Untitled Document

चाणक्य

पूर्वी भारत हा अनेक संस्थानांनमध्ये विखुरलेला होता . अनेक गणराज्यांमध्ये विखुरलेल्या या भारतभूमीमध्ये एकसंधता नव्हती . काही गणराज्ये ही एकमेकांची मित्रं होती तर काही शत्रू .प्रत्येक राज्याचा राजकारभार वेगळा , कुणी युद्धनीतीत ,शस्त्र-अस्त्र , शास्त्रात निपुण व परिपूर्ण तर कुणी कृषी क्षेत्रात अग्रेसर , कुठे विदया - शिक्षण हे उत्कृष्ट तर कुठे अगदी अधोगती होती . काही ठिकाणी दुफळी माजलेली राजसत्ता तर कुठे दुःखाच्या गर्तेत लोपलेली जनता आणि मग्रूर राजसत्ता . अशा या वैफल्याच्या काळात भारत वर्षात कुणी परकीय शत्रूने आक्रमण केल्यास ही गणराज्ये आप-आपसातील वैमनस्वाने आणि स्वार्थी वृत्तीने या भारतभूमीस परदास्यात न ढकलते तर नवल .

भारतातील अशाच एका मगध येथील गणराज्यात धनानंद नावाचा मग्रूर राजा राज्य करित होता . त्या गावात विष्णुगुप्त नावाचा एक ब्राह्मण मुलगा राहत होता . धनानंदच्या या जुलमी राजसत्ते विरुद्ध त्याच्या वडिलांनी आवाज उठविला तेव्हा धनानंदने त्याच्या मंत्र्याकरवी त्यांना अटक केली आणि छळाने त्यांचा अंत केला. दुःखाच्या या गर्ततेत असतांना त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि विष्णुगुप्त अगदी एकटा पडला . भारतातील या गणराज्यांमधील मतभेद आणि धनानंद सारख्या सत्तेत मशगूल राजाची त्याला मनस्वी चीड आली आणि या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्याने मगध राज्य सोडण्याचा निर्णय घेतला .

मुळात राजकारणात रस असलेल्या विष्णुगुप्ताने उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेल्या तक्षशिला नगरी कडे निघाला .

तक्षशिलेत प्रवेश मिळवल्यावर त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने विविध विषयांत प्राविण्य मिळवले , पण राज्यशास्त्र हा त्याचा आवडीचा विषय होता . त्याच्या असामान्य प्रतिभेमुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर विष्णुगुत याला तक्षशिला येथे आचार्य हि पदवी मिळाली आणि तो "चाणक्य" या नावाने ओळखला जाऊ लागला . चाणक्य ची आचार्य म्हणून प्रसिद्धी हि लवकरच तक्षशिलेच्या बाहेरपण जाऊ लागली . त्याच्या राज्यशात्राची चर्चा हि सर्वदूर पसरू लागली आणि अशातच त्याला मगध राज्याचं दानाध्यक्ष या पदाची सूत्रे स्वीकारण्या संबंधी विचारणा झाली .

चाणक्याने ती सूत्रे स्वीकारली आणि आपल्या मातृभूमीत तो परतला . धनानंद याच्या राजकारभारात कुठलाच फरक पडला नव्हता ! स्वतःच्या सुखात मश्गुल असलेला धनानंद च्या राज्यात चाणक्य आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत होता . एके दिवशी मगध राज्यामध्ये राजा धनानंदने विद्वतसभा बोलावली , संपूर्ण भारतवर्षातले शास्त्रपंडित त्या सभेत आले होते . सभा सुरु होण्याची वेळ होऊन गेली होती तरी धनानंद आपल्या महालातून बाहेर आला नव्हता. विद्वानांचा झालेला हा अपमान चाणक्य बघत होता आणि राजा येताच चाणक्याने त्याला खडसावले .भर सभेत झालेल्या अपमानाचा बदला धनानंदाने घ्यायचे ठरवले आणि त्याने चाणक्य वर राजाश्रयातील दानाचा गैर व्यवहार केल्याचा आळ आणला . एके दिवशी राजसभेत धनानंद ने चाणक्यचा अपमान केला आणि त्यावर आपल्या शेंडीची गाठ सोडून चाणक्याने प्रतिज्ञा केली की , मगध कुळाचा नाश केल्याशिवाय हा ब्राह्मण आपल्या शेंडीला गाठ पडणार नाही !

त्याच तडकफडकीत चाणक्याने मगध प्रांत सोडले आणि भारत हा एकसंध राष्ट्रनिर्माण करून त्याला एक सम्राट द्यावा या विचाराने तो झपाटून गेला . हा संकल्प तडीस जाण्यासाठी त्याला गरज होती ती एका उमद्या तरुणाची जो प्रजा , राज्य , राज्यकारभार, राज्याची सीमा यांची रक्षण करणारा समर्थ पुरुष हवा . लवकरच त्याच्या शोधाला यश आलं आणि चंद्रगुप्त या तरुणाला त्याने आपलं सर्व ज्ञान दिलं . नंतर याच चंद्रगुप्त करवी त्याने धनानंद आणि त्याचा कुळाचा नाश केला आणि उत्तर व पूर्वभारतातील सर्व गणराज्ये त्याने सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या अधिपत्याखाली आणली .

संकल्प तडीस झाल्यावर चाणक्याने त्याचा कौटिल्येय अर्थशास्त्र हा ग्रंथ पूर्ण केला . दुर्दैवाने भारतीय इतिहासात चाणक्य सारख्या महान व्यक्तीची अतिशय तुरळक माहिती उपलब्ध आहे . त्यातून निर्माण झालेली भा .द .खेर यांची ही कादंबरी - भारताला एकसंध राष्ट्र निर्मात्या चाणक्याला अतिशय समर्पक व न्याय देणारी आहे . आपल्या आगामी पिढीला या महान राष्ट्रपुरुषाची ओळख करून देणारी कादंबरी वाचकांना नक्कीच पसंत येईल .

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document