Untitled Document

।। समर्थ रामदास ।।

समर्थ रामदास ! हे महाराष्ट्र संत परंपरेतील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे नुसतं अध्यात्मिक , पारमार्थिक जीवनावर आधारलेलं नसून सामाजिक ,राजकीय आणि वयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारं एक कणखर व मूर्तिमंत उदाहरण . समर्थांनी विश्वाची चिंता केली व महाराष्ट्राचा उद्धार केला .राजकारण अचूक व यशस्वी कसे करावे ते शिकविले . स्वतः प्रपंच नाही केला पण महाराष्ट्राचा प्रपंच केला. परमार्थ आणि प्रपंच याची सांगड घालतांना समर्थ लिहितात .

प्रपंच सुखे करावा , परी काही परमार्थ वाढववा ।
परमार्थ अवघची बुडवावा , हे विहित नव्हे ।।
प्रपंची जो सावधान , तोचि परमार्थ करील जाण ।
प्रपंची जो अप्रमण , तो परमार्थी खोटा ।।

समर्थांचा कालखंड हा यवनी सत्तेतला ज्यात अध्यात्म सोबत राजकारण व समाजकारण करणे हे क्रमप्राप्त होते . शिव - समर्थ जोडी ह्यांचा जन्मच मुळी धर्म रक्षणासाठी झाला .

धर्म स्थापनेचे जे नर , ते ईश्वराचे अवतार ।
झाले आहेत होणार, देणे ईश्वराचे ।।

ज्यात समर्थांनी स्वतःचे आनंदवनभुवन व शिव छत्रपतींचे श्रींचे राज्य उभे केले . समर्थांनी जनप्रबोधनार्थ ग्रंथ रचनाही अफाट केली . कित्येक आरत्या , सवाया , पदे , अबाल - वृद्धांसाठी मनाचे श्लोक हे तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण . त्यांची वाणी ही प्रासादिक आहे आणि ती तितकीच प्रभावशाली आहे . त्यांचा मनोबोध आणि ग्रंथ राज दासबोध तर आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनांत अचूक लागू पडतो .अर्थात सरते शेवटी हा विषय स्वानुभवाचा आहे .

लेखक - "रवींद्र भट" ह्यांनी अनेक संत चरित्रं लिहिली त्यातली - समर्थ रामदास्वामी ह्यांच्यावर लिहिलेली "भेदिलें सूर्यमंडळा" हि कादंबरी अतिशय लोकप्रिय ठरली . कादंबरीतील संवाद , वाक्यरचना इतक्या बोलक्या आहेत कि - समर्थ चरित्र अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं . समर्थांवर तशी बरीच पुस्तकं , चरित्रं आणि कथारूप पुस्तके प्रकाशित झाली . पण "भेदिलें सूर्यमंडळा" हिने स्वतःचा असा ठसा आजही वाचकांच्या मनावर उमटवला आहे .

ज्यांनी कुणी समर्थ रामदासस्वामी ह्यांचे जीवनचरित्र वाचले नसेल किंवा ज्यांना समर्थांविषयी माहिती नसेल त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि प्रसंगी संग्रही ठेवावे .

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document