Untitled Document

मनात

"मनात " हे अच्युत गोडबोले यांचं मानसशास्त्र यावर लिहिलेलं मराठीतलं एक उत्कृष्ट पुस्तक . मन आणि मेंदू यांच्या खेळात मानवी जीवनाची भूमिका , याचा यथायोग्य विवेचन म्हणजे हे पुस्तक . आजही माणसाला त्याच्या मेंदू आणि मन या दोन्ही गोष्टीबद्दल बरीच माहिती मिळालेली नाहीये . गेल्या कित्येक वर्षांच्या प्रयोगांती माणसाला मेंदूचे विविध भाग कळले आणि ते शरीरातील विशिष्ट भागांना कसे नियोजन करते याची माहिती कळली आणि त्यावर अजूनही बरेच प्रयोग सुरू आहेत .

आज माणसाचं आयुष्य हे फार धकाधकीचं झालं आहे . त्यात जीवघेणी स्पर्धा , समाजात स्वतःची वेगळी (खोटी ) प्रतिष्ठा मिरवण्याची धडपड , विभक्त कुटुंब पद्धती यामुळे सुखदुःखाचे संवाद व मन मोकळं करायला घरात माणसं नाहीत , त्यामुळे मानवी जीवन हे अतिशय तणावपूर्ण झाले आहे . त्याचा सर्वस्वी प्रभाव हा मनावर व परिणामी माणसाच्या शरीरावर होतो आहे . त्यामुळे दिवसेंदिवस मानसिक रुग्ण ह्यांची संख्या वाढत जाते आहे .

दुर्दैवाने मानसिक रुग्णांकडे आणि त्यांच्या आजाराकडे संवेदनेने बघणं सोडून समाज त्यांना सरळ वेडं ठरवतं किंवा वेड्यांच्या इस्पितळात भरती केलं जातं . अशा रुग्णांना गरज असते ती मानसोपचारतज्ञाची , पण भारतात आणि जगातील इतर देशात अजूनही यावर अघोरी उपाय केले जातात . तेव्हा येणाऱ्या काळात मनाचे आणि मनोविकारांचे रुग्ण हे अधिक प्रमाणात असतील यात तिळमात्रं शंका नाही . मग यावर उपाय तरी काय ?

भारत हा साधू -संतांचा देश आणि महाराष्ट्राला तर संत परंपरेचा वारसा लाभला आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी म्हटली जाणारी समर्थांचे मनाचे श्लोक आणि ज्ञानेश्वरांचे पसायदान हे मनाला बोध करणारे आहे . कारण विचार , विकार , संस्कार आणि बुद्धीला पोषण करणारं अदृश्य अवयव म्हणजे मन ! ते जेवढं सुद्रुढ तेवढं मानवी जीवन सुद्रुढ म्हणूनच साधू संतांनी म्हंटलं आहे "मना कर रे प्रसन्न" . कारण मनाला एकदा वेसण घातली कि माणसाच्या विचारांना दिशा , बुद्धीला चालना आणि शरीराला कर्म करण्यासाठी ऊर्जा मिळते . त्यामुळे मन हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचा मूळ आहे .

अच्युत गोडबोले यांची या विषयीसंबंधी असलेली तळमळ आणि लिखाणासाठी घेतलेले परिश्रम आपल्याला पुस्तकाच्या शेवटी असलेल्या संदर्भ सूची वरून लक्षात येईल . सामान्य माणसाला मनोविकारांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनानं बघायला लावण्यात हे पुस्तक नक्कीच यशस्वी होईल .

"मन" आणि "मेंदू " यांची उत्कंठावर्धक रम्यक सफर म्हणजे "मनात" हे पुस्तक !

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document