Untitled Document

चार्ली चार्ल्स चॅप्लिन

हसरे दुःख ! हे पुस्तक भा . द . खेर यांनी जगविख्यात विनोदवीर चार्ली चार्ल्स चॅप्लिन यावर लिहिलं आहे . चार्ली चं बालपण , ते एक यशस्वी आणि जगप्रसिद्ध विनोदवीर असा प्रवास , खेर यांनी अतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात मांडला आहे.

चार्लीच्या आयुष्याचा प्रवास हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सुरु होतो. स्वतःच्या ठायी असलेल्या मृदू स्वभाव , कले विषयी असलेला दुर्दम्य आत्मविश्वास, चिकाटी आणि सतत नव-नविन प्रयोग करून सिने जगतात त्याने स्वतःच अजरामर असं स्थान निर्माण केलं .

चार्लीची आई लिली हार्ले (हॅना) हिने घटस्फोट घेतल्यानंतर सिडने ( चार्ली चा मोठाभाऊ ) आणि चार्ली यांचा सांभाळ केला . चार्ली चे वडील चार्ल्स चॅप्लिन हे एक उत्कृष्ट नट होते पण दारूच्या व्यसनामुळे लिलीने त्यांना सोडले . स्वतः लिली एक उत्कृष्ट नटी , गाणं आणि नृत्य करणारी स्टेज आर्टिस्ट होती पण दुर्दैवानं तिच्या गळ्याने साथ देणे सोडले आणि चॅप्लिन कुटुंबावर उतरती कळा लागली . अगदी दोन वेळचे अन्न मिळणे हि कठीण झाले .

पैसे मिळत नसल्याने चॅप्लिन कुटुंबाला काही काळ वर्कहाऊस मध्ये राहावं लागलं त्यात गरीब मुलांचे होणारे हाल पाहून आधीच हळवा आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणारा चार्ली अधिकच दुःखी बनला . पण हे दुःख त्याने कधीच कुणाला सांगितलं नाही आणि कधी त्याच प्रदर्शन पण केलं नाही . मुलांची काळजी आणि वर्कहाऊस मध्ये होणाऱ्या त्रासापायी लिली ला वेड्याचा झटका आला . त्या आजारातून लिली बऱी झाल्यावर सिडने हा फ्रेड कार्नो यांच्या स्टुडिओत काम करू लागला . सिडने च्या म्हणण्यावरून चार्ली ला फ्रेड कार्नो यांनी त्यांच्या प्रयोगात काम दिले आणि तिथूनच चार्ली ची यशोगाथा सुरु झाली .

लंडन मध्ये सुरु झालेला हा चार्ली चा प्रवास थेट अमेरिका पर्यंत पोचला . तिथे त्याला कीस्टोन कंपनीत काम मिळालं , आपल्या अभिनयाचा ठसा चार्लीने तिथे पण उमटवला . त्याच्या अभिनयाला अमेरिकन जनतेने भरभरून प्रेम दिलं . त्याच जोरावर त्याने स्वतःची "युनाइटेड स्टुडिओस" नावाची कंपनी सुरु केली .

अमेरिका मध्ये चार्ली ने काम सुरु केलं आणि एका पेक्षा एक असे सरस चित्रपट निर्माण केले. त्याचं ट्रॅम्प हे जगाला हसवून वेड लावणारं अजरामर पात्रं ठरलं . चार्लीनं आपल्या कलागुणांनी अख्ख्या अमेरिका आणि संपूर्ण जगाला वेड लावलं . एके काळी अन्नानदशा असलेलं चॅप्लिन कुटुंब आज प्रसिद्धी आणि श्रीमंतीच्या परमोच्च शिखरावर होतं , पण त्याचा चार्ली ला कधी अभिमान किंवा गर्व नव्हता . चित्रपट सृष्टीत यशाची कारकीर्द गाजवणारा चार्ली संसारात मात्र सुखी नव्हता त्याची चार लग्न झाली पण पहिली तिन ही अल्पावधीतच मोडली . चौथं लग्न ऊना ओनिल हिच्या सोबत झालं ते त्याला शेवट पर्यंत साथ देणारं ठरलं .

दुसऱ्या महायुध्याचा काळात , चार्ली ला अमेरिकेत बराच त्रास झाला . कोणताही माणूस जेव्हा त्याच्या कारकिर्दीतील परमोच्च शिखरावर असतो तेव्हा लोकं त्याला पाण्यात पाहायला सुरुवात करतात . प्रसार माध्यमांनी चार्लीला त्याच्या रशिया या मित्र राष्ट्राविषयी दिलेल्या एका भाषणामुळे आणि "द - डिक्टेटर " या सिनेमामुळे त्रास द्यायला सुरुवात केली आणि नको नको त्या गोष्टी छापू लागले . यामुळे आधीच हळवा असलेला चार्ली अधिक दुःखी झाला आणि त्याने अमेरिकेला कायम चा राम-राम ठोकला .

लंडन ला परत आल्यावर चार्लीने स्वित्झर्लंड येथे आलिशान बंगला बांधला आणि तेथेच त्याने ८८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला . त्याच्या या घरात , गांधी , नेहरू, त्याकाळचे चीनचे राष्ट्रपती येऊन गेले .

चार्लीच्या विनोदी छटा आपण त्याच्या विविध चित्रपट , मूकपट आणि बोलपट यातून बघितल्या आणि आजही आपल्याला त्या हसवत आहेत . परिस्थितीशी झगडून स्वबळावर निर्माण केलेल्या या हास्याच्या बादशहाला विनम्र प्रणाम !

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document