थांनी ठरल्या प्रमाणे देह ठेवला . मठाच्या उत्तरेला ज़ो खड्डा होता तेथे जलशुद्धी करून त्या ठिकाणी समर्थांच्या देहाला अग्नी संस्कार देण्यात आला . समर्थांचे सर्वात पहिले शिष्य आणि समर्थांचा मानसपुत्र या नात्याने समर्थांच्या देहाला अग्नी देण्याची जबाबदारी उद्धवस्वामींवर सोपविण्यात आली . ज्या ठिकाणी समर्थांना अग्नी देण्यात आला तिथे संभाजी महाराजांनी समाधी मंदिर बांधले व तेथे श्रीराम मूर्तीची स्थापना करण्यात आली .

समर्थ निजधामी गेले , हे कल्याणानी अतर्ज्ञानाने ओळखले व जाणून सक्षोऊर प्रायश्चित केले . दहा दिवस अशोऊच पाळले . नंतर कल्याणस्वामी गडावर आले . समर्थ समाधीवर डोकं ठेवून ते रडू लागले . मोठ्या आर्ततेने ते त्यांना हाक मारू लागले . कल्याणाची आर्त हाक ऐकताच समर्थ समाधीमधून प्रगट झाले व कल्याणाला म्हणाले , "बाळा कल्याणा , माझ्या देहावसानानंतर तुला किती दुःख होईल याची कल्पना होती , म्हणूनच मी तुला बोलावलॆ नाही "

माझी काया गेली खरे । परी मी आहे जगदाकारे ।
ऐका स्वहित उत्तरे । सांगेन ती ।।१।।
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।
तेणे सायुज्याची वाट । ठायी पडे ।।२।।
रहा देशाच्या विसरे । वर्तु नका वाईट बरे ।
तेणे मुक्तीचीही द्वारे । चोजवीती ।।३।।
रामी रामदास म्हणे । सदा स्वरूपी अनुसंधान ।
करा श्रीरामांचे ध्यान । निरंतर ।।४।।

समर्थांनी कल्याणाचे समाधान केले व मानसपूजेच्या वेळी प्रत्यक्ष दर्शन देईल असा वर दिला . कल्याणाप्रमाणे , उद्धव व अक्कांना समर्थांनी हा वर दिला . कल्याणला दर्शन दिल्यानंतर समाधीला जी चीर पडली , ती आजही आपल्याला सज्जनगडी बघता येईल .

समर्थ जातांना प्रभू रामचंद्राचे ध्यान कसे करावे ते सांगताना म्हणतात -

श्रीराम जयराम जय जय राम । ऐसा काही एक धरूनि नेम ।
जप कीजे तेणे आत्माराम । जोडेल नेमे ।। १।।
परी कोण्हासी कळों नेदावा । जप अंतरीचा करावा ।
जैसे कृपणासी धन ठेवा । सापडला एकांतीं ।।२।।
राम जपत्याचे चित्त पाहतो । जप करितां आळस येतो ।
विकल्प अंतरी प्रवेशतो । ढळेना मेरू जैसा ।।३।।
का प्रपंची होती आघात । तेणे चित्त होय दुश्चित्त ।
देहासी आपदा होती अत्यंत । तरीही रामासी विसंबो नये ।।४।।
जप नेमिला तो चुका नेदावा । त्या वेगळा सर्वदा स्मरावा ।
मळत्यागीही न विसंबावा । कर्मठपणे करुनि ।।५।।
ऐसे अखंड नाम स्मरावे । परी दुसऱ्याची कळो नेदावे ।
ऐसा निधिद्यास जालिया राघवें । पाविजे तात्काळ ।।६।।
शिष्या सांगतो तुज नेम । तोचि रे तुझा स्वधर्म ।
ज्ञातेपणीही माझा राम ।विसंबो नका ।।७।।
शब्दज्ञान उदंड बोलती । परी क्रिया कोण्हीच न करिती ।
तैसा तूं हि गा वित्पत्ती । करू नको ।।८।।
रामनामाची ऐसी प्रौढी । कळीकाळाची नरडी मुरडी ।
यमाचेही दांत पाडी । ओस पाडी यमलोक ।।९।।

समर्थ विरहानंतर शिष्याना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर समर्थ आपल्या अखेरच्या संदेशात देतात -

माझी काया आणि वाणी ।
गेली म्हणाल अंतः करणी ।
परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ।। १।।

नका करू खटपट ।
पहा माझा ग्रंथ नीट ।
तेणे सायुज्याची वाट गवसेल की ।।२।।

आत्माराम दासबोध ।
माझे स्वरूप स्वतः सिद्ध ।
असता न करावा हा खेद । भक्तजनीं ।।३।।

वरील समर्थ चरीत्र हे मी माझ्या अल्पमतीने जितकं सुचत गेलं व मला उपलब्ध असलेल्या साधनांमधून लिहीत गेलो . यात ज्या काही त्रुटी आणि उणिवा असतील तर तो दोष माझा असेल . जे काही उद्दात , उत्तम असेल त्याचं श्रेय मात्र प्रभुरामचंद्राच आणि सद्गुरू समर्थ रामदासस्वामी यांचं . हा ब्लॉग आपल्याला आवडेल अशी अशा करितो . आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया आपण खाली दिलेल्या कंमेंट्स मध्ये अवश्य नोंद करा व आपल्या जवळ समर्थ चरित्रावर काही बहुमूल्य माहिती असल्यास , जी या ब्लॉग मध्ये नसल्यास मला अवश्य मेल करावी .

।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।।सद्गुरू समर्थ रामदासस्वामी महाराज की जय ।।

We'd Love To Hear From You !!